Next
‘पुलं’ स्मृतिदिनी ‘या सम हा’ विशेष कार्यक्रम
प्रेस रिलीज
Friday, June 08, 2018 | 05:31 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे आठ नोव्हेंबर २०१८ ते आठ नोव्हेंबर २०१९ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. हे औचित्य साधून पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिक यांच्या वतीने आणि स्क्वेअर वन यांच्या सहयोगाने महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर सुमारे २५ शहरांत आणि भारताबाहेरील पाच खंडातील सुमारे ३० शहरांत ग्लोबल पुलोत्सव साजरा केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘पुलं’च्या स्मृतिदिनी १२ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आशय सांस्कृतिक व स्क्वेअर वनतर्फे आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम कोहिनूर प्रस्तुत करीत असून, यासाठी ‘ढेपे वाडा’चे विशेष सहकार्य लाभले आहे. या प्रसंगी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पु. ल. परिवारातर्फे दिनेश व ज्योती ठाकूर यांची विशेष उपस्थिती असेल.

या कार्यक्रमात ‘पुलं’च्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या विविध पैलूंचा परामर्श घेणाऱ्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी, नाटककार माधव वझे, साहित्यिक प्रा. मिलिंद जोशी, डॉ. अनिल अवचट हे मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार भूषविणार असून, ते ‘पुलंचा विनोद’ या विषयावर विचार मांडतील.

‘पुलं’ची भाषणे व विविध विषयांवरील लेख यांचा अंतर्भाव असलेले परचुरे प्रकाशन निर्मित ‘कसा मी, असा मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महापौर टिळक यांच्या हस्ते पार पडेल. ‘पुलं’च्या अमृत महोत्सवानिमित्त ‘या सम हा’ या लघुपटाची निर्मिती करण्यात आली होती. या दुर्मीळ लघुपटाचे खास प्रदर्शन या प्रसंगी करण्यात येणार आहे. लघुपटाचे दिग्दर्शन सुधीर मोघे व मुक्ता राजाध्यक्ष यांचे असून, कार्यकारी निर्माते विनय नेवाळकर, मुक्ता राजाध्यक्ष आहेत. संहिता सुधीर मोघे यांची असून, छायालेखन देबू देवधर यांचे आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त रसिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

ग्लोबल पुलोत्सवाविषयी :
दिवस : १२ जून २०१८
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search