Next
डॉ. दाभोळकरांनी उलगडले विवेकानंदांचे अपरिचित पैलू
प्रेस रिलीज
Tuesday, October 09, 2018 | 05:24 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘भगवी वस्त्र परिधान केल्याने पुरोगाम्यांनी समजून घेतले नाही, आणि भगव्या वस्त्रांमुळे विवेकानंदांना आपले मानणाऱ्यांनीही विवेकानंद पूर्ण समजून घेतले नाही, हे दुर्देव आहे,’ असे प्रतिपादन लेखक आणि विवेकानंद यांचे अभ्यासक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहानिमित्त ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ या व्याख्यान आणि संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. युवक क्रांती दलाचे सचिव संदीप बर्वे यांनी डॉ. दाभोळकर यांच्याशी संवाद साधला. या वेळी अन्वर राजन, सभागृहात डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी उपस्थित होते.

‘धर्मातील फक्त मूलभूत सिद्धांत महत्त्वाचे असतात, कोणी काय खावे, काय परिधान करावे, हे वैयक्तिक असते, समाजाशी त्याचा संबंध नसतो असे सांगणाऱ्या आणि मी समाजवादी आहे, असे सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांची खरी ओळख समजून घेतली पाहिजे,’ असेही डॉ. दाभोळकर यांनी सांगितले.

डॉ. दाभोळकर यांनी स्वामी विवेकानंद यांची अनेक अपरिचित पैलूंची ओळख करून दिली. गोहत्या, जरठ विवाह, पुरोहित शाही, स्त्री-पुरुष समानता, याबाबत विवेकानंद यांची मते परखड होती, असे डॉ. दाभोळकर यांनी विवेकानंद यांची भाषणांचे, पत्रांचे संदर्भ देत सांगितले.

ते म्हणाले, ‘जरठविवाह मानणाऱ्या समाजाला कसला आलाय धर्म, असा प्रश्न विवेकानंद यांनी संमती वयाच्या कायद्याबद्दल लिहिताना केला होता. स्त्री प्रश्नावर त्यांची मांडणी भेदक आहे. अमेरिकेत स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतात म्हणून तेथील समाज प्रगत आहे. मंदिराची खरी गरज वेश्येला आहे, ती शोषण झालेली सर्वात पददलित व्यक्ती असते, असे त्यांनी लिहिले आहे. मंदिरात सभ्य मंडळींचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे म्हणत. जातीव्यवस्था जन्मगत आहे आणि निग्रोपेक्षा अधिक अत्याचार दलितांवर केलेत. जाती मेल्या नाहीत, तर त्या कुजून समाजाला त्रास होईल, असे कुंभ कोणम येथील भाषणात म्हणाले होते.’

‘निसर्गात समता नसेल, तर ती निर्माण करण्यासाठी माणसाला निर्माण केले आहे, असेही विवेकानंद यांनी लिहिले होते. या देशाची अर्थव्यवस्था मोडल्याशिवाय जाती व्यवस्था मोडणार नाही, असे मानणारे विवेकानंद हे दार्शनिक आहेत. जिथे जास्त पुरोहितशाही आहे, तिथे मोठ्या संख्येने हिंदू, ख्रिस्ती झाले, तर दोष कोणाला देणार, असा सवालही त्यांनी त्रावणकोर संस्थान संदर्भात त्या काळच्या धर्मांतराबद्दल मत मांडले होते. इस्लामी राजवटीचेही काही सामाजिक योगदान आहे, असे ते मानत असत. आपण समाजवादी आहोत, असे विवेकानंद मेरी यांना पत्रात लिहितात. दलितांना धर्मगत, ज्ञानगत, अर्थ गत जाती व्यवस्थेतून बाहेर काढले पाहिजे, असेही विवेकानंद यांनी म्हटले होते,’ असे डॉ. दाभोळकर यांनी नमूद केले.

‘आपल्याला नवा भारत घडविण्यासाठी नवा देव, नवा वेद घडविला पाहिजे, हेही विवेकानंदांनी स्पष्टपणे मांडले होते; मात्र, सर्व समाजवादी सिद्धांताना अध्यात्माची जोड दिली पाहिजे, असेही विवेकानंद मानत. प्रत्येक खेड्यात दोन संन्याशी असणारी संघटना घडवायची आहे, असा विवेकानंद यांचा विज्ञानवादी ध्येयवाद होता. एकच माणूस एकाच जन्मात दार्शनिक, संघटक, कार्यकर्ता, खजिनदार होऊ शकत नाही, हीच माझी चूक झाली, मी फक्त दार्शनिक म्हणून मांडणी करायला हवी होती; मात्र माझी हाडेही चमत्कार करतील, असे म्हणणारा विवेकानंद यांचा दुर्दम्य आशावाद होता,’ असे डॉ. दाभोळकर म्हणाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 181 Days ago
His biography of Vivekanand is a must. A d
0
0
Bal Gramopadhye About 181 Days ago
Some of his thoughts are the same as those of Savarakar . G
0
0
Bal Gramopadhye About 202 Days ago
Many of his thoughts would not be acceptable to the current leadership .
0
1

Select Language
Share Link
 
Search