Next
‘पुणेरी पलटण’च्या कर्णधारपदी गिरीश एर्नाक
प्रेस रिलीज
Thursday, September 27, 2018 | 05:20 PM
15 0 0
Share this article:

विप्रो प्रो कबड्डी लीग सीझन सहामधील पुणेरी पलटण संघाच्या जर्सीचे अनावरण करताना पुणेरी पलटणचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कांडपाल, कर्णधार गिरीश एर्नाक आणि मुख्य प्रशिक्षक अशन कुमार आदी.

पुणे : विप्रो प्रो कबड्डी लीग सीझन सहामधील पुणेरी पलटण संघाचा कर्णधार म्हणून गिरीश एर्नाकचे नाव जाहीर करण्यात आले आहे. पाचव्या सीझनपासून गिरीश पुणेरी पलटणचा अविभाज्य सदस्य असून, संघाच्या विजयात त्याचा महत्त्वाचा वाटा आहे.

पुणेरी पलटणचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कांडपाल, कर्णधार गिरीश एर्नाक आणि मुख्य प्रशिक्षक अशन कुमार यांनी सहाव्या सीझनच्या जर्सीचे, तसेच एका दृक्श्राव्य चित्रफितीचे अनावरण केले. फोर्स मोटर्स आणि किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड यांच्याशिवाय झिओमि इंडिया हा नवीन ब्रँड स्मार्टफोन पार्टनर म्हणून संघाशी जोडला गेला आहे. फोर्स मोटर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष (कार्पोरेट मटेरीअल) प्रवीण कर्नावत आणि किर्लोस्कर ब्रदर्स इंडियाचे बिझनेस हेड अनुराग व्होरा हेही या वेळी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना कांडपाल म्हणाले, ‘कबड्डीसारख्या मातीत रुजलेल्या खेळावर, तसेच पुणेरी पलटणवर विश्वास दाखवणाऱ्या सर्व प्रायोजकांचा मी अतिशय आभारी आहे. या सीझनमध्ये गिरीश संघाचा कप्तान म्हणून कार्यभाग सांभाळेल. मला खात्री आहे, की आपल्या नेतृत्वगुणांमुळे तो सीझन सहामध्ये संघाची कामगिरी उंचावेल. फोर्स मोटर्स, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड आणि इक्विओ यांनी संघाशी बांधिलकी कायम राखल्याने सीझन सहाची सुरुवात चांगली झालेली आहे. झिओमी इंडिया या वर्षी नव्याने आमच्यासोबत आलेले आहेत. या ब्रँड्सनी सातत्याने दाखवलेल्या विश्वासामुळे संघ, खेळाडू आणि खेळ बलाढ्य बनला आहे. हे ब्रँड्स खेळाशी संलग्न झाल्यामुळे खेळाचे मूल्य वाढते. इतकेच नव्हे, तर क्रीडारसिकांनाही विविध उपक्रमाच्या माध्यमांतून या ब्रँड्सशी जोडणारा एक मंच उपलब्ध होतो. आमच्या चाहत्यांचा एक संच बनला आहे, जो प्रत्येक सीझननुसार वाढत चालला आहे आणि त्यांचा उत्साह आणि आधार प्रत्येक सीझनमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साही करत असतो.’

नवनियुक्त संघनायक गिरीश एर्नाक म्हणाला, ‘संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली त्यामुळे मला सन्मानित झाल्यासारखे जाणवत आहे. मला कल्पना आहे, की ही केवळ एक पदवी नसून एक मोठी जबाबदारीसुद्धा आहे. व्यवस्थापनाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मला कृतज्ञता वाटते आणि मी पुढच्या सामन्यांत पुणेरी सिंह जोरदार गर्जना करेल यासाठी पूर्ण प्रयत्नशील राहीन. एक संघ म्हणून आमच्या प्रत्येक सदस्यांचे प्रशिक्षण आणि शक्तिवर्धन यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशन सरांच्या मार्गदर्शनाखाली सीझनमध्ये आम्ही ट्रॉफी जिंकू याबद्दल आम्हाला खात्री आहे.’

फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया म्हणाले, ‘कबड्डी या आमच्या ग्रामीण भारतातील ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय स्वदेशी खेळ आहे. अस्सल मातीतल्या या खेळाशी आमचा सहयोग आमच्या स्वदेशी, सशक्त आणि चपळ अशा उत्पादनांच्या श्रेणीचे प्रतिक आहे. विविध प्रकारे उपयुक्त असलेली आमची ट्रॅक्स श्रेणी, तसेच शेतीसाठीचे बलवान ट्रॅक्टर अशाच प्रकारचे गुण दर्शवतात. पुण्याचा स्थानिक संघ असलेल्या पुणेरी पलटणशी निगडीत झाल्याने आम्हाला आनंद होत आहे. या सीझनमध्ये आम्हाला या संघाकडून नेत्रदीपक यशाची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही संघाला शुभेच्छा देतो.’

‘किर्लोस्कर’चे अनुराग व्होरा म्हणाले, ‘पुणेरी पलटण या संघाचे सतत दुसऱ्या वर्षी सह प्रायोजक होताना आम्ही उत्साहित आहोत. पारंपरिक भारतीय खेळाशी निगडीत होऊन आम्ही सन्मानित झालो आहोत. केबीएल आणि कबड्डीमध्ये बरेच साम्य आहे. या वर्षी केबीएल आपल्या अस्तित्वाचे १३०वे वर्ष साजरे करत आहे आणि कबड्डी या स्पर्धात्मक खेळाचा प्रारंभसुद्धा २०व्या शतकाच्या सुरुवातीलाचा झाला असावा. कबड्डी खेळण्यासाठी असाधारण  शक्ती, चापल्य आणि धोर्निपानाची गरज असते केबीएलचे पंपसुद्धा बाजारात विश्वसनीयता, टिकाऊपणा, कामगिरी आणि नावीन्यासाठी प्रसिद्ध आहेत. दोन्हींमधून मेक इन इंडियाची भावना व्यक्त होते आणि दोन्हीही जगापुढे पुण्याचे प्रतिनिधित्व करत आहेत कबड्डी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली आहे आणि केबीएलसुद्धा भारतातील आठ आणि परदेशातील सात कारखान्यांच्या माध्यमातून जगभर पोहोचली आहे पुणेरी पलटणच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आम्हाला खात्री आहे आणि त्यासाठी आम्ही संघाला शुभेच्छा देतो.’

झिओमी इंडियाचे कारण श्रॉफ म्हणाले, ‘पुणेरी पलटण हा या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ असून, त्यांच्या प्रवासाचा एक भाग होत असताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. या संघाचे स्मार्टफोन पार्टनर म्हणून आम्ही यशस्वी सहभाग तसेच एक दर्जेदार सीझनची अपेक्षा करत आहोत. या सीझनमध्ये पुणेरी पलटणकडून सरस खेळ अपेक्षित असून, सन २०१८ झिओमीसाठी महत्त्वाचे वर्ष असल्याने हे वर्ष अशा प्रकारच्या सहयोगासाठी योग्य आहे, असे आम्हाला वाटते.’

विवो प्रो कबड्डी लीगच्या सहावा सीझन सात ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पुणेरी पलटणची पहिली स्पर्धा सात ऑक्टोबरला चेन्नईमध्ये यू मुंबा संघाविरुद्ध होणार आहे. पुणेरी पलटणच्या पुण्यातील स्पर्धा १८ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत होतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search