Next
राह पकड तू एक चलाचल...
BOI
Thursday, September 20, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:एकाच प्रकारचे दृश्य घटक घेऊन त्यातील सर्व शक्यतांचा धांडोळा गेल्या एक दशकाहून अधिक काळ राजाराम होले हे चित्रकार घेत आहेत. अशा शक्यता पडताळून पाहण्यासाठी खूप धीर लागतो. वारंवारिता हा डिझाइनचा प्रकार होले वापरतात. होलेंच्या एकूण कारकिर्दीकडे पाहताना हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ काव्यसंग्रहातील ‘राह पकड तू एक चलाचल, पा जाएगा मधुशाला’ या ओळींची आठवण होते. ‘स्मरणचित्रे’ सदरात आज आस्वाद राजाराम होले यांच्या चित्रांचा...
..............
पंडोल आर्ट गॅलरीच्या भिंतीवर जणू आकाशगंगा अवतरली होती. चहूबाजूंना लावलेल्या चित्रांमध्ये लहान लहान ठिपक्यांनी तयार झालेली वर्तुळे आणि त्यांच्या तरंगण्याने चित्रातील अवकाशाला प्राप्त होणारा अर्थ हे सगळे मोहक होते. चित्रकार राजाराम होले यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे हे दृश्य. लहान लहान ठिपके, बारीकसारीक रेषा, त्यांना एखाद्या मालेत गुंफावे तसे या आकारांना होले यांनी गुंफलेले होते. ही गुंफण सहज, पण नेटकी म्हणावी अशी. या प्रदर्शनात दोन प्रकारची चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती. एक पेन्सिल, पेनचा वापर केलेली रेखाचित्रे आणि दुसरे म्हणजे काही कॅनव्हास. 

कॅनव्हासवर अंतरावरून रंगाचे ठिपके टाकले, म्हणजे ते थोडे पसरतात. त्यातील वर्तुळाकार तसाच राहतो, परंतु कडा थोड्या पुढे-मागे होतात. या तंत्राचा खूप गांभीर्याने, काळजीपूर्वक आणि कल्पकतेने वापर करून होले यांनी ही चित्रे केली होती. गडद अवकाशावर फिकी आकाशगंगा वाटावी, असे हे ठिपके वर्तुळाकाराच्या माळेत गुंफले गेले होते. रूढ अर्थाने होले यांची ही चित्रे अमूर्त रूपाची आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मी मुद्दाम मुंबईला गेलो होतो. होले यांचे चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण पुण्याला झालेले आहे. त्यामुळे मला त्यांच्या चित्रांबाबत विशेष आस्था आहे, उत्सुकता असते. ते मूळचे भीमाशंकरच्या जंगली भागातील. होलेंच्या एकूण कारकिर्दीकडे पाहताना हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ काव्यसंग्रहातील ‘राह पकड तू एक चलाचल, पा जाएगा मधुशाला’ या ओळींची आठवण होते. 

एकाच प्रकारचे दृश्य घटक घेऊन त्यातील सर्व शक्यतांचा धांडोळा गेल्या एक दशकाहून अधिक काळ हा चित्रकार घेत आहे. अशा शक्यता पडताळून पाहण्यासाठी खूप धीर लागतो. वारंवारिता हा डिझाइनचा प्रकार इथे होले वापरतात. आपल्याकडे किंवा इतरही प्राचीन संस्कृतींमध्ये आवर्तन प्रक्रियेला महत्त्व आहेच. काही श्लोक, ऋचा वारंवार म्हणण्याची प्रक्रिया म्हणजे आवर्तन परंपरेचे उत्तम उदाहरण आहे. भारतातील अनेक आधुनिक चित्रकार आपल्या चित्रात या वारंवारितेच्या शक्यतांचा धांडोळा घेताना दिसतात. राजाराम होले त्यापैकीच एक म्हणायला हवेत. चित्रघटकाची आणि अवकाशाची शक्यता लक्षात घेऊन एक तोल साधू पाहण्याचा वेध होले आपल्या चित्रातून घेताना दिसतात.  

होले यांच्या चित्रप्रतलात हे ग्रह-ताऱ्याप्रमाणे अवकाशात विशिष्ट आसाभोवती फिरणारे गोळे शिस्तबद्ध वाटतात. ते आपली कक्षा कदापिही सोडणार नाही, असे निक्षून सांगतात. त्या ठिपक्यांचा एकमेकांशी चिरपरिचय आहे किंवा ते एकमेकांशी गुरुत्वाकर्षणासारख्या शक्तीने गुंतले गेले आहेत असे वाटते. हे सगळे पाहण्यासाठी प्रत्येक चित्राला आपण वेळ द्यायला हवा. एकूणच कोणतेही चित्र पाहायला आपण किती वेळ देतो, यावर त्या चित्राची मजा आपण घेऊ शकतो की नाही, हे ठरते. मी ही चित्रे बराच वेळ देऊन पाहिली होती. त्यातील बारीकसारीक तपशील लक्षात राहिला आहे. होले यांची पेन्सिल माध्यमातील रेखाचित्रे खूप तरल स्वरूपाची होती. एखाद्या शास्त्रज्ञाच्या गणित मांडण्याच्या आवेशात होलेंनी ही पेन्सिल ड्रॉइंग केलेली वाटतात.

होले यांच्या कलेचा प्रवास पुण्यातून सुरू झाला. विद्यार्थिदशेत ते उत्तम रियाज करत. व्यक्तिचित्रे व कलेच्या मूलतत्त्वावर त्यांनी उत्तम पकड मिळवली होती. भाषेच्या मर्यादा लक्षात घेऊन नवकलेतील विचार समजावून घेण्यासाठी त्यांनी चित्रकारांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच भारतीय समकालीन कलेतील गायतोंडे यांच्यासारख्या चित्रकाराचा मर्यादित सहवास त्यांना लाभला. चित्रकार विजय शिंदे, लक्ष्मण श्रेष्ठा यांचे विचार आणि चित्रप्रवास अभ्यासतानाच त्यांनी चित्रातील प्रयोग सुरू ठवले. आपले वास्तव्य पुण्यामधून मुंबईत हलवून ते मुंबईस्थित चित्रकार झाले. शांतपणे आपल्या चित्रांवर सर्व लक्ष केंद्रित करून होलेंनी चित्रकाम सुरू ठेवले. चित्रकार दिलीप रानडे, श्रेष्ठा व दादीबा पंडोल यांनी त्यांना शक्य ते सहकार्य केले. 

पुढे त्यांना ललित कला अकादमी, भारत सरकार यांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या सर्वांत उल्लेखनीय म्हणजे त्यांना चित्रकलेत प्रयोग करण्यासाठी जगभरात प्रतिष्ठेची मानली गेलेली जॅक्सन पोलॅक फाउंडेशनची फेलोशिप एका वर्षासाठी मिळाली. द्विमित चित्रांबरोबरच त्रिमिती दृश्येही त्यांनी करून पहिली. त्यामध्ये वर्तुळाकाराच्या शक्यता व त्यांच्या ब्रह्मांड चित्रप्रतलावर उतरवण्याच्या प्रयत्नांना त्रिमित रूप दिले होते. 

देश-विदेशात त्यांची चित्रप्रदर्शने होत असतात. प्रवासादरम्यान चित्रकलेसंदर्भातील संग्रहालये, दालने पाहणे सुरू असते. एक प्रकारची सकारात्मक दृष्टी या चित्रकाराकडे आहे आणि म्हणूनच ते अवकाशातील विश्वरूपाच्या कल्पनाविस्तारातून आपली अमूर्त चित्रे अखंड शोधक वृत्तीने चितारत असतात. 

एखादा आर्टिस्ट कसा जगतो? आपल्याला तसे जगता आले पाहिजे. प्रत्येकाची चित्रभाषा वेगळी असली, तरीही कलावंत म्हणून अनुभवसमृद्ध जगण्यात होले यांना रस आहे.


- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Manisha shinde About 245 Days ago
Khupach change! !!!!!!!!!!!!!☺
2
0
Naresh Shirkar About 267 Days ago
अतिशय सुंदर लेख!!!👌💐
7
0
Iqbal Manekia About 268 Days ago
Superb work!!!!!!!!!!!!!!!!!
11
0
Shirish Agarwal About 268 Days ago
Love your work RB Holle Sir. Following you and your art work regularly.
10
1
Kanchan Kadam About 268 Days ago
Nitin Sir yanni lihilela article appratem ahe. R.B.Holle Sir va Nitin Sir ya doghana hi khup khup Subhecha.
8
0
Khushi Sharma About 268 Days ago
I like this Article very much! It helped me to know this eminent artist more, including his voyage through space. Thanks for creating this article Hqdap Sir!!
8
0
Dinesh Nilam About 268 Days ago
खूप छान लेख.....
6
0
RIVA ARTS About 268 Days ago
Dr. Nitin Hadap - Congratulations on the well written article on Mr.Holle 's artistic journey.
9
0
Mandar Sarfare About 269 Days ago
हे लेख खुप छान लिहिला आहे,अप्रतिम, महिती व ज्ञान साठी डॉ हडप सर व 'बाइट्स ऑफ इंडिया 'च खुप आभार,,,
10
0
Keshav Kasar About 270 Days ago
वाह नितीन , राजारामची चित्रे अतिशय सोप्या भाषेत उलगडून दाखवलीस. 👍🏻🌷😍
13
0
Darshana virendra Shah About 270 Days ago
Fantastic work
10
0
Digambar Raundhal About 270 Days ago
Amachya Rajula ani tyachya chitrana samajun umajun atishay surekh ritya shabdabaddha kelyabaddal dhanyawad. Italy madhil chitra pradarhanasathi Raju tula khup khup shubheccha!!
17
0
Shilpa hadap About 270 Days ago
Lekh chan zala aahe. Kharokharach asha prakarchya mhanje abstract padhdhatichya chitranna kase baghawe. Chitra baghayala wel dila ki ti samjayala haluhalu madat hote.asha goshti samajalya. Kuthalyahi goshtila vel dene mahatwache asate. Art Gallerymadhe jaun window shopping karatat tyaprane chitra baghun jane yogya nahi ase mala manapasun watale.
20
1

Select Language
Share Link
 
Search