Next
पाणी, चारा व ‘रोहयो’च्या कामांना प्राधान्य
सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांची ग्वाही
BOI
Wednesday, October 24, 2018 | 12:59 PM
15 0 0
Share this article:सोलापूर :
‘यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे. टंचाई काळात जनतेला पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि रोजगार हमी योजनेच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या दृष्टीने शासन व प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असून, टंचाई काळात शासन जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहील,’ अशी ग्वाही पालकमंत्री विजय देशमुख यांनी २३ ऑक्टोबर २०१८ रोजी टंचाई पाहणीप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली.

पालकमंत्री देशमुख यांनी सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील देवडी, वाफळे, पंढरपूर तालुक्यातील बार्डी, करकंब, मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव, लेंडवे चिंचाळे, शिरशी, नंदेश्वर, मुंढेवाडी, ब्रह्मपुरी गावांना भेटी देऊनन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पालकमंत्री देशमुख म्हणाले, ‘या वर्षी टंचाईची परिस्थिती गंभीर होणार आहे. यासाठी उपलब्ध असणारे पाणी पिण्यासाठी राखून ठेवून त्याचा काटकसरीने वापर करण्यात येईल. शेतकऱ्यांचे पशुधन वाचावे, त्यांना ओला चारा मिळावा, यासाठी कृषी विभागामार्फत वैरण विकास प्रकल्पांतर्गत चारापिके घेतली जात आहेत. चाऱ्याचे बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येईल. यासाठी संबंधित गावांनी आपले प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करावेत.’मोहोळ तालुक्यातील पीकपाहणीप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले, ‘मोहोळ तालुक्यात या वर्षी केवळ ३६ टक्के पाऊस झाल्याने टंचाईची तीव्रता वाढणार आहे. मोहोळ तालुक्याला टंचाईप्रसंगीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. देवडी, वाफळे व परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल. सीना-माढा योजनेतील मंजूर पाणी या भागात आणण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांकडे लवकरच बैठक घेतली जाईल.’ जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी मोहोळ तालुक्यात ३०० हेक्टरच्या दोन प्लॉटवर वैरण विकास प्रकल्पातून चारानिर्मिती करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.मोहोळ तालुक्यातील पाहणीप्रसंगी पंचायत समिती सभापती समता गावढे, जिल्हा परिषदेचे सभापती विजय डोंगरे, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांच्यासह भैया देशमुख, श्रीकांत बागल, मान्यवर पदाधिकारी, अधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

पंढरपूर तालुक्यातील बार्डी, करकंब येथेही पालकमंत्री देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी पाणी, चारा या संदर्भातील आपल्या समस्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री देशमुख यांच्याकडे मांडल्या. करकंब पाणी पुरवठा योजनेसंदर्भात येत्या शुक्रवारी सोलापुरात बैठक घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

आमदार बबनदादा शिंदे यांनी फळबागांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत मिळावी, कॅनॉल व नदीवर शेतीसाठी टँकर भरण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली असता, या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री म्हणाले. या भागातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्रास होऊ नये, म्हणून वन विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

पंढरपूर तालुक्यातील टंचाई पाहणीवेळी आमदार बबनदादा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, पंचायत समिती सभापती राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसिलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके व अन्य अधिकारी उपस्थित होते.मंगळवेढा तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला जाईल. याबाबात शुक्रवारी सोलापुरात बैठक होत आहे. तालुक्यात रोजगार हमीची कामे सुरू करण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही सुरू करावी. मजुरांनी रोजगार हमी योजनेच्या कामसाठी जॉब कार्ड काढून घ्यावीत. कृषी विभागामार्फत तालुक्यात १०० हेक्टरवर वैरण विकास योजनेअंतर्गत चारा निर्मिती करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री देशमुख म्हणाले.

मंगळवेढा तालुक्यातील टंचाई पाहणीप्रसंगी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे श्री. डोंगरे, माजी सभापती शिवानंद पाटील यांच्यास परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search