Next
‘बीएनसीए’ने साकारली कर्वे पुतळ्याची मेघडंबरी
देशात प्रथमच डिजिटल आर्किटेक्चरचा वापर
BOI
Wednesday, March 13, 2019 | 03:42 PM
15 0 0
Share this article:


पुणे  : देशात प्रथमच डिजिटल आर्किटेक्चरचा वापर करून उभारण्यात आलेली भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्यावरील शुभ्र दिव्यांनी हिऱ्यासारखी चमकणारी  वैशिष्ट्यपूर्ण मेघडंबरी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या ‘डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेन’च्या (बीएनसीए) प्राध्यापक व विद्यार्थिनींनी साकारलेली ही मेघडंबरी सर्वांच्या औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे. 

महर्षी कर्वे पुतळा उभारणीसाठी डिजिटल आर्किटेक्चरचा वापर करणारे ‘बीएनसीए’च्या विद्यार्थिनी व प्राध्यापक. (डावीकडून) नेत्रा मेदनकर, मुग्धा गांधी, प्रा. धनश्री सरदेशपांडे, प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, प्रा. स्वप्नील गवांदे, पूनम सरदेसाई आणि सोनिया भामरे.
पुतळा उभारणीसाठीच्या या कामात पुणे महापालिकेने एखाद्या शिक्षण संस्थेच्या समन्वयातून साधलेली ही पहिलीच घटना आहे.

‘बीएनसीए’साठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे,’ असे प्राचार्य डॉ. कश्यप यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘संपूर्ण भारतीय उपखंडात डिजिटल आर्किटेक्चर शिकवणारे व त्यासाठी लागणारे थ्रीडी प्रिंटिंग मशीन, रोबोटिक आर्म अशा अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणारे आमचे एकमेव महाविद्यालय आहे. जगात चीनने या क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. अण्णांच्या (महर्षी कर्वे) पुतळ्यासाठी ‘बीएनसीए’ने पुढाकार घेतला आणि या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही प्रतीकात्मक मेघडंबरी उभारून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. यासाठी आमच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम अनमोल आहेत. हे काम केवळ पुणेकरांच्याच नव्हे, तर आर्किटेक्चर क्षेत्रात देशातील सर्वांपुढे आदर्श मापदंड निर्माण करणारे ठरेल.’ 

२७ फूट उंच मेघडंबरीसह महर्षी कर्वे पुतळा उभारणीचे आव्हानात्मक काम ‘बीएनसीए’चे प्रा. स्वप्निल गवांदे यांनी प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली व डिजिटल आर्किटेक्चर विभागाच्या प्रमुख प्रा. धनश्री सरदेशपांडे यांच्या सहकार्याने साकारले. प्रा. गवांदे यांच्या या योगदानाबद्दल महापौर मुक्ता टिळक यांनी त्यांचा सत्कार केला. या कामात आर्किटेक्ट आनंद खैरनार, तसेच ‘बीएनसीए’च्या विद्यार्थिनी खुशबू अगरवाल, स्नेहा येरूनकर, विनिता वाघ, सानिया भामरा, मुग्धा गांधी, नेत्रा मेदनकर, राधा मल्लावत, तसेच राजेश पवार याचे योगदानही आहे.

‘या मेघडंबरीसाठी वापरण्यात आलेल्या डिजिटल आर्किटेक्चरच्या तंत्रज्ञानासाठी लागणारे संशोधन ‘बीएनसीए’च्या फॅब्रिकेशन प्रयोगशाळेत झाले. एखाद्या कल्पवृक्षासारखा बहरलेल्या या मेघडंबरीच्या कामात ९०० त्रिकोण व १५० षटकोनांचा वापर करण्यात आला असून, त्यासाठी एकंदर तीन हजार ६०० जोड देण्याचे जिकीरीचे काम होते. त्यासाठी लोखंडाचे आकार लेझर किरणांनी कापून फॅब्रिकेशनच्या सहाय्याने ते जोडण्याचे कामही आम्ही केले आहे. या त्रिमितीय १७ फूट उंचीच्या कल्पवृक्षावर चमकणारे १५० एलईडी दिवेही अत्यंत कलात्मकपणे बसवण्यात आले आहेत. अण्णांच्या क्रांतिकारी कार्याचे हिऱ्यासारखे चमकणारे पैलू दिसावेत, अशी यामागची आमची संकल्पना आहे,’ असे प्रा. गवांदे यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search