Next
गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात मराठीचा जागर
प्रेस रिलीज
Thursday, February 15, 2018 | 04:11 PM
15 0 0
Share this article:

दीपप्रज्वलन करून गुंफण सद्भावना साहित्यसंमेलनाचे उद्घाटन करताना अशोक याळगी, डॉ. बसवेश्वर चेणगे, सुनील चव्हाण, संमेलनाध्यक्ष डॉ. महेंद्र कदम, विलास बेळगावकर, गुणवंत पाटील.
जांबोटी (बेळगाव) :  ‘मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. तिचा प्रत्येकाने अभिमान बाळगणे आवश्यक आहे. हा अभिमानच मराठी आणखी समृध्द करेल’, असा विश्वास १५ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी व्यक्त केला.

मसूर (जि. सातारा) व जांबोटी मल्टिपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जांबोटी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथे आयोजित केलेल्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार व संमेलनाचे उद्घाटक अशोक याळगी, माजी आमदार दिगंबर पाटील, जांबोटी सोसायटीचे अध्यक्ष विलास बेळगावकर, गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, अकादमीचे सीमाभागाचे समन्वयक गुणवंत पाटील, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, ग्रंथ प्रसारक सुनील चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र व सीमाभागाचे नाते गुंफण्यासाठी जिथे मराठी माणूस तेथे मराठीचा विचार गुंफण्यासाठी गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचा प्रपंच राबविण्यात येतो. ‘मराठी साहित्य, समाज व संस्कृतीच्या माध्यमातून निकोप समाज निर्मितीचा हा प्रयत्न असल्याचे’, उद्गार गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी काढले. 

संमेलन तिथे ग्रंथालय उभारण्याची संकल्पना राबविण्याचा प्रघात गेल्या कित्येक वर्षापासून गुंफणच्या माध्यमातून राबविला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी साहित्याला गुंजीकरांनी आपल्या साहित्यिक प्रतिभेने उजळून टाकले आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाची महाराष्ट्राने दखल घेतली पाहिजे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या उपक्रमातील महत्त्वाचा भाग म्हणून गुंजीकरांचे समग्र साहित्य महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावे यासाठी गुंफणच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. माजी आमदार दिगंबर पाटील यांनी संमेलनास शुभेच्छा दिल्या.

जांबोटीतील राममंदिरापासून ग्रंथदिंडीला टाळमृदंगाच्या गजरात सुरुवात करण्यात आली. ग्रंथदिंडीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. लेझीमच्या तालावर फेर धरणाऱ्या विद्यार्थिनी आणि अभंगाचा जयघोष यामुळे दिंडीतील वातावरण भारावून गेले होते. शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, बेळगाव तालुकाप्रमुख सचिन गोरले, राजकुमार बोकडे, प्रवीण सेजम, राजू तुडयेकर, विजय सावंत, विजय मुरकुटे, महेश कुलाल, पिराजी शिंदे, तानाजी पावशे, राहुल कुडे, महेश टंकसाळी, रवी जाधव, शंकर बिर्जे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी ग्रंथदिंडीत सहभागी होऊन सीमाप्रश्न आणि मराठी भाषिकांबद्दलची बांधिलकी अधोरेखित केली. ग्रंथदिंडीत दान केलेली पुस्तके जांबोटीतील गुंफण ग्रंथालयाला भेट देण्यात आली. चंद्रकांत कांबिरे यांनी सूत्रसंचालन केले. 

संमेलनात अकादमीच्या वतीने प्रसिध्द ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांना ‘स्व. रामचंद्र चेणगे जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. याशिवाय प्रकाश क्षीरसागर (पणजी) यांना गुंफण साहित्य, राजेंद्र चोरगे (सातारा) यांना गुंफण सामाजिक, नारायण कापोलकर (सावरगाळी, जि. बेळगाव) यांना गुंफण सांस्कृतिक, अॅमड. प्रमोद आडकर (पुणे) यांना गुंफण सद्भावना, पत्रकार विजय पाटील (कराड) यांना गुंफण पत्रकारिता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. 

 ‘कविता वाचणं, ऐकणं आणि लिहणं ही अंत:करणातून उमटलेली साद असते. त्यामुळे या आल्हाददायक प्रवासाची अनुभूती घेण्याची ओढ हीच काव्यनिर्मितीची खरी प्रेरणा असते. असे अंत:करणातून उमटलेले काव्य कविलाच नव्हे तर रसिकालाही कवितेचे वेड लावून जाते,’ असे विचार इचलकरंजी येथील कवि रफिक सूरज यांनी मांडले. दुसऱ्या सत्रातील कवि संमेलनात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील कविंनी विविध विषयांवरील दमदार कविता सादर करुन कविसंमेलनास बहार आणली. नारायण मोकाशी यांनी ‘सच्चा शेतकरी’ ही कविता सादर करुन रसिकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या केल्या. सुजित कदम यांनी ‘मेसेज’ या कवितेतून आईच्या निधनाने दु:खी झालेल्या मुलाच्या भावना मांडल्या. 

प्रा. अशोक अलगोंडी यांनी पुस्तक, अजय पाटील याने बगळ्यांची शाळा, प्रमोद सुकरे यांनी दिल्लीतील निर्भया घटनेवरील एक पणती, अभिनंदन गरगटे यांनी ओढ, प्रा. आय. एम. गुरव यांनी अडोळ्याचे ढग, रफीक सूरज यांनी तुझ्या जगण्यावर माझे भविष्य ही कविता सादर केली, चित्रा क्षीरसागर यांनी नदीचा काठ, विजय सातपुते यांनी बापमाया, आदिती गुरव हिने इथे असलेली, धनंजया नाईक हिने भारताची स्वच्छता, प्रमोद काडापूरकर याने कविता कविता असते काय? ही कविता सादर केली. पंधराहून अधिक कविंनी सादर केलेल्या एकापेक्षा एक भावस्पर्शी कवितांनी संमेलनाची उंची आणखी वाढवली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search