Next
‘माय नेम इज रागा’ : राहुल गांधींवरही येतोय चित्रपट
चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
BOI
Wednesday, February 13, 2019 | 02:46 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत सध्या चलती आहे ती चरित्रपटांची. त्यातही बॉलीवूडमध्ये राजकीय नेत्यांचे जीवनपट पडद्यावर आणण्याची जणू चढाओढच सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी यांच्यावरील आगामी चित्रपट यानंतर आता राहुल गांधी यांच्यावरही चित्रपट येत आहे. ‘माय नेम इज रागा’ या नावाने हा चित्रपट येणार असून नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 

पत्रकार रुपेश पॉल यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून राहुल गांधी यांचे बालपण, त्यांचे अमेरिकेतील शैक्षणिक जीवन आणि त्यांची विवादित राजकीय कारकीर्द यांवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या चित्रपटाच्या टीझरमध्ये चित्रपटातून दाखवल्या गेलेल्या गोष्टींचा अंदाज येतो. अभिनेता अश्विनी कुमार हा चित्रपटात राहुल गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येने चित्रपटाची सुरुवात होते आणि २०१९च्या निवडणुकांच्या देशातील वातावरणात चित्रपटाचा शेवट होतो असे समजते. चित्रपटाबाबत बोलताना रुपेश पॉल म्हणाले, ‘माझा कोणत्याही पक्षाशी अथवा नेत्याशी काहीही संबंध नाही, त्यामुळे अतिशय त्रयस्थपणे मी ही कथा लिहिली आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या गोष्टी पूर्णपणे सत्य असून त्या सर्वांना ज्ञात असलेल्या आहेत. त्यामुळे यासाठी परवानगी घेण्याची गरज पडणार नाही असे वाटते. या चित्रपटासाठी सुरुवातीला दिग्गज कलाकारांना घेण्याचा माझा मानस होता, परंतु सध्या देशात निवडणुकांचे वातावरण असताना त्यावरून वादंग होता कामा नये, या भूमिकेतून तसे केलेले नाही. कोणाचीही प्रतिमा मलिन करण्याचा माझा हेतू नक्कीच नाही’, असे मत त्यांनी मांडले. 

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच निवडणुकांच्या मध्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे, परंतु अजून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून ते अमेरिकेतील कोलिन्स कॉलेज, डेहराडूनमधील डून स्कूल अशा ठिकाणी करण्यात येत आहे. चित्रपटाचे १० टक्के शूटिंग जाणीवपूर्वक मागे ठेवण्यात आले असून, ते निवडणुकांच्या काळात होत असलेल्या खऱ्याखुऱ्या कार्यक्रमांमधून करण्यात येणार असल्याचे रुपेश पॉल यांनी सांगितले आहे. राजकीय व्यक्तीवर चित्रपट असल्याने या गोष्टींचे सध्या देशात असलेले वातावरण आणि होणारे कार्यक्रम यांचे चित्रण हुबेहुब करता येऊ शकले, तर त्याचा फायदा होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान काहीच दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही चित्रपट येत असल्याचे सांगण्यात आले होते, ते सर्वांनाच ठाऊक आहे. त्यात अभिनेता विवेक ओबेरॉय हा नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नरेंद्र मोदी यांचे जीवन अनेक नाट्यमय प्रसंगांनी आणि चढ-उतारांनी भरलेले असल्याने त्यांच्या या चित्रपटाबद्दल आपल्याला उत्सुकता असल्याचेही रुपेश पॉल यांनी म्हटले आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search