Next
पुण्यात ‘आयुष्यमान भारत’चा लोकार्पण सोहळा उत्साहात
BOI
Tuesday, September 25 | 03:36 PM
15 0 0
Share this story



पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशभरात आयुष्यमान भारतअंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला प्रारंभ झाला. या योजनेचा प्राथमिक लोकार्पण सोहळा पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात २४ सप्टेंबरला पार पडला.

या वेळी सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले, शहराचे खासदार अनिल शिरोळे, पुणे शहराचे पालकमंत्री गिरीश बापट, शहराचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मांढरे, आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. नितीन बिलोलीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, नगरसेवक उमेश गायकवाड व अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येकाला समान उपचार पद्धतीद्वारे आरोग्य सेवा देण्यात येणार असून, यामध्ये देशातील ५० कोटींपेक्षा जास्त लोकांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. ही योजना जगातील सर्वांत मोठी योजना असून, सामाजिक आणि आर्थिक उत्पन्नांच्या नोंदीवरून राज्यातील सुमारे ८४ लाख कुटुंबांची निवड केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकार आणि पालिकेच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे. पुढील टप्प्यांमध्ये खासगी रुग्णालयेदेखील सहभागी होतील. या योजनेसाठीची आर्थिक तरतूद केंद्राकडून ६० टक्के, तर राज्याकडून ४० टक्के केली जाईल.



या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयांमध्ये वर्षभरात रुग्णांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळू शकणार आहेत. जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या ९७१ सेवांव्यतिरिक्त सुमारे ४०० आरोग्यसेवा या योजनेंतर्गत कुटुंबांना मोफत मिळणार आहेत. ज्यामध्ये गुडघारोपण, खुब्याचे रोपण (हीप इम्प्लांट) आदी तुलनेने महागड्या आरोग्य सेवांचा फायदाही नागरिकांना घेता येईल.

या योजनेमध्ये राज्यातील ८३.७२ लाख कुटुंबांचा समावेश असून, पुणे शहरामधील दोन लाख ७७ हजार ६३३ कुटुंबांचा यामध्ये समावेश होणार आहे. यापैकी शहरातील दहा लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते योजनेच्या ई-कार्डचे वाटप करण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link