Next
शेअर बाजारात दिवाळी; आणखी तेजीची अपेक्षा!
BOI
Sunday, September 22, 2019 | 03:45 PM
15 0 0
Share this article:


अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कंपनी करात गेल्या २८ वर्षांतील सर्वांत मोठी कपात २० सप्टेंबरला जाहीर केली. शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांनी दशकभरातील विक्रमी उसळी घेऊन या निर्णयाचे स्वागत केले. या पार्श्वभूमीवर कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल, त्याविषयी सांगत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. वसंतराव पटवर्धन... ‘समृद्धीची वाट’ या सदरात... 
...... 
अर्थमंत्री निर्मला सीतारामनअर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग पाच टक्के इतका कमी झाल्याने केंद्र सरकार विविध उपाययोजना करत आहे. बांधकाम क्षेत्रासाठी १० हजार कोटी रुपयांचा बूस्टर डोस जाहीर करण्यात आला असून, त्यातून पंतप्रधान आवास योजनेतील घरांची अर्धवट राहिलेली बांधकामे पुरी केली जातील. प्रत्येक घरासाठी काही अनुदान दिले जाईल. बेरोजगारी कमी होईल. त्यापाठोपाठ शुक्रवारी (२० सप्टेंबर) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कंपनी करात कपात जाहीर केली. गेल्या २८ वर्षांतील ही सर्वांत मोठी कपात आहे. देशांतर्गत कंपन्यांवरील कर ३० टक्क्यांवरून २५ टक्के करण्यात आला आहे. यामुळे कंपन्यांच्या खर्चात मोठी बचत होणार असून, उद्योगजगताला या माध्यमातून एक लाख ४५ हजार कोटींचा लाभ होणार आहे. दिवाळीपूर्वी मिळालेल्या या भेटीने सर्वत्र चैतन्य निर्माण झाले आहे. 

या निर्णयामुळे शुक्रवारी शेअर बाजाराने ऐतिहासिक उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) तब्बल एक हजार ९२१ अंकांनी उसळला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ५६९ अंकांनी उसळून ११ हजारांच्या पलीकडे गेला. शुक्रवारी (२० सप्टेंबर) दिवसअखेर सेन्सेक्स ३८ हजार १४ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ११ हजार २७४ अंकांवर स्थिरावला. शेअर बाजारात आलेल्या तेजीच्या झंझावातामुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदार तब्बल ६ ८० लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले. वित्त कंपन्या, बँका, वाहन कंपन्या अशा सर्वच क्षेत्रांतील कंपन्यांचे शेअर्स वधारले. 

वित्तीय क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘बजाज फायनान्स’चा शेअर ५२ आठवड्यातील उच्चांकी भावाच्या जवळपास पोहोचला असून, शुक्रवारी त्याचा भाव तीन हजार ७०२ रुपये झाला. ‘ओएनजीसी’च्या शेअरचा भाव नऊ रुपयांनी वाढून १३३ रुपये झाला. ‘मुथूट फायनान्स’च्या शेअरचा भाव ४६ रुपयांनी वाढून ६२९ रुपयांवर पोहोचला. ‘के थ्री आय इंडस्ट्रीज’च्या शेअरचा भाव ४७ रुपयांनी वाढून ५०३वर गेला. ‘लार्सन अँड टुब्रो’च्या शेअरचा भाव ११२ रुपयांनी वाढून एक हजार ४१२ रुपये झाला. भारत पेट्रोलियम, इंडियाबुल्स हाउसिंग, हिंदुस्तान पेट्रोलियम, स्टेट बँक ऑफ इंडिया, पीएनबी हाउसिंग, तसेच या लेखमालेतून घेण्याची शिफारस केलेले एचडीएफसी, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, फोर्स मोटर्स, अतुल इंडस्ट्रीज आदी कंपन्यांचे शेअर्स चांगलेच वधारले आहेत. गेल्या आठवड्यात ज्यांनी गुंतवणूक केली असेल, त्यांच्या शेअर्सचे बाजारमूल्य एकदम १० टक्क्यांनी वाढले आहे. या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे लाभदायक ठरणार आहे. शेअर बाजारात म्हणूनच सातत्य आणि संयम राखून दीर्घ मुदतीची गुंतवणूक करणेच इष्ट ठरते. हा ‘टी ट्वेंटी’चा सामना नसून, कसोटी सामना असतो. 

एखादा ‘स्टिम्युलस’ शेअर बाजारात किती जोरदार उलाढाल घडवून आणू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. शेअर बाजाराला चांगला बूस्टर मिळाल्यामुळे दिवाळीपर्यंत बाजार अजून सुधारण्याची अपेक्षा आहे. शेअर बाजारातील पुढची हालचाल आता सप्टेंबर २०१९च्या तिमाहीचे विक्रीचे व नफ्याचे आकडे प्रसिद्ध होतील तेव्हा, म्हणजे साधारण १५ ऑक्टोबरपासून दिसेल. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक २१ ऑक्टोबरला होणार असून, मतमोजणी २४ तारखेला होणार आहे. त्यामुळे दिवाळीला नवे सरकार सत्तारूढ झाले असेल. या घडामोडीचाही फायदा शेअर बाजाराला होईल. 

- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक शेअर बाजार या विषयातील तज्ज्ञ आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)      
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search