Next
चौदहवी का चाँद हो!
BOI
Sunday, March 10, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

एम. सादिकदिग्दर्शक एम. सादिक यांच्या दिग्दर्शनातील चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा एक भाग! १० मार्च हा त्यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या ‘चौदहवी का चाँद’ या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातील गीताचा आस्वाद... 
..............
दिग्दर्शक एम. सादिक यांचा १० मार्च हा जन्मदिवस! एम. सादिक हे नाव तसे फार सुप्रसिद्ध, अनेकांना पटकन आठवावे असे नाही; पण त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट, त्या चित्रपटांची नावे, त्यातील गीते मात्र अनेकांच्या स्मरणात आहेत. अशा कलावंतांचे हेच वैशिष्ट्य असते, की त्यांच्या कलाकृती स्मरणात राहतात; पण पटकन त्यांचे नाव घेतले, की स्मृतीला ताण द्यावा लागतो. १० मार्च १९१० रोजी जन्मलेले सादिक तीन ऑक्टोबर १९७१ रोजी अल्लाला प्यारे झाले. 

आज ४७-४८वर्षांनंतर त्यांचे नाव उच्चारताच ‘कोण बरे’ हा प्रश्न उभा राहतो; पण चित्रपट जाणकार नक्की म्हणतील, की ‘तेच सादिक ना, ज्यांच्यावर गुरुदत्तने ‘चौदहवी का चाँद’ची जबाबदारी सोपवली होती?’ सादिक यांच्या जीवनप्रवासाकडे एक दृष्टिक्षेप टाकला, तर काय दिसते? 

सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक मेहबूब यांच्याबरोबरच एम. सादिक चित्रपटसृष्टीत दाखल झाले होते. १९३५पासून त्यांनी अनेक बड्या दिग्दर्शकांकडे सहायक म्हणून काम केले; पण स्वतंत्ररीत्या दिग्दर्शन करण्याची संधी त्यांना कारदार प्रॅाडक्शनचे ए. ए. कारदार यांनी प्रथम दिली. तो चित्रपट होता ‘बहार!’ त्यामध्ये मेहताब वास्ती निर्मला हे कलावंत होते; पण तो चित्रपट चालला नाही. नंतर ‘जीवन’ नावाचा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. तोही अपयशी ठरला!

त्यानंतर ‘रतन’ हा म्युझिकल हिट चित्रपट मात्र एम. सादिक हे नाव लोकप्रिय करणारा ठरला. अर्थात ‘रतन’च्या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता, तरी त्यातील स्वर्णलता, करण दिवाण, वास्ती, मंजू या कलावंतांची कामे सादिक यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली चांगली झाली होती. 

‘रतन’नंतर सादिक यांच्या दिग्दर्शनातील साथी, जगबीती, श्याम सवेरा, कागज असे काही चित्रपट आले; पण ते ‘रतन’एवढे यश ते मिळवू शकले नाहीत. नंतर मधुबाला नायिका असलेले सजना आणि सैय्या हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. ते जरा बऱ्यापैकी चालले. १९५०च्या सुमारास त्यांनी सादिक प्रॅाडक्शन नावाची स्वतःची चित्रपटसंस्था काढून ‘पूनम’ हा चित्रपट निर्माण केला. त्या काळातील लोकप्रिय नायिका कामिनी कौशल ही पूनमची नायिका होती. शंकर-जयकिशन यांनी या चित्रपटास संगीत दिले होते. तरीसुद्धा या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही; मात्र नंतर त्यांनी निर्माण केलेला ‘शबाब’ मात्र बऱ्यापैकी चालला. त्यातील संगीतकार नौशाद यांनी संगीत दिलेली गाणी लोकप्रिय झाली होती. 

‘शबाब’नंतर एम. सादिक यांचे मुसाफिरखाना, अंजाना, छू-मंतर, मायबाप असे चित्रपट आले; पण ते यथातथाच ठरले. या वाटचालीत एम. सादिक यांनी एक वेगळा प्रयोग केला. जॉनी वॉकर हा अभिनेता विनोदी नट म्हणूनच पुढे आला होता; पण सादिक यांनी त्याला चक्क नायक बनवले आणि श्यामाला त्याची नायिका करून छू-मंतर, खोटा पैसा हे चित्रपट निर्माण केले आणि दिग्दर्शितही केले. स्वतःच्या बॅनरचे चित्रपट निर्माण करत असताना सादिक यांनी अन्य चित्रपट निर्मात्यांचे चित्रपट दिग्दर्शित करण्याचे कामही केले. त्यामध्ये जसा १९५९चा ‘जवानी की हवा’ (प्रदीपकुमार, वैजयंतीमाला) हा चित्रपट होता, तसाच १९६०चा गुरुदत्त यांचा ‘चौदहवी का चाँद’ हाही चित्रपट होता. या चित्रपटाने सादिक यांना चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. हा चित्रपट म्हणजे सादिक यांच्या दिग्दर्शनातील कौशल्याचा वेगळा आविष्कार होता. 

चित्रपट निर्माता मेहबूब खान यांनी ‘ताजमहल’ चित्रपट बनविण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु ते पूर्ण झाले नाही. नंतर ‘पुष्पा पिक्चर्स’ यांनी ‘ताजमहल’ चित्रपट बनविण्याचे ठरवले आणि त्याच्या दिग्दर्शनाचे काम एम. सादिक यांच्यावर सोपवले. ऐतिहासिक काळातील कथानकावर आधारलेला हा चित्रपट पूर्ण करण्यास सादिक यांना दोन वर्षे लागली. संगीतकार रोशन यांनी संगीत दिलेली दहा गीते, बीना रॉयचे सौंदर्य व सादिक यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट लोकप्रिय ठरला. १९६३च्या या चित्रपटानंतर १९६७मध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमीचा ‘नूरजहाँ’ आणि सामाजिक आशयाचा ‘बहूबेगम’ असे सादिक यांच्या दिग्दर्शनातील दोन चित्रपट आले. दोन्हींमध्ये मीनाकुमारी नायिका होती. ‘बहूबेगम’करिता पुन्हा एकदा संगीतकार रोशनच होते व ओघानेच ती दहा गीते श्रवणीय होती. अशी कारकीर्द बहरली असतानाच तीन ऑक्टोबर १९७१ रोजी सादिक यांचे निधन झाले. 

या विस्मृतीत गेलेल्या दिग्दर्शकाची याद ताजी करण्यासाठी आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा त्यांच्या कारकीर्दीचा धावता आढावा घेतल्यानंतर त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या व लोकप्रिय ठरलेल्या ‘चौदहवी का चाँद’ चित्रपटातील सोन्यासारखे अनमोल गाणे आपण पाहू या!

हिंदी चित्रपटांमध्ये सौंदर्यवर्णनपर आणि विशेषतः प्रेयसी, पत्नी यांच्या सौंदर्याचे वर्णन करणाऱ्या गीतांची कमतरता नाही. नायक कधी ‘ये चाँदसा रोशन चेहरा..’  असे गाऊन आपल्या प्रेयसीचे वर्णन करतो, तर कधी ‘कुछ शेर सुनाता हूँ मै..’सारख्या गीतात ‘ती’च्या सौंदर्याचे वर्णन करताना उपमा अलंकाराची उधळण केली जाते. ‘आपका चेहरा माशाअल्ला...’सारख्या शब्दांतही ‘तिचे’ वर्णन केले जाते, तर कधी सरळ, साध्या शब्दांत ‘क्या खूब लगती हो..’ असे ‘तिला’ सांगितले जाते. अशी अनेक गीते शैलेंद्र, हसरत, साहिर, इंदिवर, गुलजार, आनंद बक्षी इत्यादींनी लिहिली आहेत.  

या प्रियकर-प्रेयसीच्या प्रीतिकथेत शकील बदायुनी यांचे काव्य तर विविध रंगांची, विविध भावनांची उधळण करते. एकेक शब्द, एकेक उपमा लाजवाब असतात. असेच शकील यांनी ‘चौदहवी का चाँद’करिता लिहिलेले लाजवाब गीत मोहम्मद रफी यांच्या गोड आवाजात आणि सं. रवी यांच्या संगीतात श्रवणाचा अद्भुत आनंद तर देतेच; पण पडद्यावर पाहतानाही शकीलच्या उपमा अलंकारानुसार सौंदर्य लाभलेली वहिदा रेहमान पाहून ती मनाच्या हिंदोळ्यांवर झुलत राहते. गुरुदत्त यांचा अभिनयही प्रभावी ठरला आहे. ‘तिच्या’ सौंदर्याने पागल झालेला प्रियकर तिला म्हणतो, 

जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो

(हे प्रिये तू) चतुर्दशीचा चंद्रमा आहेस (की उदयाचली दिसणाऱ्या मोहक) सूर्यासारखी (दिसत) आहेस, (हे मला नेमके सांगता येत नाही; पण एवढे निश्चितच खरे, की) तू जी कोणी आहेस ती देवाशपथ सांगतो, की अप्रतिम लावण्यवती आहेस. तुझे सौंदर्य लाजवाब आहे. 

आपल्या या सुंदर प्रेयसीचे सौंदर्य वर्णन करताना ‘तो’ प्रियकर पुढे म्हणतो -

जुल्फे है जैसे कंधोंपर बादल झुके हुए 
आँखेट है जैसे मय के प्याले भरे हुए
मस्ती है जिस में प्यार की तुम वो शराब हो

(हे प्रिये तुझे) हे काळे केस म्हणजे (तुझ्या मुखचंद्राच्या बाजूला) खांद्यावर झुकलेले मेघच होत! (तुझे सुंदर चमकदार) नेत्र म्हणजे जणू काही मदिरेने भरलेले प्यालेच आहेत. ज्यात प्रेमाची मस्ती (कणाकणाने भरलेली आहे) असे तुझे सौंदर्य म्हणजे (एक प्रकारची नशा आणणारे) मद्यच आहे. 

उपमा अलंकाराने अशा प्रकारे हे काव्य नटवत शायर पुढे ‘तिला’ म्हणतो -

चेहरा है जैसे झील में हँसता हुआ कमल
या जिंदगी के साजपे छेडी हुई गज़ल 
जानेबहार! तुम किसी शायर का ख्वाब हो

(हे प्रिये तुझा) चेहरा म्हणजे जणू काही सरोवरात उमललेले हसरे/ मोहक कमळ आहे. अथवा जीवनाच्या वाद्यांवर छेडलेली (भावपूर्ण) गज़ल आहे. जानेबहार प्रिये, तू कोणा महाकवीचे विलोभनीय स्वप्नच आहेस. 

असे आपल्या प्रेयसीचे वर्णन करताना हा प्रियकर या गीताच्या अखेरच्या कडव्यात म्हणतो -

होठों पें खेलती है तबस्सुम की बिजलियाँ 
सज्दे तुम्हारी राह में करती है कहकशाँ
दुनिया-ए-हुस्न इश्क का तुम ही शबाब हो

(हे प्रिये) मधुर हास्याच्या विद्युलल्ता तुझ्या अधरांवर/ओठांवर खेळतात. तुझ्या मार्गावर आकाशगंगा नतमस्तक होते. सौंदर्य व प्रणयाच्या दुनियेतील अप्रतिम लावण्य म्हणजे तूच आहेस! 

असे हे सौंदर्यवर्णन करणारे गीत लिहिताना शकील बदयुनींनी ‘तबस्सुम’ (मधुर हास्य), सज्दे (नतमस्तक होणे), कहकशाँ (आकाशगंगा), आफताब (सूर्य), मय के प्याले (मद्याचे चषक) असे भारदस्त उर्दू शब्द वापरून या काव्याचे सौंदर्य एकदम खानदानी बनवले आहे. ते संगीतात बांधताना संगीतकार रवींनी जी आकर्षक व हळुवार चाल बांधली आहे, तिचे सौंदर्य गीताच्या सुरुवातीच्या ‘हुं हुंऽऽहुं’ अशा गुणगुणण्यामुळे आणखीच प्रभावी बनते. मोहम्मद रफींचा स्वर त्याला साजेसा न्याय देतो. आणि पडद्यावरची वहीदा व गुरुदत्त म्हणजे तर अप्रतिम दर्शनीय!

अशी गीते असणारे एम. सादिक यांच्या दिग्दर्शनातील चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा एक भाग! अशा या उत्कृष्ट दिग्दर्शकाला त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search