Next
पंढरीतल्या विद्यार्थ्यांनी साधला ‘कलापंढरी’तल्या विद्यार्थ्यांशी संवाद
BOI
Tuesday, July 17, 2018 | 11:00 AM
15 1 0
Share this story

सोलापूर : रोपळे (ता. पंढरपूर) येथील श्री शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पंढरपूर येथे आलेल्या ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या विद्यार्थ्यांशी १४ जुलै रोजी संवाद साधला. चित्रकलेत करिअर करायचे असेल, तर शाळेत असल्यापासूनच आवड कशी जोपासायला हवी, याबद्दल त्यांना ‘जेजे’च्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. 

‘जेजे’चे विद्यार्थी चित्ररूप संतमेळा साकारण्यासाठी सध्या पंढरपुरात आले आहेत. त्या संदर्भातील बातमी आणि व्हिडिओ ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर १२ जुलै रोजी प्रसिद्ध झाली होती. ती बातमी पाटील विद्यालयातील काही विद्यार्थी आणि शिक्षकांनी वाचली. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक एस. एम. बागल, कलाशिक्षक कल्लेश्वर पानसांडे आणि काही विद्यार्थ्यांनी ‘बाइटस ऑफ इंडिया’चे प्रतिनिधी मोहन काळे यांच्याशी संपर्क साधला. पाटील विद्यालयातील काही विद्यार्थी चित्रकलेच्या एलिमेंटरी ग्रेड परीक्षेला बसले असून, त्यांना कलाशिक्षणाची पंढरी असलेल्या ‘जेजे’च्या विद्यार्थ्यांना भेटण्याची इच्छा असल्याचे त्यांनी काळे यांना सांगितले. त्यानुसार, या विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेतली.

पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘जेजे’च्या विद्यार्थ्यांची अफलातून चित्रकला ‘याचि देही याचि डोळा’ पाहिली. चंद्रकांत हल्याळ यांनी चित्ररूपी संतमेळ्याची म्हणजेच संतांची चित्रे कशी साकारली जात आहेत, याची माहिती दिली. त्यांनी चित्रकलेतील बारकावे तर सांगितलेच; पण चित्रकला ही केवळ कला नसून, ती जगण्याचीही एक कलाच असल्याचे सांगितले. ही कला आत्मसात करायची असेल, तर विद्यार्थ्यांच्या अंगी मुळातच चित्रकलेची आवड असावी लागते, असेही त्यांनी सांगितले. हल्याळ त्यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीतील प्रगती काळे या विद्यार्थिनीचे स्केच काढून दाखविले. चित्रे रंगवण्यासाठी कोणता ब्रश वापरावा इथपासून चित्रातून भाव कसा प्रकट करता येतो, याबद्दलही त्यांनी माहिती दिली. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेबद्दलही त्यांनी सांगितले. त्या संस्थेत कोणाला प्रवेश घ्यायचा असेल, तर आत्तापासूनच चित्रकलेचा सराव करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. 

सी. बी. सॅम्युअल, स्वप्नील जगताप, गणेश आठवले, अभिजित पाटोळे, आकाश काशिद, अक्षय माने, व्यंकटेश शिंदे, कृष्णा पंडित यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता सातवीतील साहिल काळे व इयत्ता आठवीतील माधवी भोसले यांनी आभार व्यक्त केले.
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अशोक गायकवाड About 217 Days ago
छान बातमी
0
0
दत्ता भोसले About 218 Days ago
असा संवाद व्हायलाच हवा .
0
0
एस. एम . पाढरे About 219 Days ago
छान बातमी . असा संवाद व्हायलाच हवा .
0
0

Select Language
Share Link