खोडाळा : ठाण्याच्या मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील गिरीवासी सेवा मंडळ संचलित नानाजी मोहिते गुरुजी कला, वाणिज्य व बीएमएस महाविद्यालय आणि मातोश्री यशोदाबाई मुरलीधर मोहिते कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय जोगलवाडी या महाविद्यालयामध्ये उच्च तंत्रशिक्षण कोकण विभागाच्या सह संचालिका रमा भोसले यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.
या वेळी त्यांनी महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती, पायाभूत सुविधांची चौकशी करून तपासणी केली. महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग, संगणक विभाग, परीक्षा विभाग, व्यायाम शाळा आदी मूलभूत विभागांची तपासणी करून त्यावर मार्गदर्शन केले; तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या मुलभूत सुविधांची चौकशी केली व योग्य मार्गदर्शन केले. या भेटीचे औचित्य साधून सह संचालिका भोसले यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी गिरीवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रमणी मोहिते, सचिव प्रा. दीपक कडलाग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर गवंदे, प्रा. तुकाराम रोकडे, प्रा. प्रवर्तन काशीद, डॉ. सुरेंद्र खाडे आदी उपस्थित होते.