Next
मूकबधिर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वस्तूंचे प्रदर्शन
रत्नागिरीतील के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातर्फे आयोजन
BOI
Tuesday, October 30, 2018 | 02:00 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या (कै.) केशव प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी अनेकविध प्रकारच्या वस्तू साकारल्या आहेत. या वस्तूंचे प्रदर्शन एक ते तीन नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. विद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेले हे ३५वे हस्तकला प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात वस्तूंची विक्रीही होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचे मातीपासून बनवलेले छोटे पुतळे, उटणे, कापडी पिशव्या, लाकडी वस्तू, करवंटीपासून विविध वाद्यांचे शो-पीस, लाकडी खेळणी, गाड्या, पणत्या, आकाशकंदील, लहान मुलांचे कपडे आदी गोष्टी तयार करण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. गणेशोत्सव संपल्यापासून लगेचच विद्यार्थ्यांनी या वस्तू तयार करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. कलात्मकता आणि व्यवसायाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने गेली अनेक वर्षे हे हस्तकला प्रदर्शन भरवण्यात येत आहे. कलात्मक शुभेच्छापत्रे करण्यात या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा हातखंडा आहे. केवळ स्क्रीन प्रिंटिंगच नव्हे, तर विविध माध्यमांतून हे विद्यार्थी शुभेच्छापत्रे साकारतात. या सर्व वस्तूंची विक्रीही केली जाते.एक नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यतीन पुजारी यांच्या हस्ते शाळेच्या सभागृहात प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, मुख्याध्यापिका अनुराधा ताटके, व्यवस्थापक शेखर लेले, सचिव दाक्षायणी बोपर्डीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित्रा बोडस, पालक आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.मुख्याध्यापिका अनुराधा ताटके, शिक्षक गजानन रजपूत, रमेश घवाळी, मंगल कोळंबेकर, सीमा मुळे, उपासना गोसावी, गायत्री आगाशे, स्पृहा लेले, तसेच प्रतिमा बोरकर, शीतल केळकर, दीप्ती खेडेकर, हनुमंत गायकवाड हे कर्मचारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.‘प्रदर्शनाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना समाजातील घटकांशी संवाद साधता येतो. त्यातून व्यवहारज्ञान कळते. त्याचा उपयोग भावी काळात त्यांच्या पुनर्वसनासाठी होतो. रत्नागिरीकरांचा दर वर्षी या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळतो,’ असे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा ताटके यांनी सांगितले. शाळेविषयी...
संपर्काच्या मुख्य माध्यमापासून दूर असणारी मूकबधिर मुले समाजाच्या प्रवाहापासून दूर राहतात. त्यांच्यासाठी ज्ञानाची कवाडेच बंद होतात. अशा या उपेक्षित मुलांसाठी काहीतरी करायला हवे, अशा तळमळीतून दोन जुलै १९८२ रोजी या विद्यालयाची स्थापना झाली. शालेय शिक्षणाबरोबरच भाषा, गणित आणि एकंदरीत व्यवहारज्ञान येथे शिकविले जाते. मराठी आणि इंग्रजी चिन्हांनी समृद्ध अशा ‘करपल्लवी’च्या साह्याने विद्यार्थी आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त करतात. या मुलांना मूर्तिकाम, हस्तकला, सुतारकाम, शिवणकला, बागकाम शिकवले जाते. येथील मुलांच्या हस्तकलेतून साकारलेल्या विविध वस्तू पाहताना मती गुंग होऊन जाते. आतापर्यंत शाळेतून शिकून बाहेर पडलेले ४००हून अधिक विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. शिवणकला, टंकलेखन, ब्युटिशियन, टर्नर फिटर, फॅशन डिझायनिंग, फ्रीज दुरुस्ती, चित्रकला, बागकाम, घड्याळ दुरुस्तीसारखे प्रशिक्षण घेऊन ते व्यवसाय करत आहेत.

प्रदर्शनाविषयी : 
स्थळ : (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय
गुरुवर्य पु. वा. फाटक स्मृती भवन,
लक्ष्मी चौक, रत्नागिरी
कालावधी : एक ते तीन नोव्हेंबर 2018
वेळ : सकाळी १० ते रात्री आठ

(विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तूंची झलक, मुख्याध्यापिका अनुराधा ताटके आणि विद्यार्थी अक्षय जाधव यांचे मनोगत सोबतच्या व्हिडिओत....)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search