Next
‘एनपीएस’बाबत आणखी काही...
BOI
Saturday, December 09 | 03:45 PM
15 0 0
Share this story

एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टीम या विषयावरील मागील लेखात आपण त्याबाबतची प्राथमिक माहिती घेतली. ‘समृद्धीची वाट’ या सदरात आज आपण या योजनेच्या आणखी काही महत्त्वाच्या बाबींची माहिती घेऊ.
..........

एनपीएस या योजनेत एका आर्थिक वर्षात आपण कितीही रक्कम कितीही वेळा भरू शकतो. तथापि एका वेळी किमान ५०० रुपये भरणे आवश्यक असते. काही कारणाने आपण एखाद्या वर्षी अगर सलग दोन-तीन वर्षे आवश्यक असलेली किमान ५०० रुपये इतकी रक्कम भरू शकलो नाही तर आपले खाते गोठवले (फ्रीझ केले) जाते. असे ‘फ्रीझ’ झालेले खाते आपण फ्रीझ झालेल्या प्रत्येक वर्षासाठी किमान ५०० रुपये व १०० रुपये दंड भरून पुन्हा सुरू करू शकतो. यातील गुंतवणुकीवर अंदाजे १० ते १०.५ टक्के इतका परतावा (रिटर्न) मिळत असल्याचे दिसून येते. हा रिटर्न शेअर्स/म्युच्युअल फंड व्यतिरिक्तच्या अन्य पर्यायांपेक्षा निश्चितच चांगला आहे.
एका आर्थिक वर्षात ‘एनपीएस’मध्ये भरलेली रक्कम पुढीलप्रमाणे करसवलतीस पात्र असते.

- नोकरदार व्यक्तीला आपले मूळ वेतन+महागाई भत्त्याच्या एकत्रित रकमेच्या १० टक्के इतकी किंवा दीड लाख रुपये या दोन्हींपैकी कमीत कमी रकमेइतकी ‘एनपीएस’मधील  गुंतवणूक प्राप्तिकर कलम ८० सीसीडी (१)नुसार करसवलतीस पात्र असते. उदा. संदीपचे एकूण वार्षिक  मूळ वेतन पाच लाख ७५ हजार रुपये असून, महागाई भत्ता सव्वानऊ लाख रुपये आहे. त्याचा एकूण वार्षिक पगार १५ लाख रुपये इतका आहे. त्याने आर्थिक वर्षात दरमहा २५ हजार रुपये इतकी रक्कम ‘एनपीएस’मध्ये गुंतवली, तर या योजनेत एकूण तीन लाख रुपये गुंतवणूक होईल. या तीन लाखांपैकी दीड लाख रुपये (१५ लाखाच्या १० टक्के) प्राप्तिकर कलम ८० सीसीडी(१)नुसार करसवलतीस पात्र असतील; मात्र संदीपच्या कलम ८० सीसीडी (१)नुसार करसवलतीस पात्र असणाऱ्या अन्य पर्यायांमधील गुंतवणूक ९० हजार रुपये असेल, तर वरील दीड लाखातील केवळ ६० हजार रुपये करसवलतीस पात्र ठरतील. उर्वरित ९० हजारांपैकी ५० हजार रुपये प्राप्तिकर कलम ८० सीसीडी (१ब)नुसार करसवलतीस पात्र असतील. ८० सीसीडी (१ब) नुसारची ५० हजार रुपयांची वाढीव सवलत मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात देऊ केली असून, याचा फायदा जरूर घ्यावा. कारण यामुळे रिटायरमेंट प्लॅनिंग तर होतेच, शिवाय प्राप्तिकरही वाचविता येतो (विशेषत: जे करदाते २० टक्के - ३० टक्के कर भरतात, ते ५० हजार रुपये भरून १० ते १५ हजार रुपये कर वाचवू शकतात.) थोडक्यात आपली प्राप्तिकर कलम ८० सीसीडी (१)नुसार करसवलतीची दीड लाख रुपये ही मर्यादा पूर्ण झाली असेल, तर आपण ‘एनपीएस’मध्ये गुंतवणूक करून ५० हजार रुपयांपर्यंत करपात्र उत्पन्नातून ८० सीसीडी (१ब)नुसार वाढीव वजावट मिळवू शकता.

- व्यावसायिक करदात्याने ‘एनपीएस’मध्ये गुंतविलेल्या एकूण रकमेपैकी त्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या २० टक्के इतकी किंवा दीड लाख रुपये या दोहोंतील कमी असणारी रक्कम प्राप्तिकर कलम ८० सीसीडी (१)नुसार करसवलतीस पात्र असते. व्यावसायिक करदात्याससुद्धा ५० हजार रुपयांची वाढीव सवलत प्राप्तिकर कलम ८० सीसीडी (१ब)नुसार घेता येते.

एनपीएस खाते सुरू झाल्यापासून १० वर्षांनंतर किंवा वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत या पैकी जे आधी येईल तेव्हा बंद करता येते; मात्र वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर खात्यात रक्कम भरता येत नाही. खाते ६० वर्षे वयाच्या आधी बंद केले तर शिल्लक रकमेच्या केवळ २० टक्के इतकी रक्कम एकाच वेळी मिळू शकते व उर्वरित ८० टक्के रकमेच्या अॅन्युइटीज घेतल्या जाऊन त्यानुसार पेन्शन दिले जाते. शिल्लक रक्कम एक लाख रुपये किंवा त्याहून कमी असेल तर अॅन्युइटीज न घेता शिल्लक रक्कम खातेदारास एकाच वेळी दिली जाते.

एनपीएस खात्याची मुदत संपल्यावर म्हणजे वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर खात्यावर शिल्लक असलेल्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम इतकी एकाच वेळी काढता येते; मात्र काढण्याचे बंधन नाही. ६० टक्के इतकी रक्कम काढली, तर त्यातील ४० टक्के रक्कम करमुक्त असून, उर्वरित २० टक्के रक्कम संबंधित आर्थिक वर्षाच्या उत्पन्नात समाविष्ट होऊन त्यानुसार कर आकारणी केली जाईल. थोडक्यात किमान शिल्लक रकमेच्या किमान ४० टक्के इतक्या रकमेच्या अॅन्युइटीज घेतल्या जाऊन त्यानुसार पेन्शन दिले जाते; मात्र शिल्लक रक्कम दोन लाख रुपये किंवा त्याहून कमी असेल, तर अॅन्युइटीज न घेता शिल्लक रक्कम खातेदारास एकाच वेळी दिली जाते. ६० टक्के रक्कम खात्याची मुदत संपल्यावर काढलीच पाहिजे ,असे नाही. आपण वयाच्या ७० वर्षांपर्यंत २० टक्के व त्या पटीत आणि जास्तीत जास्त ६० टक्के इतकी रक्कम वयाच्या सत्तरीपर्यंत काढू शकता. काढलेल्या रकमेच्या प्रमाणात पुढे मिळणारे पेन्शन कमी होईल.
खातेदाराच्या इच्छेनुसार शिल्लक रकमेच्या १०० टक्के अॅन्युइटीज घेता येतात. यामुळे त्याला जास्त पेन्शन मिळू शकते. शिवाय एखाद्याला वयाची साठी पूर्ण झाल्यानंतर लगेचच पेन्शन नको असेल, तर जास्तीत जास्त तीन वर्षे थांबून अॅन्युइटीज घेता येतात. बाजारपेठेची स्थिती पाहून याचा निर्णय घेता येतो. खातेदाराचे वयाच्या ६० वर्षांच्या आधी निधन झाले तर वारसाला सर्व शिल्लक रक्कम लगेचच  एकाच वेळी दिली जाते. त्याला अॅन्युइटीज घेण्याचे बंधन नाही.

अॅन्युइटीज घेऊन विविध प्रकारे आपल्या गरजेनुसार पेन्शन घेता येते. यासाठी जे पर्याय आहेत त्यातील आपणास योग्य असणारा पर्याय खात्याची मुदत संपण्याच्या आधी सहा महिने घेऊन, तसे कळविणे आवश्यक असते. एकदा निवडलेला पर्याय नंतर बदलता येत नाही. उपलब्ध पर्याय असे असतात.
- युनिफॉर्म रेटने (एकसमान दराने) खातेदाराला हयात असेपर्यंत 
- पुढील ५, १०, १५ अथवा २० वर्षे फिक्स्ड पेन्शन
- हयात असेपर्यंत पेन्शन व मृत्यूनंतर गुंतविलेली रक्कम वारसाला मिळणार (शिल्लक रक्कम नाही)
- हयात असेपर्यंत दर वर्षी तीन टक्के दराने वाढत जाणारे पेन्शन 
- हयात असेपर्यंत पेन्शन व मृत्यूनंतर पत्नी/पतीस हयात असेपर्यंत ५० टक्के पेन्शन
- हयात असेपर्यंत पेन्शन व मृत्यूनंतर पत्नी/पतीस हयात असेपर्यंत १०० टक्के पेन्शन
- हयात असेपर्यंत पेन्शन व मृत्यूनंतर पत्नी/पतीस १०० टक्के पेन्शन व पत्नी/पतीच्या मृत्यूनंतर गुंतविलेली रक्कम वारसाला 

मिळणारे पेन्शन, आपण केलेली एकूण गुंतवणूक, त्याचे मुदत संपताना (वय वर्षे ६०अखेर) असणारे बाजारमूल्य, मुदतीनंतर आपण काढलेली ६० टक्क्यांपर्यंतची रक्कम, शिल्लक रकमेतून घेतलेल्या अॅन्युइटीज आणि वरील सातपैकी आपण निवडलेला पर्याय यावर अवलंबून असते. थोडक्यात असे म्हणता येईल, की एनपीएस हा रिटायरमेंट प्लॅनिंग व करनियोजनासाठी एक अत्यंत उत्तम पर्याय आहे.


- सुधाकर कुलकर्णी 
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होईल. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link