
ठाणे : हिवाळ्यात अनेक परदेशी पक्षी स्थलांतर करून भारतात येतात, अनेक पाणवठे त्यांच्या गर्दीने फुलून गेलेले दिसतात. यंदा मात्र पावसाळा अद्याप संपला नाही, तोच हे हिवाळी पाहुणे दिसू लागले आहेत. ठाणे खाडी परिसरात आत्ताच फ्लेमिंगो, गल यांसारखे पक्षी दिसू लागले आहेत. यंदा थंडीचा हंगाम लवकर सुरू होणार असल्याचे हे संकेत असल्याचे मानले जात आहे.
हिवाळ्यात ठाणे खाडी परिसरात अनेक पक्ष्यांचे आगमन होत असते. यंदा पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यातच हिवाळी पक्ष्यांचे दर्शन घडल्यामुळे पर्यावरणप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाणे खाडीत पक्षिनिरीक्षणाची चांगली संधी पक्षिमित्रांना मिळते. गेल्या काही वर्षांत ठाणे खाडीत प्रदूषण कमी झाल्यामुळे आफ्रिका, युरोप आणि आशिया खंडाच्या अन्य भागांतील अनेकविध पक्षी ठाणे खाडी परिसरात आलेले दिसतात. फ्लेमिंगो (रोहित पक्षी), कुरव पक्षी (Gull) यांसारख्या पक्ष्यांचा त्यात समावेश असतो. यंदा हे पक्षी पावसाळा संपण्याच्या आतच दिसू लागल्याने यंदा थंडी लवकर येण्याची शक्यता आहे.
ठाण्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर, तलावासोबतच विस्तीर्ण खाडी किनारा हा सगळा निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे. नैसर्गिक विविधतेमुळे ऋतुमानानुसार शहरात अनेक प्रकारचे पक्षी दिसतात. एरव्ही हिवाळ्यात दिसणाऱ्या या पक्ष्यांचे आगमन सप्टेंबरमध्येच झाल्यामुळे पाऊस माघारी जाण्याची वेळ झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
ठाण्यात हे पक्षी येतात...
फ्लेमिंगोसोबतच सीगल्स, रानबदकं, सँडपायपर, पेन्टेड स्टॉर्क, स्पूनबिल यांसारख्या मनोहारी पक्ष्यांचा आढळ ठाणे खाडी परिसरात दिसून येतो. गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे खाडी परिसरात तब्बल २०३ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे.
प्रक्रियायुक्त सांडपाणी...
ठाणे शहराला तब्बल २७ किलोमीटरचा खाडीकिनारा असून, वालधुनी आणि उल्हास नदी या खाडीला मिळते. आधीच दोन्ही नद्या प्रदूषणाने भरलेल्या असून, सांडपाणी, कारखान्यातील रसायने खाडीच्या पाण्यात मिसळून ऑक्सिजनची मात्रा कमी झाली आहे. त्यामुळे खाडीच्या पाण्यात जलचरांची संख्या खूपच कमी असल्याचे बोलले जाते. ठाणे महापालिकेने कोपरीतील मलनिस्सारण प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करून तब्बल ४० एमएलडी पाणी खाडीत सोडले आहे. हे पाणी प्रक्रिया करून सोडल्यामुळे जलचरांसाठी पोषक ठरले आहे. खाडीच्या पाण्यात हे पाणी मिसळल्याने या ठिकाणी मासे, चिंबोरी, कोळंबी यांसारखे जीव वाढत असून, हिवाळी पाहुण्या पक्ष्यांना त्यामुळे नैसर्गिक खाद्य उपलब्ध होते. थंडीच्या दिवसांत एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल दोन ते तीन हजार पक्ष्यांचे थवे या ठिकाणी बघायला मिळतात.