Next
सुनीता देशपांडे
BOI
Monday, July 03, 2017 | 06:30 PM
15 1 0
Share this article:

दिनमणी सदरात आज  सुनीता देशपांडे, दत्तात्रय हरी अग्निहोत्री, दत्तात्रय गणेश गोडसे या मराठी आणि फ्रांझ काफ्का या पाश्चात्य साहित्यिकांविषयी...
.............

सुनीता पुरुषोत्तम देशपांडे
पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या नव्हे तर जगभरातल्या मराठी लोकांच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वासोबत त्यांची सहचरी म्हणून राहत असतानाच स्वतः अतिशय उत्तम लेखिका म्हणून सुनीताबाईंनी नाव मिळवलं. तीन जुलै १९२६ हा त्यांचा जन्मदिवस.

त्यांचं ‘आहे मनोहर तरी’ हे आत्मचरित्रपर पुस्तक गाजलं ते त्यांनी ‘पुलं’बरोबर व्यतीत केलेल्या अनेक रोखठोक, परंतु प्रामाणिक आठवणींमुळे. पुस्तकाच्या प्रारंभीच त्या म्हणतात, ‘आठवणींच्या प्रदेशातील ही स्वैर भटकंती. पाखरांसारखी. क्षणात या फांदीवर, कुठूनही कुठेही दिशाहीन; पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत केलेली.’ पुढे त्यांनी म्हटले आहे, ‘सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच. ही साठा प्रश्नांची कहाणी. सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे. अपूर्ण मात्र नक्कीच.’ त्यांचे हे आत्मकथन विलक्षण गाजले. 

जी. ए. कुलकर्णी हे त्यांचे स्नेही होते आणि दोघांची आपापसात जी पत्रापत्री चालायची त्याचंही पुस्तक झालं आणि त्यात त्यांनी उल्लेख केलेल्या अगणित पुस्तकांवरून त्यांच्या अफाट वाचनाची आणि व्यासंगाची कल्पना येते.

सुनीताबाई नाटकात उत्तम कामं करायच्या आणि फार प्रभावीपणे कविता सादर करायच्या. ‘पुलं’समवेत त्यांनी मर्ढेकर, बोरकर आणि आरती प्रभूंच्या कवितावाचनाचे अनेक कार्यक्रम केले आणि अतिशय सुंदर प्रकारे कविता रसिकांपर्यंत पोहोचवल्या. ‘आहे मनोहर तरी,’ ‘मण्यांची माळ,’ ‘समांतर जीवन,’ ‘सोयरे सकळ,’ ‘प्रिय जीए’ ही त्यांची गाजलेली पुस्तके. न. चिं. केळकर पुरस्कार, कोठावळे पुरस्कार, महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार, जी. ए. कुलकर्णी पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सुनीताबाईंचा गौरव झाला आहे. सात नोव्हेंबर २००९ रोजी पुण्यात सुनीताबाईंचं निधन झालं.

दत्तात्रय हरी अग्निहोत्री 
‘मराठी वर्णोच्चार विकास’ या प्रबंधाला मान्यता मिळून डॉक्टरेट प्राप्त झालेले अमरावतीचे डॉ. द. ह.अग्निहोत्री म्हणजे अथक परिश्रमांचे चालतेबोलते उदाहरणच म्हणावे लागेल. तीन जुलै १९०२ रोजी जन्म झालेल्या अग्निहोत्री यांचे ‘महाराष्ट्र संस्कृतीचे तात्त्विक अधिष्ठान’ हा ग्रंथ हे मोठे योगदान ठरले आहे. 

भाषाशास्त्र या विषयाची त्यांना मुळात आवड असल्याने, मराठी भाषेसाठी एक उत्तम शब्दकोश असावा, या जाणिवेने झपाटून जाऊन कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय, दररोज ९-१० तास बैठक मारून, तब्बल दहा वर्षे प्रचंड परिश्रम करून, त्यांनी ४५०० मुद्रण प्रतींचा आणि जवळपास ७०० पृष्ठांचा पाच भागात विभागलेला असा ‘अभिनव मराठी-मराठी शब्दकोश’ हा एक उत्तम ग्रंथ तयार केला आहे. मराठी शब्दांचे प्रमाण भाषेनुसार उच्चार यात दिले आहेत. अशा कोशाची गरज भासणाऱ्या मंडळींसाठी तो एक भक्कम आधारच ठरला आहे! याशिवाय ‘अंतरिक्ष प्रवास व त्याचे भवितव्य,’ ‘डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे सामाजिक विचार’ आणि ‘हल्ली संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार कसा करता येईल?’अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी उत्तम निबंध लिहिले आहेत आणि त्यांना पारितोषिकेही मिळाली आहेत. २२ नोव्हेंबर १९९० रोजी त्यांचा मृत्यू झाला.

दत्तात्रय गणेश गोडसे 
‘द. ग.’ या नावाच्या संक्षिप्त रूपाने प्रसिद्ध असणारे आणि संगीत नाटक अकादमीने ‘भारतातील सर्वश्रेष्ठ नेपथ्यकार’ म्हणून गौरवलेले दत्तात्रय गणेश गोडसे हे भारतातले अग्रगण्य चित्रकार होते! तीन जुलै १९१४ रोजी जळगाव जिल्ह्यातील वाघोडे येथे जन्मलेल्या गोडसे यांची ओळख एक उत्तम लेखक अशीही!! 

त्यांची अनेक पुस्तके गाजली आणि अनेकांना पारितोषिकेही मिळाली. त्यांच्या कलासक्त लेखणीतून उतरलेली ‘पोत, शक्तीसौष्ठव, गतिमानी, ऊर्जयान’सारखी पुस्तके तर आहेतच; पण त्याशिवाय, त्यांनी त्यांना भारून टाकलेल्या ‘मस्तानी’ या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. मस्तानीची समाजमानसात रुजलेली केवळ ‘एक मुसलमान लावण्यखणी कलावंतीण’ ही छबी पुसून, तिला स्वतःचे असे एक खानदानी, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व होते हे लोकांसमोर आणण्याची त्यांची तळमळ त्यातून प्रकट झाली आहे. त्यांनी कवी आणि कवितांवर चोखंदळपणे समीक्षा लिहिली आहे. ‘काळगंगेच्या काठी’ हे नाटकही त्यांनी लिहिले आहे. शंभराहून अधिक नाटकांना त्यांचे विलक्षण देखणे आणि अनुरूप नेपथ्य लाभले होते आणि भारताबाहेर प्रयोग झालेली ‘शाकुंतल,’ ‘ मुद्राराक्षस’ ही नाटके पाहून त्यांच्या नेपथ्यकौशल्याला बाहेरील जाणकारांनीही मनापसून दाद दिली होती. ‘संजीवनी, ज्योत्स्ना, अभिरुची’ यांसारख्या नियतकालिकांमधून घरोघरी पोहोचलेली त्यांची चित्रे आजही आठवणीत ताजी आहेत. पाच जानेवारी १९९२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

फ्रांझ काफ्का 

ऑस्ट्रियाच्या अंमलाखाली असलेल्या प्रागमध्ये तीन जुलै १८८३ रोजी ज्यू आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या फ्रांझ काफ्काचे बालपण मानसिक आंदोलनात गेले होते. त्याच्या लेखनाची आवड आईच्या समजण्याच्या पलीकडची होती, तर व्यापारी असणारे वडील फारच कडक आणि अधिकार गाजवण्याच्या वृत्तीचे होते. काफ्काचे दोन भाऊ आजारपणात वारल्यामुळे तो घरातला एकुलता एक मुलगा उरला होता. त्याला तीन लहान बहिणी होत्या, ज्यांचा पुढे नाझी छळछावणीत मृत्यू झाला. वडिलांच्या जुलमी, हुकूमशाही वृत्तीचा आणि कुटुंबातील वाईट मानसिक वातावरणाचा फ्रान्झच्या मनावर फार खोल परिणाम झाला होता, जो त्याच्या साहित्यात प्रतिबिंबित झालेला दिसून येतो. त्याच्या साहित्यातील व्यक्तिरेखासुद्धा कुठल्यातरी जाचक परिस्थितीशी असहाय सामना करत प्रसंगी हताश, हतबल झालेल्या दिसून येतात.

वैयक्तिक आयुष्यात दोन वेळा संधी येऊनही त्याला आपल्या प्रेयसीशी लग्न करता आले नाही. पुढे बर्लिनमध्ये त्याच्या आयुष्यात डोरा डायमंट आली. ‘कासल,’ ‘दी ट्रायल,’ ‘अमेरिका’ यांसारख्या कादंबऱ्या लिहिणाऱ्या काफ्काची सर्वांत प्रसिद्ध साहित्यकृती म्हणजे १९१५ सालची ‘मेटामॉर्फोसिस’ ही कथा. ‘सकाळच्या त्या भयानक स्वप्नामुळे दचकून बिछान्यात उठून बसलेल्या ग्रेगॉर साम्साच्या लक्षात आलं, की त्याचं रूपांतर एका महाकाय कीटकात झालेलं आहे!’... अशी त्या कथेची सुरुवातच मोठी अनोखी होती. तीन जून १९२४ रोजी त्याचे निधन झाले.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search