Next
मुंबई : इतिहास आणि पर्यटन
BOI
Saturday, August 24, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

गेटवे ऑफ इंडिया

‘करू या देशाटन’
सदराच्या आजच्या भागापासून माहिती घेऊ या मुंबईतील पर्यटनस्थळांची. सुरुवातीला पाहू या मुंबईचा थोडा इतिहास...
.....
मुंबई ही सर्वच भारतीयांची जान आहे. इथे जो आला तो रमला. मुंबई म्हणजे छोटा भारतच. ही भारताची आर्थिक राजधानी आहे. ६०३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या महानगराच्या दक्षिण-पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला वसईची खाडी (उल्हास नदी), पूर्वेला ठाणे खाडी, मलबार, खंबाला, वरळी, पाली, गिल्बर्ट, शिवडी, अँटॉप इत्यादी छोट्या-मोठ्या टेकड्या आहेत. यामुळे मुंबईला एक नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. पर्यटकांच्या दृष्टीने तर मुंबापुरी खूपच महत्त्वाची आहे. त्यापूर्वी मुंबईचा थोडा इतिहास पाहू या. 

मुगा नावाच्या कोळ्याने सध्याच्या फोर्ट भागात मुंबादेवीचे देऊळ बांधले. त्यावरून मुंबई हे नाव पडले असावे, असे सामान्यपणे मानले जाते. मुंबई बेटाच्या उत्तरेकडील वांद्रे, कुर्ला, ठाणे, घाटकोपर व अंधेरी या बेटावरील प्रमुख भाग म्हणजे साष्टी बेट. उल्हास नदीच्या वसई खाडी व ठाणे खाडी या पलीकडील भूभाग मुख्य कोकण किनारपट्टीपासून वेगळा झाला आहे. त्यातील ठाणे व भाईंदर महापालिकेचा भाग सोडून सध्याचे बृहन्मुंबई क्षेत्र आहे. याला दुसऱ्या एका मतानुसार सहासष्टी (सहासष्ट) याचे हे छोटे रूप आहे. या ठिकाणी सहासष्ट गावे होती म्हणून हे नाव रूढ झाले, असाही एक मतप्रवाह आहे. मुंबईमध्ये फार पूर्वीपासून कोळी वस्ती आहे. रोमन प्रवासी टॉलेमी याने केलेला हेप्टानेशिया हा उल्लेख (इ. स. पू. १५०) बहुधा मुंबईचा असावा, असे मानले जाते. प्रागैतिहासिक काळातील भूपृष्ठाच्या उलथापालथीचे होणारे परिणाम दाखविणारे बेडूक, खैर वृक्ष इत्यादींचे अवशेष येथे दिसून आले आहेत. सध्या बॅकबेच्या किनाऱ्यावर सापडलेल्या अश्मयुगातील दगडी आयुधांच्या अवशेषांवरून प्राचीन काळी येथे मानवी वस्ती असावी, असे दिसते. या भागात कोकणातील आभीर व नंतर त्रैकूटक यांची सत्ता होती. इसवी सनाच्या पाचव्या शतकातील त्रैकूटक राजा कृष्ण याची नाणी मुंबई व साष्टी बेटांवर सापडली आहेत, यावरून तसे म्हणता येते. कान्हेरी येथील बौद्ध गुंफांमुळे या भागाचा इतिहास सातवाहन काळापर्यंत जातो. त्यानंतर कोकणातील मौर्य आणि नंतर चालुक्य यांच्या अंमलाखाली हा भाग होता. पुढे उत्तर कोकणाचे राज्य राष्ट्रकूटांकडून शिलाहारांकडे आले. इ. स. ८००–१२६०च्या सुमारास शिलाहारांच्या काळातच वाळकेश्वराची स्थापना झाली. पाठारे प्रभू, कायस्थ प्रभू त्या काळातच येथे आले. शिलाहारांचा सागरी युद्धात पराभव करून यादवांनी येथे आपला अंमल प्रस्थापित केला. 

मुंबादेवी मंदिररामदेवराव यादवानंतर वीस-पंचवीस वर्षांतच मुंबईवरील हिंदूंचा अंमल संपुष्टात आला. त्यानंतर गुजरातचच्या सुलतानाने या भागावर कब्जा केला. १६२९मध्ये डचांच्या मदतीने इंग्रजांनी मुंबई लुटली होती. पोर्तुगीजांनी गुजरातच्या सुलतानांकडून हा भाग व्यापारासाठी मिळविला व त्यानंतर येथे पाय रोवण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रथम येथे किल्ला उभारला. 
दरम्यान, पोर्तुगीजांनी गोवा, वसई, पालघर, दीव-दमण येथे आपले लक्ष केंद्रित केले होते. या वेळी ज्यू, पारशी लोकही येथे आले. १५३४मध्ये गुजरातच्या सुलतानाने मुंबई आणि वसई पोर्तुगीजांच्या ताब्यात दिली व तेथील मुसलमानी अंमल संपला. पोर्तुगीजांकडून मुंबई विकत घेण्याचा प्रयत्नही इंग्रजांनी केला होता. 

१६४०मध्ये दोराबजी नानाभॉय पटेल हा पहिला पारशी येथे आला. दोराबजी पोर्तुगीजांसाठी व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. जेव्हा मुंबई ब्रिटिशांना देण्यात आली, तेव्हा दोराबजींना करवसुलीचे काम इंग्रजांनी दिले. त्यांचे कुटुंबीय १८३४पर्यंत हे काम करीत होते. पारशी लोकांनंतर ज्यू (बेने इस्रायली) १७४६मध्ये मुंबईमध्ये आले. त्यांना ब्रिटिशांनी धार्मिक स्वातंत्र्य दिले. त्यांनी येथे तेल गाळण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याच वेळी काही लोक अलिबाग येथेही राहण्यास गेले. मुंबईमध्ये ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीत काही जण नोकरी करू लागले. तसेच काही जण सैन्यातही भरती झाले. स्वातंत्र्यानंतर १९४८च्या सुमारास मुंबई व इतर ठिकाणांहून ३० हजार ज्यू पुन्हा इस्रायलकडे गेले. ते तेथेही मराठीत बोलतात. आज जवळ जवळ १० हजार लोक इस्रायलमध्ये मराठी बोलतात. 

माझी इस्रायलची फेसबुकवरील मैत्रीण यारदांना ससोनकर हिने मला बरीच माहिती दिली. तेवढी येथे लिहिणे शक्य नाही. पोर्तुगीजांनी १६६२मध्ये हा भाग इंग्रजांकडे सुपुर्द केला. यादरम्यान जंजिऱ्याच्या सिद्दीने बेटांवर जबरदस्तीने हा भाग पुन्हा ताब्यात घेण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु दोराबजीचा मुलगा रुस्तमजी दोराबजी याने इंग्रजांच्या वतीने या बेटांवरील कोळी लोकांच्या मदतीने हल्ल्यांना यशस्वीरीत्या थोपविले होते. कोळी वसाहती अजूनही बॅकबे रेक्लेमेशन, माहीम, वांद्रे, खार वगैरे ठिकाणी आहेत. कोळ्यांच्या बरोबरीने आगरी व भंडारी समाज फार पूर्वीपासून येथे आहे. साधारण १७९९मध्ये कान्होजी आंग्रे यांचा नातू रघोजी आंग्रे याचा मृत्यू झाल्यानंतर इंग्रजांनी मुंबईमध्ये आपले बस्तान पक्के केले. नंतर पेशवाईतील घरगुती कलहाचा फायदा उठवीत घाटावरून त्यांनी पुण्यामध्ये शिरकाव केला. 

मुंबई बेट व साष्टी बेटाचा मोठा भाग मिळून मुंबई महानगर तयार झाले आहे. मुंबई बेट हे मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, वरळी व माहीम या मूळ सात बेटांचे एकत्रीकरण होऊन तयार झाले आहे. 

गेटवे ऑफ इंडिया - १९२४मधील फोटो

ठिकठिकाणी खाजणे असलेला या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता. ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. जेराल्ड आंजिअर (१६७०–७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र मागे हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याच्यानंतर तो टप्पाटप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली. जेराल्ड आंजिअर हा येथे येण्यापूर्वी सुरतला होता. शिवाजी महाराजांनी सुरतेवर केलेल्या हल्ल्यावेळी तो तेथे होता. त्या हल्ल्यात इंग्रजांचे नुकसान झाले नसले, तरी शिवाजी महाराजांची दहशत मात्र निर्माण झाली. १६७२मध्ये त्याने सुरतेहून मुंबईला मुख्य ठाणे हलविले. इंग्रजी कायदा व न्यायालये, टाकसाळ, रुग्णालय, छापखाना, नगररचना, स्थानिक समाजांच्या पंचायती अशा प्रशासकीय सुधारणा त्याने केल्या. गुजराती बनिया व आर्मेनियन या व्यापारी समाजांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईची रचना करण्याची सुरुवात त्याने केली. 

गेटवे ऑफ इंडिया परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

खरे तर जेराल्ड आंजिअर याला मुंबईचा आद्य नगररचनाकार असे म्हणावे लागेल. १६६२च्या सुमारास इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स व पोर्तुगालची राजकन्या इन्फंटा कॅथरिन यांच्या विवाहानिमित्त पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना आंदण म्हणून दिली. प्रत्यक्षात जानेवारी १६६५मध्ये इंग्रजांना तिचा ताबा मिळाला. चार्ल्सने १६६८मध्ये ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला मुंबई भाड्याने दिली. मुंबईत आरंभी माझगाव, परळ, वरळी या भागात वस्ती होती. परळ व शिव येथे कुणबी राहत. वरळी येथे कोळी, भंडारी समाज राहत होता. माहीम भागात बरेचसे मुसलमान, थोडे प्रभू व साष्टीमधून आलेले काही ब्राह्मण अशी वस्ती होती. १६७०मध्ये सुरतेहून व्यापाराच्या निमित्ताने गुजराती बनिया येऊ लागले. त्याचबरोबर बोहरी, मुसलमान व्यापारीही येऊ लागले. 

मुंबईच्या प्रगतीचा धावता आलेख 
- १७१५ ते १७२२ : चार्ल्स बून याने फोर्ट विभागाचा व गोदीचा विस्तार केला. तसेच ‘बाँबे मरीन’ या आरमाराची स्थापना केली. 
- त्यानंतर मुंबईत कोर्ट ऑफ ऑयर अँड टर्मिनस व मेयर्स कोर्ट यांची स्थापना झाली. 
- १७४८मध्ये नागरी बांधकामाचे नवे नियम करण्यात आले 
- १७५७मध्ये सांडपाणी व्यवस्था सुरू झाली. 
- १७६१च्या सुमारास फोर्ट विभाग व्यापारी व सरकारी कामकाजाचे केंद्र ठरले. 
- १८०३च्या अग्निप्रलयात मुंबईचा बराच भाग नष्ट झाला. त्यामुळेच उमरखाडी, भुलेश्वर, मांडवी इत्यादी भागांचा विकास होऊ शकला. 
- १८०५ : रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना
- १८०५ : साष्टी व मुंबई बेटे जोडणारा ‘शीव मोसमी पूल’ तयार झाला. - ३ नोव्हेंबर १८३८  :  बम्बई टाइम्स और जर्नल ऑफ कामर्स या नावाने पहिले इंग्रजी वर्तमानपत्र सुरू झाले. ते फक्त शनिवार व बुधवारी प्रकाशित व्हायचे. १८६१मध्ये दी टाइम्स ऑफ इंडिया असे त्याचे नाव बदलण्यात आले. 
- १८५३ : लोहमार्गाची सुरुवात 
- १८५४ : कापडगिरण्यांची सुरुवात. मुंबईत ज्या सूतगिरण्या निघाल्या, त्यामुळे मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढण्यास मदत झाली. श्री कावसजी नानाभाई दावर यांनी १८५४च्या फेब्रुवारी महिन्यात बॉम्बे स्पिनिंग अँड वीव्हिंग कंपनी व पायोनियर स्पिनिंग फॅक्टरी काढली आणि मुंबईच्या औद्योगिकरणाच्या पाय घातला गेला. 
- १८५७ : सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टची स्थापना
- १८६२ साली किल्ला व भोवतीचा खंदक पाडून रस्ते व इमारतींसाठी जागा उपलब्ध करण्यात आली. 
- १८६५ : मुंबई नगरपालिकेची स्थापना
- १८६७ : प्रार्थना समाज
- ९ मे १८७४ रोजी ट्राम वाहतूक सुरू झाली. 
- १८७५ : आर्य समाज
- १८८५ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन
- ७ मे १९०७ रोजी पहिली विजेची ट्राम चालू झाली (३१ मे १९६४ रोजी मुंबईतील ट्राम वाहतूक बंद करण्यात आली). 

मुंबईच्या संक्षिप्त इतिहासानंतर आता पाहू या मुंबईच्या पर्यटनाबद्दल...

मुंबादेवीमुंबादेवी : मुंबादेवी म्हणजेच मुंबईची कुलदेवी, आराध्यदेवता होय. जीव मुठीत घेऊन समुद्रावर आपले जीवन व्यतीत करणाऱ्या कोळी बांधवांची मुंबादेवीवर अपार श्रद्धा असल्याने मुगा नावाच्या कोळ्याने मुंबादेवीचे देऊळ बांधले. ते मुंबईचे मूळ रूप असावे, असा एक तर्क आहे. म्हणून मुंबादेवीला सर्वांच्या श्रद्धेचे ठिकाण मानले जाते. याच देवीच्या नावावरून मुंबईला मुंबई हे नाव मिळाले आहे. मुंबादेवीचे मंदिर दक्षिण मुंबई भागात भुलेश्वर परिसरात आहे. ते ४०० वर्षे जुने आहे. 
मुंबादेवीचे मूळ मंदिर सुरुवातीच्या काळात बोरीबंदर स्थानकाजवळ असलेल्या फणसी तलावाच्या काठावर होते. इ. स. १७३७मध्ये मुंबईभोवतीच्या किल्ल्याचा विस्तार करण्याचे ठरवले गेले, तेव्हा तत्कालीन सरकारने हे मंदिर हलवून ते सध्याच्या काळबादेवी भागात नेण्याचा आदेश दिला. या नवीन मंदिराचे बांधकाम आपली जागा देऊन सन १७५३मध्ये पांडू सोनार नावाच्या प्रख्यात मराठी व्यापाऱ्याने केले. मंदिरातील पूजाअर्चा तेच करीत असत. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार त्याचा ट्रस्ट करण्यात आला व आता मंदिराची देखभाल या ट्रस्टमार्फत होते. 

गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम चालू असतानाचा फोटो

गेटवे ऑफ इंडिया :
पर्यटकांचे आणि मुंबईमधील लोकांचे विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. इंडो-सरैसेनिक शैलीमध्ये बांधलेले हे देखणे स्मारक १९११मध्ये अपोलो बंदर येथे किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांच्या आगमन प्रसंगाची आठवण म्हणून बांधण्यात आले. याचे बांधकाम बेसाल्ट दगडांच्या साह्याने करण्यात आले आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या कामाची सुरुवात १९१४मध्ये झाली. दिल्ली येथे १९११मध्ये झालेल्या कार्यक्रमात याची फक्त प्रतिकृती किंग जॉर्ज (पाचवे) यांना दाखविण्यात आली होती. ३१ मार्च १९११ रोजी फक्त पायाभरणीचा कार्यक्रम करून कोनशिला बसविण्यात आली. आर्किटेक्ट जॉर्ज विट्टेट  यांनी बनविलेला आराखडा १९१४ साली मंजूर झाला. प्रत्यक्षात गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम १९२४मध्ये पूर्ण करण्यात आले. हे काम गॅमन इंडिया या ब्रिटिश कंपनीमार्फत करण्यात आले. याच गेटमधून ब्रिटिशांची शेवटची पलटण २८ फेब्रुवारी १९४८ रोजी समारंभपूर्वक बाहेर पडली. त्या वेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली होती. 

२८ फेब्रुवारी १९४८ रोजी ब्रिटिशांची शेवटची पलटण येथून बाहेर पडली.

स्मारकाभोवती पाच जेट्टी (धक्के) आहेत. पहिली जेट्टी खास भाभा अणुसंशोधन केंद्रासाठी आहे, तर दुसरी आणि तिसरी व्यावसायिक ‘फेरी ऑपरेशन’साठी वापरली जाते. चौथी बंद आहे आणि पाचवी रॉयल बॉम्बे याट क्लबसाठी आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या जेट्टीवरून पर्यटकांना एलिफंटा लेण्यांकडे नेले जाते. अलिबागजवळील रेवस व मांडवा बंदराकडे जाणाऱ्या फेरीबोटीही येथून सुटतात. 

ताज हॉटेल

ताजमहाल हॉटेल :
गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच उत्तर-पश्चिम बाजूला टाटा यांच्या ताज ग्रुपच्या पंचतारांकित ताजमहाल हॉटेलची भव्य इमारत आहे. ताजमहाल पॅलेस आणि त्याच्या बाजूला हॉटेलचीच टोलेजंग इमारत आहे. दोन वेगवेगळ्या इमारती दिसत असल्या, तरी या दोन्ही इमारती टाटा यांच्या ग्रुपच्या मालकीच्या आहेत व त्या ताजमहाल हॉटेल म्हणून ओळखल्या जातात. असे म्हणतात, १८६५मध्ये मुंबईतील प्रसिद्ध वॉटसन हॉटेलमध्ये तिथल्या दरबानाने जमशेटजी टाटांना आत जाण्यास मनाई केली होती. कारण ते हॉटेल फक्त इंग्रजांसाठीच होते. हा अपमान सहन न झाल्यामुळे टाटांनी भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय तोडीचे हॉटेल बांधण्याचा निश्चय केला होता. त्यातूनच १६ डिसेंबर १९०३ साली ताज हॉटेलची वास्तू बांधली गेली; पण काही जणांना हे मान्य नाही. काहींच्या मते ‘टाइम्स’च्या संपादकांच्या सूचनेवरून मुंबईत चांगले साजेसे हॉटेल व्हावे या हेतूने ते बांधले गेले. सुमारे ६०० रूम्स व ४४ सूट या हॉटेलमध्ये आहेत. 

या इमारतीचा प्लॅन सीताराम खंडेराव वैद्य व डी. एन. मिर्झा या भारतीय आर्किटेक्ट्सनी केला आहे; मात्र याचे बांधकाम ब्ल्यू. ए. चेंबर्स या इंग्रजी इंजिनीअरने पूर्ण केले. भारतामध्ये प्रथमच सरकता जिना या हॉटेलसाठी बसविण्यात आला. हॉटेलमध्ये वापरण्यात आलेले पंखे, जिने, स्नानगृहातील प्लम्बिंग मटेरियल वगैरे प्रथमच बाहेरील विविध देशांमधून मागविण्यात आले होते. ताज पॅलेसचा घुमट आयफेल टॉवरसाठी वापरलेल्या स्टीलपासून बनविण्यात आला असून, हे स्टील त्या वेळी टाटांकडूनच आयात करण्यात आले होते. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस या हॉटेलचा उपयोग ६०० पलंगांचे हॉस्पिटल म्हणून केला होता. ताज टॉवरच्या जागी पूर्वी तेथे ग्रीन हॉटेल होते. ती जागा टाटांनी विकत घेऊन नवीन बहुमजली हॉटेल उभारले. 

ताज टॉवरताज पॅलेस १९०३मध्ये उभा राहिला, तर ताज टॉवर १९७३मध्ये पूर्ण झाला. जॅकलीन केनेडी, बिल क्लिंटन, हिलरी क्लिंटन, नॉर्वेचे महाराज आणि महाराणी, एडिनबर्गचा ड्यूक, वेल्सचा राजपुत्र, रॉजर मूर, जॉन कॉलिस, अँजेलिना जॉली, बराक ओबामा आदी जगप्रसिद्ध व्यक्तींनी ताज पॅलेसचे आदरातिथ्य घेतलेले आहे. अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी याच ताज हॉटेलवर हल्ला केला होता. 

गेटवे ऑफ इंडिया परिसरात शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद, यांचे पुतळे आहेत. ताज हॉटेलच्या समुद्राकडच्या बाजूला पाण्यापासून धोका होऊ नये म्हणून संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. दिवसभर पर्यटक गेटवे परिसरास भेट देत असतात. सेल्फी काढण्यात मग्न असतात. 

कसे जाल मुंबईत?
मुंबई हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र आहे. जगातील बहुतेक देशांतून, तसेच भारतातील मुख्य शहरांतून येथे हवाई मार्गाने जाता येते. मध्य व पश्चिम रेल्वेने मुंबई संपूर्ण भारताशी जोडलेली आहे. जलमार्गानेही येथे पोहोचता येते. भारतातून कोणत्याही ठिकाणाहून रस्तेमार्गाने मुंबईत जाता येते. मुंबईत राहण्यासाठी सर्व श्रेणीतील हॉटेल उपलब्ध आहेत. खाद्यपदार्थ, जेवणही सर्व प्रकारचे मिळते. मुंबईत पर्यटन करायचे असेल, तर अतिपावसाचा कालावधी सोडून भेट द्यावी. 
 
- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(मुंबईतील पुरातन वारसा वास्तूंबद्दल माहिती देणारे, आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेले  लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 18 Days ago
The article throws light on the development of the civil administration of Mumbai , during the hey -day of the Peshawa regium . It would be nice to compare it with the development of Pune , during the same period . period . After all, Pune was the capital .
0
0
BDGramopadhye About 21 Days ago
The article explains why , even in the 17th century , people were were attracted to Mumbai . They compared the rule there to that of the contemporary Indian rulers . It was a matter of every-day life . They were not concerned with ' who is the ruler' situation.
0
0
Sameer About 26 Days ago
मस्त
0
0
राजन लोळगे About 28 Days ago
छान.. पण मुंबई च्या आर्थिक सामाजिक राजकीय शैक्षणिक जडणघडणीत नामदार नाना शंकरशेठ यांचे खूप योगदान आहे. त्यांना भारतातील रेल्वेचे जनक ही म्हणलं जात..त्यांचा उल्लेख या लेखात केला असता तर याची शोभा अजून वाढली असती.... बाकी माहिती छान आहे..धन्यवाद..💐
0
0

Select Language
Share Link
 
Search