Next
मुलांमधील लठ्ठपणा; एक चिंतेची बाब
BOI
Wednesday, March 07, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story


पोषकतत्त्वांबद्दल अगदी तिसऱ्या वर्गापासून दहावीपर्यंत एक ते दोन धडे विज्ञानात असतातच. त्याचा आधार घेऊन मुलांना ‘हेल्दी इटिंग हॅबिटस्’चे महत्त्व पटवून द्यावे. असे अनेक उपक्रम आहेत, ज्यात पोषणाबरोबरच मेंदूला व शरीराला व्यायाम मिळेल. मुलांचे अतिरिक्त वजन हा केवळ मुलांसाठीच नाही, तर त्यांच्या कुटुंबासाठीही काळजीचा विषय आणि धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे घरातील मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांना खाण्याच्या उत्तम सवयी लावणे आणि आईने मुलांना पौष्टिक पदार्थच खाऊ घालणे आवश्यक आहे... ‘पोषणमंत्र’मध्ये आज पाहू या मुलांमधील लठ्ठपणाबद्दल..
……………………………….
‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने केलेल्या अभ्यासात असे लक्षात आले आहे, की पाच ते १८ वयोगटातील मुलांमध्ये २० टक्के मुले ही लठ्ठ किंवा अतिरिक्त चरबी असलेली आहेत. ही खूपच चिंतेची आणि धक्कादायक बाब आहे. १८ वर्षांपर्यंत मुलांची मानसिक, शारीरिक, बौद्धिक, वाढ होत असते.  ह्या वाढीचा वेग वेगवेगळ्या वयात वेगवेगळा असतो. त्यामुळे त्यांच्या गरजाही बदलत असतात.  त्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी पालकांची आहे, पण चुकीच्या गोष्टींना गरजा बनवून पालक आज नको त्या आहार - विहाराला महत्व देत आहेत आणि तिथेच खरी चूक होते.  

एक ते अठरा वयोगटात सगळ्यात जास्त पोषकतत्त्वांची गरज ही मुलांमध्ये १२ ते १५ व मुलींमध्ये १० ते १३ या वयात असते. त्यातही मुलींची वाढ ही मुलांपेक्षाही वेगाने होते. अशा वेळी आहाराकडे दुर्लक्ष करणे, म्हणजे पुढील आयुष्यातील धोक्यांना निमंत्रण देणेच आहे. पालक धावपळीचे जीवन तर जगत असतातच, पण त्यासोबतच मुलांनाही तशीच सवय लावतात. शाळा झाली की क्लास, टीव्ही, रात्रीचे जेवण आणि मग झोप, इतकेच आयुष्य मुले पाहत असतात. संध्याकाळचे मैदानावर खेळणे किंवा इतर कोणते खेळ नाहीच. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’मध्ये मुलांना असा प्रश्न केला, की किती जणांना दिवसभरात एकदा तरी घाम येतो? व्यायाम दूर राहिला, साधे संध्याकाळी मैदानातसुद्धा मुले खेळत नाहीत. कंप्युटर, मोबाईल, यामुळे शारीरिक हालचालीसुद्धा खूप कमी झाल्या आहेत. 

मुलांच्या खाण्याच्या सवयी हा दुसरा महत्त्वाचा विषय आहे. खूप आवडी-निवडी असणे आणि त्याचे कौतुक होणे ह्या दोन्ही घातक आहेत. मी स्वतः अशी अनेक मुले बघितली आहेत, की पदार्थांमध्ये घातलेला सुकामेवा आवडत नाही म्हणून बाजूला काढून टाकतात. फळे आणि भाज्यांचे तर विचारायलाच नको. पोळी-भाजीचे डब्बे तसेच घरी परत येतात, अशी अनेक पालकांची तक्रार असते. आजकाल टीव्हीवर मुलांना भाज्या आवडत नाहीत म्हणून त्याचे कटलेट करा, त्यात चीज, पनीर घालून ते तळून काढा म्हणजे मुलांच्या पोटात खूप भाज्या जातील असे कौतुकाने सांगितले जाते.  पण त्यामध्ये भाज्या अल्प आणि चीज, पनीर, यांसारखे पदार्थ जास्त.  त्यातून ते तळ्ल्यावर जास्त उष्मांक निर्माण होतात. त्यामुळे अशा पद्धतीचे बदल अतिशय चुकीचे आहेत. हे म्हणजे रोगापेक्षाही इलाज भयंकर आहेत.  

पिझ्झा, पावभाजीच्या रुपात का होईना, भाज्या पोटात जातात असे समजणारे दिव्य पालक कमी नाहीत. फळे आवडत नाहीत म्हणून हॉटेलमध्ये गेल्यावर फ्रुट विथ क्रीम किंवा आईसक्रीम मागविले जाते. अशी अनेक चुकीची उदाहरणे दाखवता येतील, ज्यासाठी मुलांचे पालक जबाबदार आहेत. स्त्रिया घराबाहेर कामासाठी जातात त्यामुळे मुलांच्या आहाराकडे आणि आरोग्याकडे जेवढे लक्ष व वेळ द्यायला पाहिजे, तेवढे दिले जात नाही. घरच्या प्रत्येकाचा वाढदिवस बाहेरच साजरा होणार, कुटुंबाचे गेट टुगेदर बाहेरच, असे सगळे हॉटेलमधले हाय कॅलरीज पदार्थ वजन वाढवणारच. पोषण राहिले बाजूला, त्यासोबत सॉफ्ट ड्रिंक्स, चॉकलेट, केक, पेस्ट्री, आहेच. 

आईला वेळ मिळत नाही म्हणून पैसे दिले जातात आणि मग शाळेच्या कँटीनमध्ये सामोसा, वडापाव व तत्सम पदार्थ खाल्ले जातात. नंतर याची चटकच लागते. त्याचे सवयीत रुपांतर होऊन ती मोडणे पुढे अवघड होते. परिणामी लहानपणीच मुलांचे वजन आणि पोटाचा घेर खूपच जास्त होतो. दोन जिने चढल्यावर धाप लागणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, मंद हालचाली, एवढेच नाही, तर मेंदूच्या कार्यक्षमतेवरसुद्धा विपरीत परिणाम होतो. नंतर घरातील मोठ्या व्यक्तींना जाग येते आणि मग ह्यावर तोडगा शोधण्याची गरज भासू लागते, पण तोवर बराच उशीर झालेला असतो.  

यावर उपाय एकच घरातील गृहिणीने सुरवातीपासूनच खाण्याच्या चांगल्या सवयी लावणे. पोळी भाजीव्यतिरिक्त डब्यात रंगीबेरंगी सॅलड देऊ शकतो, सॅलडसाठी भाज्या कापायला दोन मिनिटे लागतात. त्यातच थोडे कडधान्य घालून लिंबू पिळले की एक महत्वाचा घटक असलेल्या ‘क’ जीवनसत्त्वाची तरतूद होऊन जाते.  दिवसातून एक ते दोन फळे खाणे आवश्यकच आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. भाज्या आवडत नाहीत म्हणून तळकट कटलेटपेक्षा थालीपिठाच्या गोळ्यात भाज्या किसून घालणे, मोमोज, धिरडी, किंवा इडली, पांढरा ढोकळा यात भरपूर भाज्या धने असे आरोग्यदायक पर्याय वापरता येतात. मुगाची खिचडी किंवा मसालेभात करताना त्यात भाज्या घाला. वरण पोटात जात नसेल, तर मिश्र डाळींचे धिरडे, मिश्र कडधान्याची उसळ, किंवा मसाला पापडाप्रमाणे पापड भाजून त्यावर भाज्या व कडधान्याचे मिश्रण आणि वरून चाट मसाला घातल्यास चविष्ट पदार्थ पोटात जातील. फक्त थोडा वेळ काढण्याची गरज आहे.  

पोषकतत्त्वांबद्दल अगदी तिसऱ्या वर्गापासून दहावीपर्यंत एक ते दोन धडे विज्ञानात असतातच. त्याचा आधार घेऊन मुलांना ‘हेल्दी इटिंग हॅबिटस्’चे महत्त्व पटवून द्यावे. मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी खेळाडू, वैज्ञानिक, मोठे अधिकारी, संत इत्यादींची चरित्र पुस्तके वाचायची सवय लावावी. टीव्ही व मोबाईल आणि कंप्युटर सोडून एक छंद जोपासण्याची गरज आहे. सुटीच्या दिवशी मॉलमध्ये फिरून शॉपिंग करणे आणि हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा आजूबाजूच्या परिसरातील ऐतिहासिक किंवा निसर्गरम्य स्थळी, किल्ल्यांना भेटी दिल्यास किंवा भटकंती केल्यास इतिहासाला उजाळा मिळेल. 

बागकाम हा एक छंद होऊ शकतो, हे आपल्या डोक्यातही येत नाही. आजकाल जागेच्या अभावामुळे, कुंड्यांमध्ये विविध झाडे लावून व त्यांची काळजी घेऊन बागकामाचा छंद जोपासता येऊ शकेल. विज्ञान हा विषय घरातील वनस्पती थेट घरच्या घरी हाताळून मुले प्रयोगशील होतात व बागकामामुळे व्यायाम पण होतो व स्वतः उगवलेल्या भाज्या आणि फळे खाताना आनंद मिळतो तो वेगळाच. हे एक उदाहरण झाले. असे अनेक उपक्रम आहेत, ज्यात मेंदूला व शरीराला व्यायाम मिळेलच पण सगळ्या कुटुंबाच्या सहभागाचा आनंदसुद्धा वाढेल. मुलांचे अतिरिक्त वजन हा केवळ मुलांसाठीच नाही, तर त्यांच्या कुटुंबासाठीही काळजीचा विषय आणि धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे घरातील मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांना खाण्याच्या उत्तम सवयी लावणे आणि आईने मुलांना पौष्टिक पदार्थच खाऊ घालणे आवश्यक आहे. 

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.) 

(‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link