Next
सुरेश वाडकर, राजीव नाईक आणि सुहास जोशी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार
समीहन कशाळकर यांना ‘उस्ताद बिस्मील्ला खाँ युवा पुरस्कार’; झाकीर हुसैन ठरले ‘अकादमी रत्न’
BOI
Wednesday, July 17, 2019 | 12:00 AM
15 0 0
Share this article:

सुरेश वाडकर आणि सुहास जोशी

नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशी या महाराष्ट्रातील कलाकारांना २०१८चा ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. याव्यतिरिक्त शास्त्रीय गायक समीहन कशाळकर यांची उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे, तर तबलानवाज़ झाकीर हुसैन यांना ‘अकादमी रत्न’ ही मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. 

उस्ताद झाकीर हुसैनकला क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या संगीत नाटक पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला या क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांचा संगीत नाटक अकादमीतर्फे गौरव केला जातो. वर्ष २०१८च्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी देशभरातील ४० कलाकारांची, तर ‘उस्ताद बिस्मील्ला खाँ’ युवा पुरस्कारासाठी ३२ कलाकारांची निवड करण्यात आली आहे. चार कलाकारांना उल्लेखनीय योगदानासाठी ‘अकादमी रत्न’ ही फेलोशीप जाहीर झाली आहे. नृत्य व नाटक अकादमीच्या गुवाहाटी येथे २६ जूनला झालेल्या बैठकीत या सन्मानासाठीची नावे ठरवण्यात आले असल्याचे केंद्रिय सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितले आहे. 

सुरेश वाडकर यांच्या सुगम संगीतातील योगदानाची दखल  
‘मेघा रे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी..’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यामुळे चाहत्यांच्या मनावार गारुड करणारे प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना सुगम संगीतातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुरेश वाडकर यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन केले आहे. यासोबतच त्यांनी भोजपूरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांमधूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत.

नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध नाटककार राजीव नाईक यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटककार आणि कथाकार म्हणून राजीव नाईक यांनी मराठी साहित्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाईक यांनी लिहीलेली ‘अनाहत’, ‘वांधा’, ‘अखेरचं पर्व’, ‘साठेंचं काय करायचं’ आदी नाटके प्रसिद्ध आहेत. राजीव नाईक लिखित ‘नाटकातलं मिथक’, ‘खेळ नाटकाचा’, ‘नाटकातला काळ आणि अवकाश’ ,‘न नाटकाचा’ आदि पुस्तके नाटकाच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरली आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी संगीत नाटक आकदमी पुरस्कार जाहीर झाला आहे. अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
समीहन कशाळकर  यांना ‘युवा पुरस्कार’ 

शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक, पंडित उल्हास कशाळकर यांचे पूत्र समीहन कशाळकर यांना २०१८चा ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ’ युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

तबला नवाज झाकीर हुसैन  यांना अकादमी रत्न पुरस्कार
अवघ्या जगाला तबल्याच्या तालात बांधणारे, भारतीय शास्त्रीय संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे तबलानवाज उस्ताद झाकीर हुसैन यांना या वर्षीची संगीत नाटक अकादमीची ‘अकादमी रत्न’ ही फेलोशिप जाहीर झाली आहे. तीन लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हुसैन यांच्याव्यतिरिक्त नृत्यांगना सोनल मानसिंग, जतीन गोस्वामी आणि कल्याणसुंदरम् पिल्लई यांनादेखील अकादमी रत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. कला क्षेत्रातील योगदानासाठी दिवाणसिंग बजेली व पुरू दधीच यांची निवड करण्यात आली आहे.

दर वर्षी एका शानदार सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि फेलोशिप प्रदान करण्यात येते.

(सुरेश वाडकर यांच्याबद्दल त्यांच्या एका शिष्याने लिहिलेला लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search