Next
स्वच्छतेसाठी डॉ. सुरपुरे यांच्यातर्फे ‘निर्मल दिंडी’ पारितोषिक
प्रेस रिलीज
Thursday, June 14, 2018 | 06:14 PM
15 0 0
Share this story

पंढरपूरच्या वारीतील स्वच्छतेसाठी अमेरिकेतील बालरोगतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ सुरपुरे आणि रतन सुरपुरे या दांपत्याने ‘निर्मल दिंडी पारितोषिक’ देण्याची घोषणा केली. या वेळी ग्लोबल सेवा फाउंडेशनचे शशिकांत पानट, दिग्दर्शक ऋषी देशपांडे उपस्थित होते.

पुणे : लाखो वारकऱ्यांचा समावेश असलेल्या पंढरपूरच्या वारीतील स्वच्छता उल्लेखनीय असते. या स्वच्छतेसाठी घेतल्या जाणाऱ्या स्वयंस्फूर्त प्रयत्नाने प्रभावित झालेल्या अमेरिकेतील बालरोगतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ सुरपुरे आणि रतन सुरपुरे या दांपत्याने यंदा पंढरीच्या वारी दरम्यान ‘निर्मल दिंडी पारितोषिक’ देण्याची घोषणा केली आहे. यामधील विजेत्यांना पहिले पारितोषिक एक लाख रुपये आणि सन्मानपत्र, दुसरे पारितोषिक ७५ हजार रुपये आणि सन्मानपत्र, तर तिसरे पारितोषिक ५० हजार रुपये आणि सन्मानपत्र असे दिले जाणार आहे.  ग्लोबल सेवा फाउंडेशनचे शशिकांत पानट, दिग्दर्शक ऋषी देशपांडे यांच्या उपस्थितीत डॉ. जगन्नाथ सुरपुरे यांनी ही घोषणा केली.

गेली दोन वर्षे डॉ. सुरपुरे स्वतः  वारीत सहभागी होत आहेत. त्यातून त्यांना ही कल्पना सुचली आहे. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘ वारीदरम्यान ठेवली जाणारी स्वच्छता ही उल्लेखनीय आहे. वारकऱ्यांच्या, स्वयंसेवकांच्या स्वयंस्फुर्त प्रयत्नांना पारितोषिकाच्या रूपाने प्रोत्साहन मिळाल्यास स्वच्छतेविषयी अधिक जागरूकता होण्यास मदत होईल. या उद्देशाने आम्ही हे पारितोषिक देण्याचे ठरवले आहे.’

रतन सुरपुरे म्हणाल्या, ‘समाजातील सर्व स्तरांतील आणि वयोगटांतील भाविकांना ही वारी आकर्षित करते. या वारी दरम्यान विविध स्वयंसेवी संस्था आणि संस्था अनेक चांगले उपक्रम राबवतात. आम्हांलादेखील याचा भाग होण्याची इच्छा असून, स्वच्छतेला अधिक प्रोत्साहन द्यायचे आहे, यासाठी आम्ही ‘निर्मल दिंडी पारितोषिक’ ही संकल्पना सादर केली आहे. स्वच्छतेबाबतीत अधिक जागृती करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या वारीमध्ये सहभागी होणारा कोणताही गट/दिंडी या उपक्रमासाठी नावनोंदणी करू शकतो. यासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. यासाठी प्रमाणित प्रवेश अर्ज वारकरी संघटनेच्या माध्यमातून देणे आवश्यक आहे व त्याबद्दलची अधिक माहिती लवकरच घोषित केली जाईल. वारीदरम्यान आमचे स्वयंसेवक सहभागी झालेल्या गटांनी राखलेल्या स्वच्छतेवर देखरेख व निरीक्षण करतील आणि आपला अहवाल स्वतंत्र परीक्षकांकडे सोपवतील. पुरस्कार सोहळा हा वारी संपल्यानंतर महिनाभरात आयोजित केला जाईल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link