Next
मराठी भाषेचा ऑनलाइन उत्सव
BOI
Saturday, February 24, 2018 | 01:33 PM
15 0 1
Share this article:२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर २६ फेब्रुवारी ते पाच मार्च या कालावधीत मराठी भाषेचा ऑनलाइन उत्सव साजरा केला जाणार आहे. त्याबद्दल...
.........
कोणतीही भाषा किंवा बोली दुय्यम नाहीत. प्रत्येक भाषेची किंवा बोलीची स्वतःची अशी वैशिष्ट्यं असतात. प्रवाही असणं हे भाषेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. त्यामुळेच भाषाभाषांमध्ये दुसऱ्या भाषांतल्या शब्दांची सरमिसळ होणं तसं अपरिहार्यच; पण ही सरमिसळ एका ठरावीक मर्यादेच्या बाहेर झाली, की भाषेच्या सौंदर्यावर अन् समृद्धीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. सध्या इंग्रजीचा प्रभाव वाढत असताना दिसत असल्यानं मराठीसह अनेक भाषांमधल्या अनेक शब्दांचा वापर होणं कमी होत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर, मराठी भाषा किती समृद्ध आहे, हे नव्यानं कळावं आणि ती भाषा जपण्याच्या जबाबदारीची जाणीव जागृत राहावी, हा मराठी राजभाषा दिन साजरा करण्यामागचा उद्देश असतो. म्हणूनच ‘बाइट्स ऑफ इंडिया’नंही या दिवसाच्या औचित्यानं आठवडाभराच्या उपक्रमाचं आयोजन केलं आहे. त्याला मराठी भाषेचा छोटेखानी ऑनलाइन उत्सवच म्हणता येईल. २६ फेब्रुवारी ते पाच मार्च २०१८ या कालावधीत हा उत्सव होणार आहे. 

मराठी साहित्याचा किंवा साहित्यिकांचा समग्र आढावा घ्यायचा म्हटलं, तर त्याला आठवडाच काय, कदाचित काही वर्षंही कमी पडू शकतील. म्हणूनच आमच्या या उपक्रमासाठी आम्ही एक संकल्पना ठरवली आहे. निसर्गकवी आणि बालकवी म्हणून ओळखले जाणारे त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि नाटकांपासून कवितांपर्यंत विविध साहित्यप्रकारांसाठी ओळखले जाणारे राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांचं यंदा स्मृतिशताब्दी वर्ष आहे. तसंच, ज्ञानपीठविजेते गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. आणि २७ फेब्रुवारी हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. या सगळ्याचं औचित्य साधून आम्ही या चार कवींच्या कविता अन् साहित्य यावर या उपक्रमात भर दिला आहे. 

कविता म्हणजे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारा साहित्यप्रकार. मराठीला अतिशय उत्तम अशी काव्य आणि कविपरंपरा लाभली आहे. कवितांचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जितक्या वेळा त्या वाचू किंवा ऐकू तितक्या वेळा त्यांच्या ओळींतून नवे अर्थ उमगत जातात आणि ही प्रक्रिया नक्कीच आनंददायी असते. म्हणूनच आम्ही काही कवितांचं अभिवाचन व्हिडिओ स्वरूपात आपल्यासमोर सादर करणार आहोत. तुमच्या-आमच्यासारखंच मराठीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या आणि मराठी भाषेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही शिलेदारांनी या कवितांचं अभिवाचन केलं आहे. मधुराणी प्रभुलकर आणि वैभव मांगले यांच्यासारख्या कलाकारांनीही आवर्जून वेळ काढून या उपक्रमात सहभाग घेतला आहे. या चार कवींसह केशवसुत, इंदिरा संत, पद्मा गोळे, मंगेश पाडगावकर, बा. सी. मर्ढेकर, बा. भ. बोरकर, ग. दि. माडगूळकर अशा आणखीही काही कवींच्या कवितांचं अभिवाचन यात केलं जाणार आहे. तसंच, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, अरुणा ढेरे यांच्यासारख्या काही साहित्यिकांच्या ललित गद्याच्या अभिवाचनाचाही त्यात समावेश आहे. संत ज्ञानेश्वरांपासून माधव जूलियनांपर्यंत आणि ख्रिस्तदास थॉमस स्टीफन्स यांच्यापासून सुरेश भटांपर्यंत अनेक कवींनी मराठीची थोरवी सांगणाऱ्या कविता रचल्या. अशा, मराठीचं कौतुक करणाऱ्या १० कविताही या आठवडाभरात ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर वाचायला मिळतील. 

त्याशिवाय, बालकवी, गोविंदाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, विंदा या साहित्यिकांच्या साहित्याची वैशिष्ट्यं सांगणारे अभ्यासकांचे लेख वाचायला मिळतील. लीळाचरित्रापासून आजच्या काळापर्यंत मराठी भाषेचा प्रवास कसा होत गेला, याबद्दलचा सुनीला गोंधळेकर यांचा अभ्यासपूर्ण लेखही आपल्याला वाचायला मिळेल. व्याकरण आणि शुद्धलेखनाबद्दल अरुण फडके लिहिणार असून, मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मूलभूत कार्य करणारे प्रा. हरी नरके आपली भूमिका मांडणार आहेत. त्याशिवाय मराठी टिकविण्यासाठी, पुढच्या पिढीलाही तिची गोडी लागण्यासाठी सातासमुद्रापार असलेली मराठी मंडळी काय काय उपक्रम राबवत आहेत, हेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. स्वित्झर्लंड, सिनसिनाटी, अटलांटा, दुबई आणि मस्कत या ठिकाणच्या विशेष उपक्रमांची माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे. 

यासह आणखीही काही साहित्याची मेजवानी आपल्याला ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर मिळेल. तेव्हा २६ फेब्रुवारी ते पाच मार्च या कालावधीत तुम्ही जिथे असाल तिथून तुमचा मोबाइल, टॅब किंवा लॅपटॉपवरून बाइट्स ऑफ इंडिया डॉट कॉमला भेट द्या, आमचं फेसबुक पेज लाइक करा, यू-ट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा आणि ट्विटर, इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा.... आणि मराठीच्या या ऑनलाइन उत्सवात आवर्जून सहभागी व्हा... तुमचा अभिप्राय, प्रतिक्रिया आणि सूचनांचं स्वागतच आहे. 

फेसबुक पेज : https://www.facebook.com/BytesofIndia
यू-ट्यूब चॅनेल : https://www.youtube.com/c/bytesofindia
इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/bytesofindia

 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ashokkumar Jaikisan Nirban. About
अप्रतिम उपक्रम. अभिनंदन आणि शुभेच्छा.
2
0

Select Language
Share Link
 
Search