Next
खोट्या बातम्यांच्या प्रसाराबाबत जागरुकता मोहीम
बीबीसीतर्फे ‘बियाँड फेक न्यूज’ उपक्रम
BOI
Monday, November 12, 2018 | 04:16 PM
15 0 0
Share this article:

बीबीसीतर्फे आयोजित ‘बियाँड फेक न्यूज’ कार्यक्रमात बीबीसी न्यूज मराठीचे संपादक आशिष दीक्षित, माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले, माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे खासदार पृथ्वीराज चव्हाण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर सहभ

पुणे  :  ‘जगभरात खोट्या बातम्या अर्थात फेक न्यूजचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘बीबीसी’ या जागतिक संस्थेतर्फे ‘बियाँड फेक न्यूज’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत भारतासह नायजेरिया, केनिया या देशांमध्ये फेक न्यूजचा प्रचार कसा होतो यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांच्या वर्तनाचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यात आला आहे. भारतातील लोक खोट्या बातम्या पसरविण्यात भावनिक साद निर्णायक ठरत असल्याचा निष्कर्ष या अहवालात नोंदवण्यात आला आहे. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बीबीसी न्यूज मराठीचे संपादक आशिष दीक्षित, माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले, माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे खासदार पृथ्वीराज चव्हाण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर उपस्थित होते. 


 ‘राष्ट्र उभारणी’च्या हेतूने राष्ट्रवादासंदर्भातील बातम्या लोक शेअर करतात. बातमी किंवा मजकुराची पडताळणी करण्यापेक्षा सामुदायिक राष्ट्रीय ओळख या मुद्द्याला ते प्राधान्य देताना दिसतात असेही या अहवालात म्हटले आहे. 

हिंसा भडकेल अशा स्वरूपाचे संदेश पाठवण्यास भारतीय नागरिक तयार नसतात,तर केनिया आणि नायजेरियात फेक न्यूज म्हणून गणल्या जाणाऱ्या बातम्या किंवा मजकूर पाठवताना कर्तव्याची भावना असते;मात्र या दोन देशांमध्ये ही भावना राष्ट्रवादाशी संलग्न नसते. ब्रेकिंग न्यूज खरी असेल तर संबंधित व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम करणारी असू शकते या भावनेतून बातमी किंवा मजकूर पाठवला जातो. माहितीची उपलब्धता सगळ्यांना लोकशाही पद्धतीने मिळावी असे लोकांना वाटते, असेही दिसून आले. ती बातमी खरी आहे की नाही हे कोणीतरी तपासून बघेल आणि त्यांना सांगेल अशा अपेक्षेने भारत, केनिया तसेच नायजेरियातले लोक फेक न्यूज शेअर करतात, असेही या अहवालात नमूद केले आहे. 

बीबीसीतर्फे आयोजित ‘बियाँड फेक न्यूज’ उपक्रमाची माहिती देताना   बीबीसी न्यूज मराठीचे संपादक आशिष दीक्षित.

भारतात फेक न्यूजच्या प्रसारामागे राष्ट्रवाद हे प्रमुख कारण आहे. केनियात राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न, राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचे विषय, पैशांच्या आणि तंत्रज्ञानाच्या अफरातफरीची प्रकरणे याबाबतच्या फेक न्यूज व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वाधिक शेअर केल्या जातात. दहशतवाद, तसेच लष्कराविषयीच्या बातम्या नायजेरियात व्हॉट्सअपवरून मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जातात. चालू घडामोडींविषयी सतर्क असण्याविषयी जागरुकता आणि आग्रह अफ्रिकन देशांमध्ये दिसतो. विविध गोष्टींविषयी माहिती असणाऱ्या व्यक्तीला समाजात सहज मान्यता मिळते. या सगळ्या गोष्टींमुळे, माहितीचा स्रोत विश्वासार्ह आहे की नाही हे जाणून घेण्याची इच्छा असतानाही, खासगी वितरणातून फेक न्यूजचा प्रसार होतो. 

‘खोट्या माहितीच्या विरोधात आम्ही जगभर हा प्रकल्प राबवत आहोत. पश्चिमेकडील देशांमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये अर्थात फेक न्यूजविषयी सतत चर्चा होत असते. सोशल मीडियावर बातमी किंवा मजकूर शेअर करताना राष्ट्र उभारणीचा संदर्भ आल्यास लोक पडताळणी करणे टाळत असल्याचे दिसत आहे. चुकीच्या माहितीचे वितरण रोखण्यात बीबीसीचा हा उपक्रम गुणात्मक हातभार लावेल याची खात्री वाटते’, असे मत बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस ग्रुपचे संचालक जेमी अँगस यांनी व्यक्त केले. 

एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून लोक कोणत्या गोष्टी शेअर करतात हे समजून घेण्यासाठी ट्विटर अकाउंट्सचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला.  
 नायजेरिया आणि केनियात फेसबुक युझर्स फेक आणि सामान्य अशा दोन्ही स्वरूपाच्या बातम्या वाचतात, पाहतात;पण बातमी किंवा मजकूर कुठून आला आहे याविषयी ते फारसे चिंतित नसतात. भारतात स्थिती वेगळी आहे. फेसबुक वापणाऱ्यांचे ध्रुवीकरण झाल्याचे दिसत आहे. केनिया आणि नायजेरियामधील तरुण मंडळींना, वृद्धांच्या तुलनेत धार्मिक तसेच आदिवासी समाजाविषयीच्या बातम्यांमध्ये कमी रस आहे. साहजिकच धार्मिक किंवा आदिवासी समाजाचे प्रतिनिधी म्हणून ओळख त्यांना भावणारी नाही. भारतात मात्र राष्ट्रवादाची अस्मिता तरुणांसाठी कळीचा मुद्दा आहे. असे या अहवालात म्हटले आहे. 

 मोठ्या प्रमाणावर शेअर झालेल्या फेक न्यूज, लिखित मजकुरापेक्षा चित्र तसंच मीम्स स्वरूपात आहेत असेही  या संशोधनातून स्पष्ट झाले असून, सोशल मीडियावरच्या विविध प्लॅटफॉर्म्सचे सखोल स्वरूपही या संशोधनाद्वारे उलगडून दाखवण्यात आले आहे. ऑनलाईन पातळीवर प्रचंड प्रमाणावर माहिती उपलब्ध होत असल्याने त्याची वैधता निरखण्यात सामान्य व्यक्तींना येणारी आव्हानेही या संशोधनात मांडण्यात आली आहेत. या कारणांमुळे व्हिज्युअल अर्थात दृक्श्राव्य माध्यमांतून फेक न्यूजचा प्रसार होतो. 

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या ऑडियन्स रिसर्च विभागाचे प्रमुख डॉ. शंतनू चक्रवर्ती म्हणाले, ‘फेक न्यूजच्या प्रसाराविषयी काळजी वाटत असतानाही सर्वसामान्य लोक फेक न्यूज का शेअर करतात हे तपासणे, हे या संशोधनामागचे मुख्य उद्दिष्ट होते. या अहवालात भारत, नायजेरिया आणि केनिया या तीन देशांमधील व्यक्तींचा संख्यात्मक तसेच विविध सामाजिक पातळ्यांनुसार अभ्यास करण्यात आला. फेक न्यूजचा अभ्यास करण्यासाठी डिजिटल नेटवर्क विश्लेषण आणि बिग डेटा तंत्राची मदत घेण्यात आली. तंत्रज्ञानाभिमुख सामाजिक घडामोड म्हणून फेक न्यूज ही संकल्पना समजून घेण्यासाठी या देशांमध्ये हाती घेण्यात आलेला हा पहिलाच अशा स्वरूपाचा संशोधन प्रकल्प आहे. फेक न्यूजविषयीच्या चर्चेवर या संशोधनामुळे सखोल चिंतन होईल, याची खात्री वाटते. या विषयावर काम करणारे संशोधक, विश्लेषक तसेच पत्रकारांना या संशोधनाच्या निष्कर्षांचा पुढील अभ्यासासाठी उपयोग होईल.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search