Next
प्यारेलाल संतोषी, शार्लीज थेरन
BOI
Tuesday, August 07, 2018 | 03:45 AM
15 1 0
Share this story

चाळीस आणि पन्नासच्या दशकातले नाणावलेले हिंदी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार आणि गीतकार प्यारेलाल संतोषी आणि ऑस्करविजेती अभिनेत्री शार्लीज थेरन यांचा सात ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
...
प्यारेलाल संतोषी 

सात ऑगस्ट १९१६ रोजी जबलपूरमध्ये जन्मलेले प्यारेलाल श्रीवास्तव उर्फ संतोषी हे हिंदी चित्रपटसृष्टीतले एक नाणावलेले निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या सिनेमांमधून काव्याला आणि गीतांना चांगलाच वाव मिळायचा आणि त्यांच्या सिनेमांत कथानकाच्या ओघात सहज येणाऱ्या गाण्यांसाठी बऱ्याचदा प्रमुख व्यक्तिरेखा ही गाण्याशी संबंधित असे. १९४६ सालच्या ‘हम एक है’पासून त्यांनी सिनेमा दिग्दर्शित करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळातले त्यांचे शहनाई, सरगम, खिडकी, हम पंछी एक डालके, शिनशिनाकी बुबलाबु यांसारखे सिनेमे चांगले चालले होते. पुढे १९६० सालचा भारतभूषण-मधुबालाचा ‘बरसात की रात’ आणि १९६३ सालचा राजकपूर-नूतन जोडीचा ‘दिल ही तो है’ या सिनेमांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि ती अर्थातच त्यांतल्या एकाहून एक सुमधुर गीतांमुळे! ते स्वतः उत्तम गीतकार होते. त्यांच्या ‘आना मेरी जान मेरी जान संडे के संडे’ या गाण्याने धुमाकूळ घातला होता. हमको है प्यारी हमारी गलियाँ, जवानी की रेल चली, सब से भला रुपय्या, वो हम से चूप है, कोई किसी का दिवाना ना बने, मेरे दिल में है इक बात, अशी त्यांची इतर गाणी गाजली होती. सात सप्टेंबर १९७८ रोजी त्यांचा मुंबईत मृत्यू झाला. 
........ 

शार्लीज थेरन
 
सात ऑगस्ट १९७५ रोजी बेनोनीमध्ये (साउथ आफ्रिका) जन्मलेली शार्लीज थेरन ही गेल्या दोन दशकातली एक अत्यंत गुणी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. सुरुवातीला बॅले नर्तिका होण्याचं स्वप्न बाळगून ती न्यूयॉर्कला आली खरी, पण गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिला ते सोडून द्यावं लागलं. तिने आधी मॉडेलिंग करून नंतर फिल्म्समध्ये शिरण्याची धडपड केली. १९९७ सालच्या ‘दी डेव्हिल्स अॅडव्होकेट’ने तिच्यातल्या अभिनयाची चुणूक लोकांना दिसली. माइटी ज्यो यंग, सेलेब्रिटी, दी इटालियन जॉब यांसारख्या पाठोपाठ आलेल्या सिनेमांनी तिला यशस्वी अभिनेत्री म्हणून मान्यता मिळाली. २००३ सालच्या ‘मॉन्स्टर’मधल्या तिच्या सीरियल किलर आयलीनच्या भूमिकेने तिला ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला. दी लाइफ अँड डेथ ऑफ पीटर सेलर्स, हेड इन दी क्लाउड्स, नॉर्थ कंट्री, हॅनकॉक, दी रोड, स्नोव्हाइट अँड दी हन्स्तमन, प्रॉमेथ्युअस, मॅडमॅक्स : फ्युरी रोड, असे तिचे अनेक सिनेमे गाजले आहेत. ऑस्करव्यतिरिक्त तिला गोल्डन ग्लोब आणि सिल्व्हर बेअर पुरस्कारही मिळाले आहेत. 

यांचाही आज जन्मदिन :
‘विज्ञानयुग’ मासिकातून रंजक भाषेत विज्ञानाची माहिती देणारे ना. वा. कोगेकर (जन्म : सात ऑगस्ट १९११)
सोप्या भाषेत माहितीपूर्ण पुस्तकं लिहिणारे रसायनशास्त्रज्ञ परशुराम बर्वे (जन्म : सात ऑगस्ट १९०६, मृत्यू : पाच फेब्रुवारी १९९५)
यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link