Next
राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये प्रसूती; प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे वाचले महिलेचे प्राण
BOI
Saturday, August 24, 2019 | 09:41 PM
15 0 0
Share this article:नाशिक :
ठाणे-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये नुकतीच एका महिलेची प्रसूती झाली. प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे देवळाली कॅम्प येथे गाडी थांबवण्यात आली. त्या महिलेवर सैन्यदलाच्या सेवेत असलेल्या कॅन्टोमेंट बोर्डाच्या वैद्यकीय टीमने उपचार केले. त्यामुळे जन्माला आलेली चिमुरडी आणि तिची आई या दोघीही सुखरूप आहेत.

ठाणे ते मनमाडदरम्यान धावणारी राज्यराणी एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत निघाली. आयेशा शेख (३१) ही गर्भवती महिला पती जमील शेख यांच्यासह ठाण्यात जनरल डब्यात बसल्या. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे माहेर असणाऱ्या आयेशा शेख यांना पती माहेरी पोहोचवायला निघाले होते. इगतपुरी येथे महिलेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ लागला. ती खाली बसली. इगतपुरीहून गाडी सुटल्यानंतरही या महिलेच्या पोटातील कळा थांबेनात. घोटीच्या जवळ आल्यावर या महिलेला मोठ्या प्रमाणावर त्रास सुरू झाला. ती गाडीत जोरजोरात किंचाळू लागली. तिच्या पतीने तिला सीटवर झोपवले; मात्र तिचा त्रास काही कमी होत नव्हता. 

महिला जोरजोरात किंचाळत असल्याचे बघून नागरिकांनी गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला. डब्यातून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व नाशिक रोड येथील राहुल चटोले या सामाजिक कार्यकर्त्याने साखळी ओढून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. गाडी थांबल्यानंतर ड्रायव्हरला महिलेच्या स्थितीची माहिती देण्यात आली. ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनला गाडी थांबवली. तोपर्यंत महिलेच्या पोटातील बाळ अर्धे बाहेर आले होते. 

डब्यातून प्रवास करणाऱ्या आठ ते दहा महिलांनी या महिलेला साथ दिली. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नर्स जकिरा पटेल, कर्मचारी सागर जाधव यांनी ॲम्बुलन्स घेऊन तत्काळ रेल्वे स्टेशन गाठून या महिलेची परिस्थिती पाहिली. जकिरा पटेल यांनी हिंमत दाखवून जोखीम स्वीकारली आणि या महिलेची डब्यातच प्रसूती केली. तिला कन्यारत्न झाले. आयेशा शेखला अत्यानंद झाला; मात्र त्रास काही थांबत नव्हता.

त्यानंतर तिला ॲम्बुलन्सने तत्काळ कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी महिलेवर यशस्वी उपचार होऊन महिला आणि बाळ सुरक्षित असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉक्टरांनी सांगितले. जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलांनी या महिलेला धीर दिल्यामुळे आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी सागर जाधव आणि जकिरा पटेल यांनी महिलेची सुरक्षित प्रसूती केल्यामुळे त्या दोघीही सुरक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे. जगात माणुसकी आजही टिकून आहे याचे दर्शन घडत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search