Next
मासिक पाळी, पर्यावरण संवर्धन आणि सानिया!
BOI
Thursday, April 12, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

सानिया भालेरावमासिक पाळी हा अर्ध्या दुनियेशी निगडित विषय असला, तरी त्याबद्दल उघडपणे बोललं जाण्याचं प्रमाण अजूनही तुलनेनं कमी आहे. मासिक पाळीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅड्ससाठी, वापरण्यास सुलभ, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित असा एक पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे मेन्स्ट्रुअल कप्स. या मेन्स्ट्रुअल कप्ससंदर्भात जागृतीचं महत्त्वपूर्ण काम करणारी मुलगी म्हणजे सानिया भालेराव. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी पर्यावरणपूरक उत्पादनंही तिनं विकसित केली आहेत. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज जाणून घेऊ या मासिक पाळीसंदर्भातील शास्त्रीय माहिती आणि सानियाच्या कामाच्या वेगळेपणाबद्दल...
..............
अक्षयकुमार आणि राधिका आपटे यांची प्रमुख भूमिका असलेला आणि आर. बाल्की या ख्यातनाम दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला ‘पॅडमॅन’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी बघितला. हा चित्रपट खूपच संवेदनशील आणि कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या विषयावर बेतलेला होता. तमिळनाडू राज्यातल्या कोइमतूरमधल्या अरुणाचलम् मुरुगनंथम या तरुणानं स्वतः विकसित केलेले पॅड्स बनवण्याचे मशीन देशातल्या २३ राज्यांत आणि १०६ देशांमध्ये पोहोचवले आणि अतिशय स्वस्त दरांत स्त्रियांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. पुरेसं शिक्षण नसतानाही केवळ स्त्रियांचं दुःख न बघवलं गेल्यानं मुरुगनंथमनं एकच ध्यास घेतला. अपमान, कुचेष्टा, उपेक्षा आणि बदनामी पदोपदी वाट्याला आली; पण तो काम करतच राहिला आणि अखेर आपल्या ध्येयप्राप्तीत तो यशस्वी झाला. २०१४ साली टाइम मॅगझिननं जगभरात प्रभाव टाकणाऱ्या १०० लोकांच्या यादीत मुरुगनंथमचं नाव समाविष्ट केलं. २०१६ साली भारत सरकारनं त्याला पद्मश्री देऊन गौरवलं आणि हा पॅडमॅन भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी एक अभिमानाचा आणि कौतुकाचा विषय बनला. या अरुणाचलम् मुरुगनंथम या तरुणाची गोष्ट या ‘पॅडमॅन’मध्ये चित्रित केली आहे. मुळात अशा विषयावर जाहीर बोलण्याचं धाडस निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांनी केल्यामुळे मनाला एक सुखद धक्का बसला. कारण असे चित्रपट काढल्यावर व्यावसायिकदृष्ट्या ते चालतील किती, ही खूप मोठी जोखीम होती. तरीही हा चित्रपट निघाला. तो प्रचंड चालला. थोडक्यात, मासिक पाळी या विषयाबद्दल पुन्हा पुन्हा बोललं गेलं पाहिजे, मुलींना, स्त्रियांना याबद्दलची माहिती सतत दिली गेली पाहिजे. त्यांच्या मनातल्या चुकीच्या कल्पना, गैरसमज दूर केले पाहिजेत; त्यांच्याच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक पुरुषालाही हे प्रश्न कळले पाहिजेत, असं तीव्रतेनं वाटलं. या संदर्भात लोकशिक्षणाचं कार्य करणाऱ्या एका उच्चशिक्षित मुलीबद्दल आणि तिच्या कार्याबद्दल आपण आज पाहणार आहोत. त्याआधी मासिक पाळीसंदर्भातील थोडी शास्त्रीय माहिती पाहू या.

साधारणतः मुलीच्या वयाच्या १२-१३व्या वर्षापासून मासिक पाळी सुरू होते. मासिक पाळीचं नियंत्रण मेंदूमधल्या पिट्यूटरी ग्रंथीकडे असतं. मुलीच्या बीजांड कोषातून स्त्रीबीज मासिक पाळीच्या चौदाव्या दिवशी बाहेर पडतं. त्यामधून कॉर्पस ल्युटियम ही पेशी तयार होते. या पेशीतून प्रोजेस्टेरॉन नावाचं संप्रेरक तयार होतं. पाळीच्या पहिल्या १४ दिवसांत इस्ट्रोजेन या संप्रेरकामुळे गर्भाशयाचं अस्तर वाढू लागतं आणि चौदाव्या दिवसानंतर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांमुळे गर्भाशयाच्या अस्तराची वाढ होत राहते. त्यामुळे त्यामध्ये स्राव निर्माण करणाऱ्या ग्रंथी वाढू लागतात. अशा वेळेला गर्भाशयाचं अस्तर बाहेर टाकलं जातं. यालाच पाळी असं म्हटलं जातं. ही सगळी प्रक्रिया पिट्यूटरी ग्रंथीमुळे होते. मासिक पाळीचं हे नियमित चक्र त्या स्त्रीच्या वयाच्या ४५ ते ५० वर्षांपर्यंत सुरू असतं. 

खरं तर जीवनावश्यक असलं तरी काही विषयांवर बोलायचं नसतं, असा एक मोठा गैरसमज आपल्याकडे रुजला आहे. मासिक पाळीपासून सुरू झालेला एखाद्या मुलीचा प्रवास पुढे अनेक वळणं घेत जात राहतो. मासिक पाळी, लग्न, बाळंतपण, मेनोपॉज या सगळ्या बदलांना सामोरं जाण्याइतकी तिची मानसिक तयारी करणं खूप गरजेचं आहे. या सगळ्यांमध्ये मासिक पाळी ही गोष्ट कुठल्याही मुलीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक घरांमध्ये आजही या गोष्टींना अनेक दंतकथा चिकटवून बघितलं जातं. मुलगी वयात आली म्हणत, तिच्यावर अनेक बंधनं लादली जातात. या चार दिवसांत तिच्यातला आत्मविश्वास गळून कसा पडेल असंच वातावरण आसपास दिसतं. अनेक ठिकाणी हे चार दिवस तिच्या आयुष्यातले अंधारलेले असावेत असं गृहीत धरलं जातं. तिनं त्या काळात वापरायचे कपडे, त्याची स्वच्छता, तिला त्यासाठी हवा असलेला वेळ आणि तिला समजून घेण्याचे केलेले प्रयत्नदेखील खूप महत्त्वाचे आहेत. मासिक पाळी म्हणजे काय, ती का येते, तिचं महत्त्व काय, त्या काळात काय काळजी घ्यावी, याबद्दल आजही आपण फार उघडपणे बोलत नाही. जणू हा विषय लाजिरवाणा असल्याप्रमाणे आपण वर्ज्य केला आहे. बोलला गेला तरी मुलांना त्यापासून दूर ठेवलं जातं. मुलांनाही या विषयाची सखोल माहिती योग्य त्या वयात होणं गरजेचं आहे. कारण उद्या त्यांच्या आयुष्यात येणारी त्यांची मैत्रीण, त्यांची बायको, त्यांची मुलगी आणि त्यांची आई या सगळ्या स्त्रियांना समजून घेणं सोपं जाण्याची ती महत्त्वाची परीक्षा आहे; पण असं क्वचितच घडताना दिसतं. 

प्रत्येक महिन्याला येणारी मासिक पाळी आणि तिच्यातून जाताना त्या स्त्रीनं काय योग्य काळजी घ्यावी याकडे बघताना त्यासाठीची साधनं, उपाय याकडेही बघावं लागणार आहे. कारण हा शेकडो, हजारो नव्हे, तर लाखो स्त्रियांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. सॅनिटरी पॅड किफायतशीर दरांत मिळणं आणि त्यांची योग्य ती विल्हेवाट लावणं याबद्दलची जनजागृतीही खूप आवश्यक आहे; मात्र या सॅनिटरी पॅडला किंवा कपडे वापरण्याला खूप चांगला पर्याय उपलब्ध आहे आणि तो बहुतांश मुलींना, स्त्रियांना ठाऊक नाही. त्याबद्दल ठिकठिकाणी प्रबोधन होणं आवश्यक आहे. 

आपल्याकडे सध्या काही स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्ते सध्या या कामात सक्रियपणे उतरले आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. या क्षेत्रातली मला ठाऊक असलेली मुलगी.... कार्यकर्तीच म्हणू या हवं तर... ती आहे सानिया भालेराव! सानिया मला भेटली फेसबुकवर! ही मुलगी मला आवडली.... अभ्यासू, अनेक विषयांची आवड असलेली, पर्यावरणप्रेमी, चांगलं लिखाण करणारी, एक सुजाण आणि सजग नागरिक म्हणूनही मला भावलेली!

सानियानं काही वर्षांपूर्वी सॅनिटरी पॅड्सची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावण्यासंदर्भात एका स्वयंसेवी संस्थेसोबत काम केलं होतं. सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट कशी लावायची याबद्दलची जागृती नसल्यामुळे अनेक स्त्रिया अयोग्य पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावत असल्याचं सानियाच्या लक्षात आलं. खरं तर भारतातल्या फक्त १२ टक्के स्त्रिया मासिक पाळीत सॅनिटरी पॅड्स वापरतात, असं सर्वेक्षणातून लक्षात आलंय. ही टक्केवारी किती अचूक आहे, याबद्दल मात्र दुमत आहे. ‘क्लीन इंडिया जर्नल’मध्ये दिलेल्या अहवालानुसार नऊ हजार टन सॅनिटरी कचरा म्हणजे साधारणतः ४३२ कोटी सॅनिटरी पॅड्स एका वर्षात डम्प केली जातात. त्यातली ८० टक्के पॅड्स टॉयलेटमध्ये फ्लश केली जातात किंवा उघड्यावर फेकली जातात. ही पॅड्स जैवविघटनशील नसतात. सफाई कामगारांना स्वतःच्या हातानं कचरा वेगळा करावा लागत असल्यानं त्यांना ती हाताळावी लागतात. त्यामुळे त्यांना श्वसनाचे आणि त्वचेचे रोग होण्याचा फार मोठा धोका असतो. 

मेन्स्ट्रुअल कप

हे दुष्टचक्र टाळण्यासाठी उपाय काय, हे सांगण्याचं काम सानिया करते आहे. सॅनिटरी पॅड्सवरचा उपाय म्हणून मेन्स्ट्रुअल कपचा पर्याय ती सुचवते आहे. हा पर्याय पर्यावरणस्नेही आणि सुरक्षित असल्याचं तिचं म्हणणं आहे. एक मेन्स्ट्रुअल कप साधारणपणे सहा ते १० वर्षांपर्यंत वापरता येतो. त्याचं निर्जंतुकीकरण करणं सोपं असतं. पाळी सुरू झाल्यानंतर १२व्या वर्षापासून ते पाळी संपेपर्यंतच्या ५५ वर्षापर्यंतच्या सर्व स्त्रियांना हा कप पाळीच्या दिवसांत वापरता येतो. सिलिकॉनपासून बनलेला हा कप दोन ते तीन आकारांमध्ये मिळतो. किशोरवयीन मुलींकरिता ‘एस साइझ’ तर २० ते २५ वर्षांवरच्या स्त्रियांसाठी एम किंवा एल साइझ. आपल्याला सोयीचा होईल, चांगला बसेल आणि चांगल्या ब्रँडचा असेल, असा कप निवडणं सुरुवातीला कठीण होऊ शकतं; पण सानियासारखे कार्यकर्ते याबद्दलची जागृती करतात आणि इंटरनेटवरही यासंबंधीची खूप माहिती उपलब्ध आहे. अगदी व्हिडिओजदेखील उपलब्ध आहेत. आपल्याकडे वयात येणाऱ्या मुलींना हे कप वापरण्याचा सल्ला कोणी देत नाही, कारण याबद्दल पसरलेले गैरसमज! या कपमुळे अविवाहित मुलींचं योनिपटल म्हणजेच हायमेन फाटण्याची शक्यता असते, अशी भीती पसरवली जाते. योनिपटल हे लग्नानंतर पहिल्या स्त्री-पुरुष संबंधानंतरच फाटलं गेलं पाहिजे, असा एक मोठा गैरसमज आपल्या समाजात पसरलेला आहे. हायमेन काही कारणानं आधीच फाटलं गेलं, तर तिच्या चारित्र्याविषयीचे प्रश्न समाजामध्ये चर्चेचे बनतात. 

खरं तर मेन्स्ट्रुअल कप अणि योनिशुचिता (व्हर्जिनिटी) यांचा काहीही संबंध नाही. शरीरविज्ञान शिकणाऱ्यांना हे ठाऊक असेलच. सानियानं अनेक गायनॅकॉलॉजिस्ट मंडळींचे रिसर्च पेपर्स वाचले. सगळा मुद्दा योनिपटलाजवळ थांबतो. योनीमध्ये हायमेन हा एक पडदा असतो आणि त्याच्या फाटण्यावरून ती मुलगी कुमारिका आहे की नाही हे समजतं. कित्येकदा हे हायमेन जन्मतःच नसतं किंवा खेळताना, धावताना किंवा इतर हालचालींमुळे फाटलेलं असतं. पाळी सुरू होते तेव्हा पाळीच्या रक्तस्रावाच्या वेळी त्या पडद्याला म्हणजेच हायमेनला बारीक बारीक छिद्रं पडतात. त्यामुळे कुठल्याही मुलीची योनिशुचिता किंवा व्हर्जिनिटी ही त्या हायमनच्या असण्यानं आणि नसण्यानं ठरत नाही. अगदी वैज्ञानिक भाषेत बोलायचं झालं, तर जेव्हा स्त्री-पुरुष यांचा शरीरसंबंध घडतो, म्हणजे पुरुषाचं लिंग स्त्रीच्या योनीमध्ये जातं, तेव्हा ती स्त्री आपली व्हर्जिनिटी गमावते. त्यामुळे त्या आधी हा व्हर्जिनिटीचा मुद्दा कोणीही फार मोठा करू नये. 

एखाद्या मुलीला ११व्या वर्षी मासिक पाळी सुरू झाली, तरी ती मेन्स्ट्रुअल कप वापरू शकते. किशोरवयीन मुलींसाठी एस किंवा एम साइझचा कप निवडता येतो. मुलीच्या आईनं स्वतः शिकून मुलीला हा कप वापरण्यासाठी मदत केली, तर मुली अतिशय मोकळेपणानं हा कप वापरू शकतील आणि अनेक कुमारिका योनिशुचितेसारख्या बुरसटलेल्या कल्पनांपासून दूर राहतील. 

हा कप वापरायचा कसा? हा कप निघून गेला तर, किंवा अडकून बसला तर? हा कप बसवल्यानंतर बाथरूमला जाता येतं का, असे अनेक प्रश्न मुलींना आणि प्रौढत्वाकडे झुकणाऱ्या मध्यमवयीन स्त्रियांना पडू शकतात. त्याबद्दल मार्गदर्शन करण्याचं, जागृती करण्याचं काम सानिया करते. हा मेन्स्ट्रुअल कप ४५ अंशांच्या कोनातून ‘सी फोल्ड’ करून आत सरकवायचा असतो. १२ तासांनी तो काढायचा. रिकामा करायचा, स्वच्छ करायचा आणि पुन्हा आत सरकवायचा. आपल्याला होणाऱ्या रक्तस्रावाप्रमाणे हा कप रिकामा करण्याची वेळ निश्चित करता येते. या कपची सुरक्षितता इतकी आहे, की एकदा तो आत नीटपणे बसवला, की अगदी पोहण्याच्या तलावात बिनधास्त पोहताही येतं. तो कप निघण्याची भीती बाळगण्याचं कारणच राहत नाही. हा कप बसवलेला असताना टॉयलेटला आरामात जाता येतं. कारण लघवीचा मार्ग वेगळा असतो आणि योनीतून रक्तस्राव होण्याचा मार्ग वेगळा असतो. लघवी ही युरेथ्रा या योनीच्या वरच्या भागातून येते. हा एक कप चारही दिवस आणि पुढल्या मासिक पाळीमध्ये वापरता येतो आणि वर सांगितल्याप्रमाणे अगदी १० ते १२ वर्षं पुन्हा पुन्हा विकत घेण्याची कटकटही राहत नाही. सिल्की कप, शी कप, व्ही कप, ल्यूनेट कप, रुबी क्लीन कप अशा ब्रँडचे मेन्स्ट्रुअल कप विकत मिळतात. या कपची किंमत साधारणतः ३०० रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत असते.

मुलगी वयात येते किंवा तिच्या आयुष्यातला बदलाचा एक टप्पा वयाच्या १२ ते १४ वर्षांच्या काळामध्ये येतो, त्या वेळी त्या मुलीची मानसिक स्थिती, या बदलाविषयीची तिला दिली जाणारी माहिती, तिच्या पालकांनी, तिच्या कुटुंबीयांनी तिच्याशी कसं वागलं पाहिजे, याविषयीची काही व्यवस्था आपण करतो आहोत का, याचा विचार केला, तर आपण आता शाळाशाळांमधून लैंगिकता हा विषय शिकवतो आहोत. शाळेत एक समुपदेशक आठवड्यातून एकदा मुलामुलींशी संवाद साधायला, त्यांच्या मनातल्या समस्या समजून घ्यायला उपलब्ध केले गेले आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक शाळांनी या बाबतीत पुढाकार घेतला आहे. तसंच डॉ. आनंद नाडकर्णी यांचा जिज्ञासा उपक्रमदेखील अनेक शाळांमधून राबवला जातो. मनोविकास प्रकाशनानं प्रकाशित केलेलं अनु गुप्ता लिखित ‘लेकीला उत्तर हवंय’ हे पुस्तक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीनं वाचावं असं आहे. या पुस्तकाचा मराठीतून अनुवाद सविता दामले यांनी अतिशय सोप्या शब्दांत आणि रंजकपणे केलाय. मुलीच्या मासिक पाळीपासून ते रजोनिवृत्तीपर्यंतची माहिती आकृत्यांसह यात आहे. शरीर आणि मन निरोगी बनण्यासाठी अशा पुस्तकांची, प्रबोधनाची आज खूप खूप आवश्यकता आहे. तेच काम सानिया भालेराव करते.

सानिया अनेक ठिकाणी, अनेक शाळांमध्ये, अनेक वस्त्यांमध्ये, सोसायट्यांमध्ये जाऊन मासिक पाळी आणि अन्य निगडित गोष्टींसंदर्भात संवाद साधते आणि मुलींचे, त्यांच्या पालकांचे गैरसमज दूर करते. सानियाचं काम खूप मोठं आहे. तिच्या या कामात तिच्याबरोबर अनेक कार्यकर्ते जोडले जाताहेत. तिच्या या कामाबरोबरच तिनं पर्यावरण संवर्धनाचं कामही हाती घेतलं आहे आणि आपल्या शिक्षणाचा वापर तिनं या कामासाठीच करायचं ठरवलं आहे. सानियाचं पुढलं शिक्षण आणि तिच्या आणखी एका कामाचा पैलू जाणून घेऊ या. 

सानिया भालेरावसानियानं फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये पदवी मिळवली. नंतर ‘गेट’ची परीक्षा उत्तीर्ण होऊन ती शिष्यवृत्ती मिळवून वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी) इथं बायोटेक्नॉलॉजी या विषयात एमटेक करण्यासाठी दाखल झाली. एमटेक करून सानिया पुण्यात परतली आणि पुण्यातल्या सिंहगड इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये तिनं असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली. एकीकडे उच्च शिक्षण घेतलेलं, तर दुसरीकडे त्या शिक्षणाचा उपयोग अध्यापनात करण्यात गुंतलेली असतानाही सानियाचं मन मात्र आणखी अभ्यासाकडे ओढ घेत होतं. त्यामुळेच २०१२ साली सानियानं लाइफ सायन्सेस या विषयात डॉक्टरेट केली. तसंच ‘एमटेक’साठीच्या स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करण्यासाठी एक इन्स्टिट्यूट तिनं सुरू केली. 

सानियानं तयार केलेली पर्यावरणस्नेही उत्पादनं

जीवित नदी आणि जलबिरादरी या जलसंवर्धनाबद्दल काम करणाऱ्या संस्थांसोबत सानियाची आई जोडली गेलेली असल्यामुळे याही विषयात सानियाचं मन खेचलं गेलं. ‘जीवित नदी’ या विषयावर लोकांशी बोलताना, त्यांचं प्रबोधन करताना कपडे धुण्याचा साबण, पावडर, भांडी घासण्याचा साबण, फिनेल यांच्या वापरानं नदीचं पाणी कसं दूषित होतं हे सांगत असताना यावर पर्याय काय असा प्रश्न पुढे आला. त्यातूनच सानियानं ‘फायटोकेमिस्ट्री’ या विषयाचा अभ्यास करून त्यात सखोल संशोधन केलं. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी पर्यावरणपूरक पर्याय शोधण्याच्या कामाला सानिया लागली. यातूनच वर्षभराच्या काळात सहा उत्पादनं तयार झाली. यात कपडे धुण्याचा द्राव (रीठाई), भांडी घासण्यासाठी पावडर (इको स्क्रब), सोनं-चांदी आणि इतर धातूंची भांडी स्वच्छ करण्यासाठीची पेस्ट (इकोप्रिन), फरशी स्वच्छ करण्यासाठी (इकोमॉप), टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी (इकोफ्लश) आणि हँडवॉश अशी नैसर्गिक, जैवविघटनशील आणि पर्यावरणस्नेही उत्पादनं सानियानं तयार केली. ही उत्पादनं वापरल्यानंतरचं पाणी झाडांना कुठलीही हानी पोहोचवत नाही. म्हणजेच या पाण्याचा पुनर्वापर चांगल्या रीतीनं करता येतो. या सहाही उत्पादनांचं क्वालिटी कंट्रोल (दर्जा नियंत्रण) परीक्षण सानियानं करून घेतलं आहे. फिश टॉक्सिसिटी, बायोडिग्रेडेबिलिटी, बीओडी, सीओडी, पीएच अशा अनेक चाचण्यांतून सानियाची ही उत्पादनं उत्तीर्ण झाली आहेत. 

‘जलबिरादरी’चे राजेंद्रसिंह यांनादेखील ही पर्यावरणस्नेही उत्पादनं आवडली आणि नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी ही उत्पादनं उपयुक्त असल्याचं सांगून त्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. ही उत्पादनं तयार करण्यासाठी अनेक गरजू महिलांना हातभार लावता आला आणि त्यांना रोजगारही उपलब्ध झाला. लवकरच वेगवेगळ्या बचत गटांच्या स्त्रियाही या उत्पादनांशी जोडल्या जाणार आहेत. ही सगळी उत्पादनं पुण्यातील कर्वे रोड येथील सस्टेनेबल लाइफस्टाइल स्टोअरमध्ये किंवा बाणेरमधील झेडबीएनई स्टोअरमध्ये मिळू शकतील. http://www.sustainablelifestylestore.com या वेबसाइटवर ही उत्पादने ऑनलाइनही मिळू शकतील. या उत्पादनांच्या सविस्तर माहितीसाठी http://ecosoul.in/ ही वेबसाइट पाहता येईल.

संपर्क : सानिया भालेराव
ई-मेल : saniya.bhalerao@gmail.com

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link