Next
पाण्यासाठी सर्वकाही असणारा ‘जलसंवाद रेडिओ’
प्रेस रिलीज
Friday, June 15, 2018 | 02:55 PM
15 0 0
Share this story

पाणीविषयक जागरूकता निर्माण करणाऱ्या ‘जलसंवाद रेडिओ’च्या   उद्घाटनप्रसंगी डॉ. दत्ता देशकर, पुण्यातील हॅम रेडिओ चालक विलास रबडे, एफटीआयआय येथील कम्युनिटी रेडिओचे संजय चांदेकर, श्रीपाद कुलकर्णी, वीणा देशकर, अजय देशकर उपस्थित होते.

पुणे : महाराष्ट्र आणि पाणीप्रश्न हे समीकरण आपल्याकडे वर्षानुवर्षे आहे. त्यामुळे जनमानसांत जलसाक्षरता होणे आवश्यक आहे. सहज अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे रेडिओ हे माध्यम आहे. हे ओळखून रेडिओच्या माध्यमातून जलसाक्षरता करण्यासाठी तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी ‘जलसंवाद रेडिओ’ हा पाण्यावरील रेडिओ ज्येष्ठ संशोधक दत्ता देशकर यांनी सुरू केला आहे. या जलसंवाद रेडिओचे शुक्रवारी, १५ जून रोजी पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात अनौपचारिक उद्घाटन झाले. या वेळी डॉ. दत्ता देशकर, पुण्यातील हॅम रेडिओ चालक विलास रबडे, एफटीआयआय येथील कम्युनिटी रेडिओचे संजय चांदेकर, श्रीपाद कुलकर्णी,  वीणा देशकर,  अजय देशकर उपस्थित होते.

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील निवृत्त प्राचार्य असलेल्या डॉ. दत्ता देशकर यांनी गेल्या १७ वर्षांपासून जलसाक्षरतेच्या कामात स्वत:ला वाहून घेतले आहे. शेवटपर्यंत जलसाक्षरतेसाठी जगण्याचा त्यांचा ध्यास आहे. त्यांनी संशोधनासाठी मराठवाड्यातील बदलते पर्जन्यमान व त्याचा शेतकर्यांतच्या जीवनावर होणारा परिणाम हा विषय निवडून, मराठवाडा विद्यापीठाची पीएचडी मिळवली आहे. जागतिक ख्यातीचे जलतज्ञ व स्टॉकहोम पुरस्काराचे मानकरी डॉ. माधवराव चितळे यांच्या मार्गदर्शनाने डॉ. देशकर प्रभावित झाले.

डॉ. देशकर म्हणाले, ‘अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून पाण्याविषयी बोलावे, या उद्देशाने पाणी विषयावर जलसंवाद वेब रेडियो सुरु करण्याचे ठरले. आज हा रेडिओ कार्यान्वित होत असून, याबद्दल आनंद आहे. हा रेडिओ मोबाइलवर अथवा संगणकावर सहजपणे ऐकू येऊ शकतो. ही सेवा निःशुल्क आहे. हा रेडिओ जगात कोठेही ऐकला जाऊ शकतो. ‘जलसंवाद रेडिओ’ हे एक अॅओप डाउनलोड केल्यास आपणही याचा लाभ घेवू शकता. रेडिओ म्हटले की, फ्रिक्वेन्सी किती, एएम आहे की एफएम आहे, असा प्रश्न येतो. मात्र, वेब रेडिओ हा प्रचलित रेडिओप्रमाणे व्हेव्हजवर न चालता वेबवर किंवा इंटरनेटवर चालतो. आज स्मार्टफोन जवळपास सगळ्यांकडे आहेत आणि त्यातील अॅप्लिकेशन्सविषयीदेखील माहिती असते. त्यामुळे स्मार्टफोनमधील अॅ्प्लिकेशनद्वारे हा रेडिओ आपल्याला ऐकता येऊ शकतो. त्यासाठी गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन जलसंवाद रेडिओ मोफत डाउनलोड करता येईल.’

‘या रेडिओवरील कार्यक्रमात विविधता राहणार आहे. पाण्यावरील नामवंतांची भाषणे, पाण्यावरील चर्चा, मुलाखती, जलक्षेत्रातील यशोगाथा, जलक्षेत्रात कार्य करणार्याी व्यक्ती आणि संस्था यांचा परिचय, पाण्यावरील बातम्या, पाण्यावरील नाटके, गाणी, कीर्तने, देशातील व परदेशातील नद्या, धरणे, सरोवरे यांचा परिचय, विविध देशातील पाणी प्रश्न, हवामानाचे अंदाज, जलविज्ञानाबद्दल माहिती, गृहिणींसाठी पाणी वापराबद्दल छोट्याछोट्या टीपा इत्यादीच्या माध्यमातून याद्वारे जलप्रबोधन होणार आहे. श्रोत्यांनाही यामध्ये सहभागी होता येणार असून, आपले पाण्यावरील विचार ऑडिओ क्लिपद्वारे अथवा मेलद्वारे श्रोत्यांना पाठवता येणार आहेत. हा रेडिओ माझा नाही तर समाजातील प्रत्येकाचा आहे, प्रत्येकाला पाणी प्रश्नाबाबत काय वाटते हे ऑडिओ क्लिपद्वारे कळविले, तर त्याचा समावेश प्रक्षेपणात केला जाईल, विचारलेल्या प्रश्नांची तज्ज्ञांकडून उत्तरे दिली जातील’, असेही डॉ. देशकर यांनी नमूद केले.

डॉ. देशकर पुढे म्हणाले, ‘डॉ. चितळे ग्लोबल वॉटर पार्टनरशिप (साउथ आशिया) या संस्थेचे अध्यक्ष असताना त्यांच्यासोबत कार्यालयीन समन्वयक म्हणून जवळपास तीन वर्षे काम केले.  देश-विदेशातील जलपरिषदांमध्ये भाग घेण्याची, शोधनिबंध मांडण्याची, जागतिक जलतज्ज्ञांच्या भेटी घेण्याची संधी मिळाली. त्यातून पाणी विषयात भरपूर माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला. पुढे पाणी क्षेत्रातील काम चालूच ठेवले. आपण काही जलतज्ञ नाही, हायड्रॉलॉजी आपला विषय नाही, जियॉलॉजी बद्दल आपल्याला काही माहित नाही, अशा परिस्थितीत काय करायचे हा प्रश्न होताच. पाण्याला जशी तांत्रिक बाजू आहे; तशीच समाजिक, आर्थिक व व्यवस्थापकीय बाजूही आहे. समाज जलसाक्षर नसल्यामुळे आज पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे जलजागरण व्हायला हवे. हा विचार घेऊन सुरवातीला शालेय मुलांसाठी काम केले. एक लाखापेक्षा अधिक मुलांना जलसाक्षर करण्याचा संकल्प केला. रोज सकाळी शाळांमध्ये जावून आठवी, नववी व दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांना पाण्यासंबंधी भाषणाद्वारे माहिती देऊ लागलो. सोप्या भाषेत पाण्याची काटकसर, पाण्याची शुद्धता, जलपुनर्भरण, पाण्याचा पुनर्वापर, जल प्रदूषणावर नियंत्रण यावर माहिती दिली आणि हे लक्ष्य एक वर्षातच गाठले.’

‘हा संकल्प पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातील दहा हजार  शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात पाणी कसे जमवायचे व वर्षातून दोन शाश्वत पिके कशी काढायची याबद्दल मार्गदर्शन सुरु केले. तोही संकल्प एक वर्षात पूर्ण केला. जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड सुरु होती. त्यासाठी मराठी भाषेत जलसाक्षरता, पुनर्भरण, वनशेती, शेततळे, दुष्काळ, पाण्याचे गणित, पाणी वापरात काटकसर यांसारख्या विषयांवर सोप्या भाषेत पुस्तिका लिहून विनामूल्य वितरण केले. हजारो लोकांना या पुस्तिका वाटल्या. पुढे जानेवारी २००५ पासून पाणी या विषयावर जलसंवाद नावाचे मासिक सुरु केले. या मासिकाने तेरा वर्षाचा यशस्वी प्रवास केला आहे. आतापर्यंत पाणी विषयाशी संबंधित चाळीसपेक्षा अधिक जलसंवादचे विशेषांक काढले आहेत. ‘जलोपासना’ नावाचा दिवाळी अंकही काढायला सुरवात केली. अनेक कार्यशाळा घेतल्या. सध्या भारतीय जलसंस्कृती मंडळ या स्वयंसेवी संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम पाहात आहे. सातत्याने पाणी प्रश्नावर लेखन करतो’, असे डॉ. देशकर यांनी या वेळी सांगितले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sambhaji Ganpati koli.pune.Ret.C.E. About 242 Days ago
Very nice initiative by u.in the field of water sector to create awareness in the public through radio system. Novel idia.good wishes.
0
0

Select Language
Share Link