Next
रत्नागिरीच्या जनसेवा ग्रंथालयाचा वर्धापनदिन; कविसंमेलनासाठी कविता पाठविण्याचे आवाहन
BOI
Tuesday, July 24, 2018 | 05:03 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : वाचन आणि साहित्यिक चळवळीला उत्तेजन देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या जनसेवा ग्रंथालयातर्फे ३४व्या वर्धापनदिनानिमित्त काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रत्नागिरीतील कवींना स्वरचित कविता पाठविण्याचे आवाहन ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे.

रत्नागिरीतील वाचन आणि साहित्यिक चळवळ वृद्धिंगत व्हावी, याकरिता जनसेवा ग्रंथालय नेहमीच विविध उपक्रम राबवत आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ३४व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने रविवार, नऊ सप्टेंबर रोजी काव्यसंमेलन भरविण्यात येणार आहे. या वेळी रत्नागिरीतील प्रसिद्ध कवींना विशेष आमंत्रित करून त्यांच्या कवितांचे अभिवाचन करण्यात येणार आहे. तसेच रत्नागिरीतील नवोदित कवींनाही या काव्यसंमेलनात सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने नवोदित कवींच्या कविता ग्रंथालयातर्फे मागविण्यात आल्या आहेत. निवडक नवोदित कवींना आमंत्रित करून त्यांनाही कवितांचे अभिवाचन करण्याची संधी या कार्यक्रमात करून देण्यात येणार आहे. 

कवींनी आपल्या किमान दोन स्वरचित कविता १५ ऑगस्ट २०१८पर्यंत पोहोचतील, या बेताने टपालाने पाठवाव्यात किंवा स्वत: ग्रंथालयात आणून द्याव्यात. त्यावर निवड समिती निर्णय घेईल आणि निवड झालेल्या कवीला सादरीकरणाची संधी दिली जाईल, असे जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी सांगितले आहे. ‘जनसेवा ग्रंथालय, लक्ष्मी चौक, रत्नागिरी - ४१५ ६१२’ या पत्त्यावर कविता पाठवायच्या आहेत. 

दरम्यान, ज्येष्ठ कथालेखक अरविंद गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जनसेवा ग्रंथालयाने कोकण विभाग मर्यादित कथालेखन स्पर्धा आयोजित केली आहे. नवलेखकांसह साहित्यिकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे. 

कथालेखकांना कथेच्या विषयाचे स्वातंत्र्य आहे. कथा जास्तीत जास्त २५०० शब्दांची असावी. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे-पालघर, मुंबई येथील स्पर्धकांचा प्रवेश ग्राह्य धरला जाईल. कथा पाठविण्याची मुदत ३१ जुलै आहे. कथा टंकलिखित केलेली किंवा सुवाच्य अक्षरात पाठकोऱ्या कागदावर योग्य तो समास सोडून लिहिलेली असावी. कथेवर कथाशीर्षक असावे; मात्र कथालेखकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आदी माहिती स्वतंत्र कागदावर लिहून ‘जनसेवा ग्रंथालय, लक्ष्मी चौक, रत्नागिरी - ४१५ ६१२’ या पत्त्यावर पाठवावी. 

स्पर्धेतील एक ते तीन क्रमांकांना पारितोषिक, प्रशस्तिपत्र देऊन कथाकार अरविंद गोखले जन्मशताब्दी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. तसेच विजेत्या कथांसह निवडक कथा जनसेवा ग्रंथालयाच्या ‘शब्दांकुर’ या हस्तलिखितात प्रसिद्ध करून केवळ वाचण्यासाठी वाचकांना उपलब्ध करून देण्यात येतील. स्पर्धेच्या निकालाबाबत व पारितोषिक वितरणाबाबत विजेत्यांना माहिती कळविली जाईल. स्पर्धेबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल, अशी माहिती जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी दिली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link