Next
‘जीएसटी’पलीकडचा ‘मेर्सल’
BOI
Monday, November 06 | 06:45 AM
15 0 0
Share this story

‘मेर्सल’च्या एकूण आशयामध्ये एक शतांशही नसलेल्या ‘जीएसटी’बद्दलच्या किरकोळ संवादावरून वादळ उठले आणि सगळा विषय भरकटत गेला. ‘मेर्सल’चे आंधळे समर्थन करणाऱ्यांनी आणि आंधळा विरोध करणाऱ्यांनी त्यात काय दाखवलेय हे पाहिले तरी आहे का? पाहिले असते तर त्यात स्तुती करण्यासारखे त्यांना बरेच काही दिसले असते.  
.............
ऐन दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘मेर्सल’ या चित्रपटाने गेले दोन आठवडे बातम्यांची बरीच जागा अडविली आहे. मेर्सल या तमिळ शब्दाचा अर्थ आहे धक्का, खळबळ, झटका वगैरे. नावाप्रमाणेच या चित्रपटाने खळबळ माजविली हे नक्की. सुपरस्टार विजय याची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. 

आतापर्यंत पोंगल किंवा दिवाळीच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याची प्रथा विजयने पाळली आहे. दोन वर्षांपूर्वी ‘कथ्थि’ आणि गेल्या वर्षी ‘तेरी’ या चित्रपटानंतर ‘मेर्सल’ने ही परंपरा पुढे नेली आहे. सणासुदीच्या निमित्ताने प्रेक्षकांना आकर्षित करायचे आणि जमेल तेवढा गल्ला जमवायचा, ही विजय किंवा त्याच्या निर्माता-दिग्दर्शकांची खुबी. आतापर्यंत ही भट्टी जमून आली. यंदा त्या भट्टीला तडका मिळाला तो वस्तू व सेवा कराबाबतच्या (जीएसटी) संवादाने. 

या संवादावर तमिळनाडूतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भावना दुखावल्या म्हणे आणि त्यांनी त्यावर आक्षेप घेतला. यात विजयच्या तोंडी असलेल्या ‘जीएसटी’बाबतच्या संवादात चूक आहे म्हणून हा संवाद काढून टाकावा, अशी मागणी लगेच भाजप नेत्यांनी केली. राज्य भाजपच्या अध्यक्षा तमिळिसै सौंदरराजन आणि राष्ट्रीय चिटणीस एच. राजा यांनी हा संवाद काढून टाकण्याची मागणी केली. आता त्यांनी विरोध केला म्हणजे जे काय पडद्यावर दिसेल ते चांगले आणि योग्यच असेल, असा विश्वास उरी बाळगून विरोधकांनी चित्रपटाची (आणि विजयची) पाठराखण केली. झाले, बघता-बघता एक साधा मारधाडपट राजकीय स्टंट बनला आणि त्याचा बंपर फायदा ‘मेर्सल’ला झाला. 

आता यातली गंमत पाहा. ‘जीएसटी’ला विरोध करणारा संवाद चित्रपटात आहे म्हणून प्रेक्षकांनी ‘मेर्सल’ला गर्दी करायची. अन् त्यांच्या तिकिटातून मिळालेल्या रकमेवरच जीएसटी मिळणार आणि सरकारची तिजोरी भरणार! पण विरोधा-विरोधाच्या खेळात अशा तपशीलांकडे आणि विसंगतीकडे कोण पाहणार? फार कशाला, नायकाच्या रूपाने विजयच्या तोंडी देशातील वैद्यकीय सेवा व्यवसायावर बरेच भाष्य आले आहे. या टिप्पणीमुळे आमचा अपमान झाला आहे, असा निषेधाचा सूर सरकारी डॉक्टरांनीही काढला होता. परंतु भाजपच्या तुतारीपुढे त्या पिपाणीचे काही चालले नाही अन् तो विषय तिथेच थांबला.

जाऊ दे, प्रश्न तो नाही. प्रश्न हा आहे, की ‘मेर्सल’चे आंधळे समर्थन करणाऱ्यांनी आणि आंधळा विरोध करणाऱ्यांनी त्यात काय दाखवलेय हे पाहिले तरी आहे का? पाहिले असते तर त्यात स्तुती करण्यासारखे त्यांना बरेच काही दिसले असते. सर्वांत आधी चित्रपटाचा नायक विजय याच्याबद्दल. तमिळ चित्रपटसृष्टीत विजय याला आतापर्यंत इळैय दळपती (तरुण नेता) म्हणून ओळखले जात होते. या चित्रपटातून त्याला दळपती (नेता) पदापर्यंत बढती मिळाली आहे. (तमिळनाडूत दळपती हे द्रमुक पक्षाचे नेते एम. के. स्टॅलिन यांचे नामाभिधान आहे; मात्र त्यांनी यावर काही आक्षेप घेतलेला नाही, हे सुदैवच). या चित्रपटाला ए. आर. रेहमानने संगीत दिले आहे. हिंदीतील ‘अंधा कानून’ आणि’ गिरफ्तार’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक चंद्रशेखर यांचा विजय हा मुलगा. अॅटली या दिग्दर्शकाने हा चित्रपट बनविला असून, सामाजिक मुद्द्यांवर चित्रपट काढण्याबाबत त्याची ख्याती आहे. चित्रपटासाठी १३० कोटी रुपये खर्च आला आहे; मात्र आतापर्यंत २०० कोटी रुपयांच्या जवळपास कमाई करून त्याने सगळी गुंतवणूक वसूल केली आहे. यात अर्थातच डिजिटल इंडिया आणि ‘जीएसटी’च्या वादाचा मोठा वाटा आहे. आता हाच चित्रपट तेलुगूमध्ये ‘अदिरिंदि’ या नावाने येत आहे आणि त्यातूनही भरघोस कमाई होण्याची शक्यता आहे.

अन् गंमत इथेच सुरू होते. ‘मेर्सल’मध्ये अथपासून इतिपर्यंत तमिळ भाषा व तमिळ संस्कृतीचे गुणगान आहे. पहिल्याच प्रसंगात वेष्टी (लुंगी) आणि खादीच्या सदऱ्यावर जाणाऱ्या नायकाची पॅरिसच्या विमानतळावर झडती घेण्यात येते. त्या वेळी ‘कपड्यांवरून आणि रंगावरून कोणाची किंमत ठरवू नये,’ असा सल्ला हा डॉक्टर नायक अधिकाऱ्यांना देतो. नंतर एका पुरस्कार सोहळ्यात आंतरराष्ट्रीय समुदायापुढे तो तमिळ भाषेतच बोलतो. ‘जगातील सर्वांत जुन्या आणि सर्व भाषांची जननी असलेल्या माझ्या मातृभाषेतच मी बोलणार,’ असा निश्चय तो व्यक्त करतो.

‘मेर्सल’मध्ये विजयची तिहेरी भूमिका असून, तिसऱ्या पात्राचा प्रवेश पंजाबमधील प्रसंगात होतो. अलीकडच्या बहुतेक सर्व व्यावसायिक तमिळ चित्रपटांचे हे लक्षण बनले आहे. तमिळ भाषेत तयार होत असले, तरी त्यांची कथा तमिळनाडूबाहेर किंवा कधी-कधी देशाबाहेरही घडते. सूर्याचा ‘अंजान’ मुंबईत घडतो, अजितचा ‘वेदाळम’ कोलकात्यात घडतो. खुद्द विजयचा ‘तुप्पाक्कि’ (हिंदीतील अक्षयकुमार अभिनित ‘हॉलिडे’) आणि ‘तलैवा’ हे चित्रपट तमिळनाडूचा अवाक्षरानेही संदर्भ न येता ऑस्ट्रेलिया व मुंबईत घडतात. ‘मेर्सल’चा मुख्य नायक वेट्रिमारन पंजाबमध्ये कुस्ती लढतो आणि पंजाबी मल्लाला हरवितो. त्यानंतर तो गाणे म्हणतो ते म्हणजे ‘आळपोरान तमिळन’ (राज्य करणार तमिळ व्यक्ती). तमिळनाडूत परत येऊन तो जल्लिकट्टू खेळतो. 

त्यानंतर त्याच्या मुलाला तो कसा जन्मला, याची कथा सांगताना वेट्रिमारन त्याला या पंजाबी लोकांच्या उदारतेची कथा सांगतो. (त्याची पत्नीही पंजाबी दाखवली आहे). कुठलाही ठावठिकाणा माहीत नसताना त्या लोकांनी मदत केली, म्हणूनच तुझा जन्म झाला असे त्याला सांगतो. याचा अर्थ गैर-तमिळांविरुद्ध द्वेष न पसरवता तमिळनाडूची भलामण त्यातून करण्यात आली आहे. ‘तुप्पाक्कि’मध्ये नायकाच्या (विजय) तोंडी देशभक्तिपर संवाद होते; पण त्यात तमिळवादाचा लवलेशही नव्हता. येथे तो आहे; मात्र त्याचा एकूण भारतीयतेवर परिणाम होत नाही, हीच त्याची खुबी आहे. जयललिता यांच्या निधनानंतर तमिळनाडूत राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून काही जणांनी याकडे पाहिले, तर नवल नाही.

...पण ‘मेर्सल’च्या एकूण आशयामध्ये एक शतांशही नसलेल्या किरकोळ संवादावरून वादळ उठते काय आणि सगळा विषय भरकटत जातो काय! अलीकडच्या प्रथेप्रमाणे लवकरच हा चित्रपट हिंदीत डब होऊन वाहिन्यांवर येईलही, तेव्हा तरी हे पैलू चित्रपटात शाबूत राहावेत, हीच इच्छा.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link