Next
जीत ही लेंगे बाजी हम तुम...
BOI
Sunday, February 18, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना आज, १८ फेब्रुवारी रोजी ९१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या ‘जीत ही लेंगे बाजी हम तुम’ या त्यांनी संगीत दिलेल्या गाण्याचा...
........
आज १८ फेब्रुवारी. संगीतकार खय्याम यांचा वाढदिवस. वयाची नऊ दशके पूर्ण केलेला (जन्मसाल १९२७) आजच्या घडीतील सर्वांत ज्येष्ठ संगीतकार. मोहम्मद झहूर सादत हुसेन हे त्यांचे मूळ नाव. १९५०च्या ‘बीवी’ या चित्रपटापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. चित्रपटात काम करायचे असेल, तर गाता आले पाहिजे, अशा त्या काळात चित्रपटसृष्टीची दारे ठोठावणाऱ्या खय्याम यांनी संगीतकार हुस्नलाल भगतराम यांचे बंधू पंडित अमरनाथ यांच्याकडे संगीताकरिता शिकवणी लावली. परंतु तरीही चित्रपटात काम मिळेना म्हटल्यावर सरळ सैन्यात नोकरी पत्करली. आणि तेथून परत आल्यावर पुन्हा चित्रपटसृष्टीत प्रवेश केला; पण तो संगीतकार म्हणून. ‘बीवी’ चित्रपटातील रफींच्या आवाजातील ‘अकेले में वो घबराते तो होंगे’ हे त्यांनी संगीतबद्ध केलेले गीत लोकप्रिय झाले; पण तरीही पुढे काम मिळेना. काही काळाने मजरूह सुलतानपुरी आणि अन्वर हुसैन यांच्या ओळखीने ‘फुटपाथ’ चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी खय्याम यांच्यावर सोपवण्यात आली. 

‘फुटपाथ’मधील गीतांना खय्याम यांनी सुरेख चाली दिल्या. तलतच्या आवाजातील ‘शामें गम की कसम’ हे गीत तर कमालीचे लोकप्रिय ठरले व आजही आवर्जून ऐकले जाते. त्यानंतर ‘लालारुख’, ‘फिर सुबह होगी’ हे चित्रपट मिळाले. खय्याम यांचे थोडेफार नाव झाले. नंतरही चित्रपट काही प्रमाणात मिळत गेले. परंतु प्रचंड लोकप्रियता त्यांच्या वाट्याला आली नाही; पण ज्या मोजक्या चित्रपटांना संगीत देण्याची संधी मिळाली, त्या त्या चित्रपटातील गीतांमधून त्यांनी आपले कौशल्य अप्रतिमपणे प्रकट केले. खय्याम यांची पत्नी जगजित कौर यांनीही उत्कृष्ट गीते गायली आहेत. परंतु या कलावंत दाम्पत्याच्या वाट्याला फारशी प्रसिद्धी आली नाही.

खय्याम यांच्या संगीतातील जादू जाणून घ्यायची असेल, तर ‘आखरी खत’ चित्रपटातील ‘बहारों मेरा जीवन भी संवारो’ हे गीत ऐकायला हवे. ‘शगुन’ चित्रपटातील मोहम्मद रफी व सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांतील ‘परबतों के पेडों पर श्याम का बसेरा है’ या द्वंद्वगीताची गोडी अनुभवायला हवी. ‘कभी-कभी’ चित्रपटातील एकापेक्षा एक सुंदर गीतांची कीर्ती सर्वश्रुत आहेच. ‘उमराव जान’ची गाणी ऐकायला आजही छान वाटतात.

खय्याम यांचे वैशिष्ट्य असे, कि त्यांनी ज्या ज्या काळात जे जे गायक-गायिका उपलब्ध झाल्या, त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली. किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, मुबारक बेगम, मुकेश, जगजित कौर, नितीन मुकेश, सुलक्षणा पंडित अशा नव्या जुन्या गायक-गायिकांकडून त्यांनी गाणी गाऊन घेतली व ती रसिकांनी पसंतही केली. या गीतांमधील एक वेगळेपण म्हणजे ‘रझिया सुलतान’ या चित्रपटातील गीते. ‘ए दिले नादान’ हे गीत तर या चित्रपटाचे खास आकर्षण होतेच. परंतु या चित्रपटाचा नायक ‘याकूब’ (धर्मेंद्र) हा हबशी असतो. त्याच्यासाठी खय्याम यांनी रेडिओ निवेदक कब्बन मिर्झा यांच्या आवाजात गीते गाऊन घेतली व ती नायकाला अनुरूप ठरली.

नूरी, त्रिशुल, नाखुदा, खानदान, बाजार, मेहंदी या चित्रपटातील खय्याम यांची गाणी वेगळेपण दाखवणारी होती. ‘शगुन’ चित्रपटातील ‘तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो’ हे एक मधुर व आशयसंपन्न गीत जगजित कौर अर्थात खय्याम यांच्या पत्नीने गायलेले होते. पतीने स्वरबद्ध केलेले व पत्नीने गायलेले गीत कोणते, या आशयाचा प्रश्न फिल्म क्विझमध्ये विचारला जाऊ शकतो; पण खय्याम यांच्या वाट्याला तेवढी प्रसिद्धीही ‘मृगजळ’च ठरली आहे.

वृद्धत्वामध्ये असलेले आजचे खय्याम निश्चितच त्यांच्या जुन्या गीतांच्या आठवणी जागवत असतील. आणि खरा चित्रपटप्रेमीही त्यांना विसरू शकत नाही. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक शुभेच्छा. त्यांच्या अनेक ‘सुनहऱ्या’ गीतांमधील एक गीत आज पाहू या. तसे या गीताचे शब्द प्रभावी आहेत; पण त्याहीपेक्षा त्याची चाल, संगीत जास्त प्रभावी वाटते. तो वाद्यमेळ, ती चाल पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. आणि शब्दही काळजाला स्पर्श करतात. पडद्यावर अंधुक उजेडात बसलेला नायक (धर्मेंद्र) आपल्या बालपणाच्या मैत्रिणीला सांगतो -

दुनिया अपने रब को पुकारे तुझ को तेरा दिवाना  
आ जा, आ जा 

(फुलाच्या प्राप्तीसाठी) तहानलेला भ्रमर फुलाला शोधत असतो, (तर) पतंग जळणाऱ्या वातीच्या शोधात (हिंडत) असतो. हे जग आपल्या ईश्वराला बोलावते (पण) हा तुझ्या प्रेमामुळे वेडा झालेला मी तुला बोलवत आहे (तरी तू) ये, ये, ये.

अशी सुरुवात झाल्यावर आपल्या प्रेयसीला आत्मविश्वासाने तो सांगतो -

जीत ही लेंगे बाजी हम तुम
खेल अधूरा छूटे ना 
प्यार का बंधन टूटे ना 

हे ध्रुवपद रफी दोनदा आळवतात. 

(आपल्या प्रेमाची ही खेळी/हा डाव) आपण दोघे, तू व मी जिंकणारच आहोत. (अर्थात आपले प्रेम यशस्वी होणार आहे.) (हा आपल्या प्रेमाचा डाव/खेळ अपूर्ण राहणार नाही आणि ओघानेच) प्रेमाचे हे बंधन, जन्माचेही बंधन बनले आहे. ते तुटणार नाही. त्याच्या या सांगण्याने ‘तिच्या’ भावना जागृत होतात. ती उत्सुकतेने पुढे ऐकते. तो सांगतो -

मिलता है जहाँ धरती से गगन 
आओ वही हम जाए 
तू मेरे लिये, मै तेरे लिये 
इस दुनिया को ठुकराए 
दूर बसा ले दिल की जन्नत 
जिस को जमाना लूटे ना 
प्यार का बंधन, जनम का बंधन टूटे ना

(अग माझ्या प्रिये) जेथे आकाश पृथ्वीला येऊन मिळते (अशा दूर ठिकाणी) तू आणि मी जाऊ या. जेथे फक्त तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी असेन (आणि अशा वेळी) या जगाची आपण पर्वा करायला नको. त्याकडे आपण दुर्लक्ष करू. त्या दूरच्या ठिकाणी आपल्या प्रीतीचा स्वर्ग उभारू (की ज्याला) हे जग लुटू शकणार नाही (तोडू शकणार नाही). (हे आपल्या) प्रेमाचे बंधन, जन्माचेही बंधन बनले आहे, ते तुटणार नाही. 

‘त्याच्या’ या आर्त सादेला प्रतिसाद देत तीही आपले भाव प्रकट करते. दोन संयत प्रेमींची ही भाषा संगीतात गुंफताना येथे खय्याम यांनी प्रेयसीला एकदम बोलते केले नाही. त्याच्या प्रेमाच्या सादेमुळे हर्षभरीत झालेली ‘ती’ फक्त गुणगुणते. येथे लतादीदींचा स्वर फक्त ‘अं अं अं’ असा प्रतिसाद देतो.

प्रेयसीच्या या नाजूक प्रतिसादामुळे तो पुढची ओळ गातो. यापुढे एक ओळ गायक आणि एक ओळ गायिका यांच्याकडून गाऊन घेऊन या चित्रपटातील नायक नायिकेचे प्रेम संगीतकारांनी छान प्रभावी बनवले आहे.

तो – मिलने की खुशी न मिलने का गम 
ती - खत्म ये झगडे हो जाए 
     तू तू ना रहें, मैं मैं ना रहूँ 
तो - एक दुजे में खो जाए
ती - मैं भी ना छोडू पलभर दामन 
तो - तू भी पलभर रुठे ना 
दोघे - प्यार का बंधन, जन्म का बंधन, जन्म का बंधन टूटे ना!
    
मीलनाचा आनंद, विरहाचे दु:ख हे प्रकारच नकोत. एवढे आपण दोघे एकमेकांचे होऊन जाऊ, की तू तू न राहावास आणि मी मी न राहावे. मी एक क्षणभरही तुझी साथ सोडणार नाही व मीही क्षणासाठीसुद्धा तुझ्यावर रुसणार नाही (तुला समजून घेईन). आपल्या दोघांच्या प्रेमाचे व ओघानेच जीवनाचे हे बंधन असेच अतूट राहो.

गीतकार कैफी आझमी यांच्या लेखणीतून उतरलेले हे गीत १९६१च्या ‘शोला और शबनम’ चित्रपटासाठी मोहम्मद रफी व लता मंगेशकर यांनी गायले होते. पडद्यावरील नायक धर्मेंद्र ओळखला जाईल; पण नायिका? तरला मेहता हे तिचे नाव. तिच्यासमवेत अल्पकाळ दिसतो तो सहअभिनेता एम. राजन. या चित्रपटासाठी खय्याम यांनी दहा गीते दिली होती. त्यातीलच हे एक सुनहरे गीत.      

(ता. क. : खय्याम यांचे १९ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले.)

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Smita Janwadkar. About 31 Days ago
Khoop chan article padmakarji .Article punha share kele mnje kharokhar kutukaspad ahe study Ashich pragatichi positive batmi ekayala milude.Heartily congrets.
1
0
Ghanashyam. S. Vadnerkar About 32 Days ago
Good work and research, keep it up and post such positive information. My best regards G.S.Vadnerkar
1
0
रमेश करंजेकर About 32 Days ago
अप्रतिम, अर्थात सरस्वतीच तुझे जिभेवर आहे. तुझा प्रत्येक शब्ध काळजाला हात घालतो. तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अतिशय चांगली माहिती शेअर केलेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
0
0

Select Language
Share Link
 
Search