Next
मुख्यमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा
प्रेस रिलीज
Monday, June 03, 2019 | 01:54 PM
15 0 0
Share this article:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीला उपस्थित चंद्रकांत पाटील आणि विविध विभागांचे अधिकारी

मुंबई : ‘पावसाळ्यात पूर, इमारत पडणे, पाणी साचणे अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे; तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षात मनुष्यबळाने सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी,’ असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.

सह्याद्री अतिथिगृहात एक जून २०१९ रोजी झालेल्या राज्यस्तरीय मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह विविध विभागाचे सचिव, तीनही सैन्य दलाचे अधिकारी, तटरक्षक दलाचे अधिकारी, राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दल, सर्व विभागीय आयुक्त, विविध महानगरपालिकांचे आयुक्त तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘पावसाळ्यातील तयारीसंदर्भात सर्व यंत्रणांनी चांगली तयारी केली आहे. या काळात पुनर्वसन व योग्य तयारी केल्यास संभाव्य आपत्ती टाळू शकतो. मागील काही वर्षांत सर्व यंत्रणांनी पावसाळ्यात चांगल्या प्रकारे काम केले आहे. त्या अनुभवावरून पुढील काळात आणखी चांगले काम करता येईल; मात्र त्यावरच अवलंबून न राहता, संस्थागत ज्ञान, अनुभव व दूरदृष्टी ठेवून योग्य तयारी केल्यास आपत्ती टाळता येईल.’

या काळात मुंबई बरोबरच नागपूर, नाशिक, पुणे आदी शहरांमधील पूर परिस्थिती, धोकादायक इमारती आदींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शहरांमध्ये पावसाचे पाणी साचू नये, तसेच पावसामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी कमांड व कंट्रोल रुमच्या माध्यमातून सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात यावे. मुंबईमधील धोकादायक व नादुरुस्त रेल्वे पूल, इमारती याबद्दल महानगरपालिका व रेल्वे विभागाने समन्वयाने निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

‘आपत्ती निवारण दलाच्या पथकाने सतर्क राहावे. आपत्ती काळात वापरण्यात येणारी यंत्रे, साधने ही सुस्थितीत असतील याची काळजी घ्यावी; तसेच आपत्ती घडल्यानंतर त्या ठिकाणी कमीत कमी वेळेत मदत पोहोचावी यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. आपत्ती प्रतिसाद केंद्रातील संपर्क यंत्रणा २४ तास सतर्क राहतील व त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित असतील याची दक्षता घ्यावी,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले, ‘राज्यातील विविध विभागांनी पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्ती निवारणासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे; तसेच या तयारीची माहितीही नागरिकांपर्यंत पोहचवावी. या काळात यंत्रणांनी सतर्क राहावे आणि मंत्रालयातील नियंत्रण कक्षही अद्ययावत करावा.’

मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी राज्य शासनातर्फे सुरू केलेल्या आपत्त्कालीन नियंत्रण कक्षाची माहिती दिली. भारतीय हवामान खात्याचे के. एस. होसळीकर यांनी राज्यातील मोसमी पावसाचा अंदाजाची माहिती दिली. राज्यात १७ जूनपर्यंत पाऊस हजेरी लावेल आणि राज्यात यंदा सरासरी ९६ ते १०४ टक्के पाऊस पडण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. 

राज्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) १८ व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) तीन पथके सदैव तैनात असणार आहेत. त्यापैकी ‘एनडीआरएफ’ची तीन फिरती पथके ही कोणत्याही क्षणी मदतीसाठी तयार ठेवण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सैन्य दलानेही आपत्ती निवारण दले सज्ज ठेवण्यात आली असून, गरज पडल्यास हेलिकॉप्टरही उपयोगात आणण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे, हवामान खाते, विविध विभागीय आयुक्त, कोस्टगार्ड, तीनही सैन्य दले यांनीही मान्सूनपूर्व तयारीचे सादरीकरण केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search