Next
‘चित्रपट यशस्वी होण्यामागे असते टीमवर्क’ : महेश कोठारे
‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’चे उद्घाटन; दिग्दर्शक महेश कोठारेंचा विशेष सन्मान
BOI
Tuesday, January 29, 2019 | 12:34 PM
15 0 0
Share this article:


पुणे : अभिनेते, निर्माते-दिग्दर्शक आणि एक हरहुन्नरी कलाकार महेश कोठारे यांचा अनोखा जीवनप्रवास येथील कोथरूड सांस्कृतिक महोत्सवात उलगडला. सोमवारपासून (२८ जानेवारी) सुरू झालेल्या या चार दिवसांच्या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. ८०च्या दशकापासून मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कोठारे यांनी, ‘याला जीवन ऐसे नाव’ या कार्यक्रमातून रसिकांची मने जिंकली.

‘संस्कृती प्रतिष्ठान’चे अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयडियल कॉलनी येथील मैदानावर कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ ते ३१ जानेवारीदरम्यान असलेल्या या चार दिवसांच्या महोत्सवाचे उदघाटन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल महेश कोठारे यांचा, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या वेळी संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, नीलिमा कोठारे, नगरसेवक हेमंत रासने, मंजुश्री खर्डेकर, वासंती जाधव, किरण दगडे-पाटील, अभिनेते रमेश परदेशी, अक्षय टाकसाळे, अभिनेत्री रेशम टिपणीस, ‘बढेकर ग्रुप’चे प्रवीण बढेकर, ‘रावेतकर हाउसिंग’चे अमोल रावेतकर, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’चे हर्षद झोडगे, ‘लाकडी घाणा’चे भावना व आनंद पटेल, नंदकुमार वढावकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

‘धडाकेबाज’ ते ‘झपाटलेला’ आणि ‘गुपचूप गुपचूप’ ते ‘थरथराट’ अशा तत्कालीन कैक चित्रपटांमधील जबरदस्त अभिनयाने महेश कोठारे यांनी मराठी सृष्टीत आपले एक अस्तित्व निर्माण केले. हे करत असताना पुढील काळात त्याबरोबरीने समोर आलेली त्यांची निर्मितीची अन दिग्दर्शनाची बाजू त्यांच्यातील वेगळेपण दाखवून गेली. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि महेश कोठारे या त्रयींची मैत्री सर्वांनाच भावलेली. या सर्व भूमिकांमधून उलगडत गेलेला महेश कोठारे यांचा जीवनप्रवास पुणेकर रसिकांना स्पर्शून गेला.

ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर, पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, रेशम टिपणीस, पुष्कर जोग, सई लोकूर, सावनी रवींद्र व प्रसेनजीत कोसंबी आदी कलाकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम रंगला. दिग्दर्शक महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतील गाणी, नृत्य, संगीत या माध्यमातून त्यांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला. तसेच पुष्कर श्रोत्रीने घेतलेल्या कोठारे यांच्या मुलाखतीतून त्यांच्या जीवनप्रवासातील विविध पैलू प्रेक्षकांसमोर आले. त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक कलाकारांनी आपले अनुभव कथन केले. 

‘चित्रपट यशस्वी होणे हे फक्त दिग्दर्शकाच्या हाती नसून यात प्रत्येकाचेच योगदान तेवढेच महत्त्वाचे असते. माझ्या या प्रवासात अनेकांनी साथ दिली, म्हणूनच मी या क्षेत्रात यशस्वीपणे काम करू शकलो’, अशा भावना या वेळी महेश कोठारे यांनी व्यक्त केल्या.

‘सलग नऊ वर्षे असा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करणे हे अवघड काम असून येथे अनेक कलाकार आपली कला सादर करतात हे वाखणण्याजोगे आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे ही सर्वांत मोठी गोष्ट असते’, असे मत ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी यांनी व्यक्त केले. 

महेश कोठारे यांच्यासोबत केलेल्या चित्रपटांच्या आठवणी सांगताना दिलीप प्रभावळकर म्हणाले, ‘मी महेश कोठारे यांच्यासोबत तीन चित्रपट केले; पण माझ्यातील खलनायक ओळखून त्यांनी मला ‘तात्या विंचू’ची भूमिका दिली. त्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात माझी एक नवी ओळख निर्माण झाली. मराठी प्रेक्षकांची नस ओळखून त्यांनी चित्रपटांची निर्मिती केली, म्हणूनच त्यांच्यातील एक यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक आजच्या प्रवासात टिकून आहे.’ 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर मोहोळ यांनी, तर सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री यांनी केले. दरम्यान, मंगळवारी (२९ जानेवारी) दुसऱ्या दिवशी या महोत्सवात हास्यमैफल रंगणार आहे . मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाची संपूर्ण टीम महोत्सवात सहभागी होणार आहे. यातील कलाकार डॉ. नीलेश साबळे, भारत गणेशपुरे, भालचंद्र कदम उर्फ भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, विनीत भोंडे अशा सगळ्या विनोदी कलाकारांची धमाल प्रत्यक्ष पाहता व अनुभवता येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता आयडियल कॉलनी मैदानावर हा कार्यक्रम रंगणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search