Next
सेवावर्धिनी संस्थेला जनसेवा पुरस्कार प्रदान
प्रेस रिलीज
Friday, October 26, 2018 | 12:41 PM
15 0 0
Share this story

जनसेवा पुरस्कार वितरणाप्रसंगी डावीकडून विनायक जोशी, सीए प्रदीप जगताप, अध्यक्ष प्रमोद चौधरी, डॉ. राजेंद्र हिरेमठ, सेवावर्धिनीचे प्रमोद कुलकर्णी आणि कार्यवाह सोमदत्त पटवर्धन

पुणे : जिल्ह्यातील नामांकित जनसेवा सहकारी बँकेच्या ४६वा वर्धापन दिन वानवडी येथील महात्मा ज्योतीराव फुले सभागृहात नुकताच साजरा करण्यात आला. या वेळी सेवावर्धिनी संस्थेला प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्या हस्ते जनसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘सेवावर्धिनी’तर्फे संस्थेचे कार्यवाह सोमदत्त पटवर्धन व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

बँकिंगसारख्या आर्थिक क्षेत्रात कार्यरत असताना समाजोपयोगी कार्य करणार्‍या व्यक्ती अथवा संस्थांना बँकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गेल्या १९ वर्षांपासून दर वर्षी जनसेवा पुरस्कार प्रदान केला जात आहे.

या वेळी चौधरी यांनी आधुनिकतेकडून सहजता ही संकल्पना बँकेने आपल्या कृतीतून दाखवून दिली असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, ‘एका बाजूला नवनवीन तंत्रज्ञानाचा स्विकार करीत असताना, दुसर्‍या बाजूला समाजाची नेमकी गरज ओळखून त्याच्या प्रगतीसाठी झटणार्‍या संस्था आणि व्यक्तींना प्रोत्साहन देण्याची भूमिका पार पाडली जात आहे. एका अर्थाने शाश्‍वत कार्य आणि विकास याचा उत्तम समन्वय साधला जात आहे. पूर्वी श्रमदानातून कामे केली जात. अशाप्रकारच्या कामांना बँकेने चालना दिली, तर समाजास उपयोग होईल व पडद्यामागे राहून काम करणार्‍या लोकांना, संस्थांना उपयोग होईल.’

सत्काराला उत्तर देताना कुलकर्णी म्हणाले, ‘समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन सेवावर्धिनी संस्था गेली काही वर्षे काम करीत आहे. केवळ विकास काम नाही, तर त्याबरोबर शिक्षणाची भूमिका पार पाडली जाते आहे. त्यामुळे या पुरस्कारांमध्ये आमच्या संस्थेबरोबर अन्य संस्थांचा सहभाग आहे. मुळात सेवावर्धिनी संस्थेची संकल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या मार्गदर्शनातून निर्माण झाली आहे आणि आज त्याला व्यापक स्वरूप मिळाले आहे. त्यामुळे आजचा हा पुरस्कार म्हणजे पाठीवरची आश्वासक थाप आहे.’
 
वर्धापन दिन कार्यक्रमास अनुसरून बँकेचे अध्यक्ष सीए प्रदीप जगताप यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बँकेच्या सामाजिक कार्याची माहिती विषद करून पुरस्कारामागची भूमिका व विविध उपक्रमांची माहिती सांगितली. बँकेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना बँकेच्या प्रगतीची व कार्याची माहिती दिली. वैयक्तिक गीत व पसायदान सुहास शामगावकर यांनी म्हटले. जनसेवा पुरस्कारातील मानपत्राचे वाचन मंदार परळीकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्नेहल दामले यांनी केले. या प्रसंगी बँकेचे विद्यमान, माजी संचालक, सभासद, ग्राहक, हितचिंतक, सेवकवर्ग उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link