पुणे : येत्या २६ जानेवारीपासून पुण्यात सतराव्या लोकशाही उत्सवाला सुरुवात होत असून दरवर्षीप्रमाणेच उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या महोत्सवाची सुरूवात २६ जानेवारीला समलिंगी जोडप्याच्या हस्ते झेंडावंदन करून होणार आहे, अशी माहिती ‘लोकशाही उत्सव समिती’ने दिली आहे.
लोकशाहीचे संरक्षण व्हावे व ती अबाधित राहावी या हेतूने पुण्यात २००३पासून लोकशाही उत्सव साजरा केला जातो. लोकशाहीच्या जमेच्या बाजूंकडे लक्ष वेधत लोकशाहीसमोर असलेल्या आव्हानांची विविध माध्यमांद्वारे चर्चा घडवून आणणे हा या उत्सवाचा हेतू आहे. त्या-त्या वर्षी लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या प्रश्नांवर उत्सवात चर्चा घडवली जाते. ‘कलम ३७७’संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल विचारात घेऊन या वर्षीचे झेंडावंदन समीर समुद्र आणि अमित गोखले या समलिंगी जोडप्याच्या हस्ते २६ तारखेला सकाळी होणार आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (समाजशास्त्र विभाग), सेट गीराज महाविद्यालय (समाजशास्त्र विभाग) आणि मुंबई या गटांचे तरुण विद्यार्थी पथनाट्ये सादर करणार आहेत.
या लोकशाही महोत्सवात परिसंवाद, व्याख्यान, सभा, चित्रपट, नाटक, पथनाट्ये, कार्यशाळा, प्रदर्शन हुतात्म्यांना अभिवादन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यासह महाराष्ट्रात अन्य ठिकाणीही याच कालावधीत लोकशाही उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्याबरोबरच अंबाजोगाई, सांगोला, नवी मुंबई, मुंबई, नंदुबार, शहादा, धडगाव, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, भिवंडी, केज, बार्शी, तुळजापूर या तालुक्यांच्या ग्रामीण भागातही याच वेळेस हा लोकशाही उत्सव साजरा होणार आहे.
सकाळी सव्वा दहा वाजता ‘जीवनोत्सव’ या निसर्गसंवादी पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा आग्रह धरणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्ते माधव सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते होणार आहे. उत्सवात २६ तारखेला ‘चौरंगा’ या चित्रपटाचा विशेष खेळ, तर २९ तारखेला ‘समाजसुधारक मित्र मंडळ’ हे तरुणांनी केलेले नाटक होणार असून या दोन्हींसाठी देणगी प्रवेशिका घेणे आवश्यक आहे.
२६ तारखेला संध्याकाळी ‘शेती आणि दुष्काळ : जात, वर्ग, पितृसत्ता आणि राज्याची भूमिका’ या विषयावरील सभेत सीमा कुलकर्णी व डॉ. उदय नारकर सहभागी होणार असून ज्येष्ठ कार्यकर्ते संपतराव पवार अध्यक्षस्थानी असतील. याशिवाय विविध विषयांवरील परिसंवाद आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही उत्सवात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन, लोकशाही संरक्षण-संवर्धनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
देणगी प्रवेशिकांसाठी संपर्क
मुक्ता : ७७२२० ३९८५१, अल्का : ७७२२० ३९८५२, शंकर : ९५५२१ ६७७०२