Next
विज्ञानाचा ‘पुजारी’
BOI
Thursday, February 15, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

विज्ञान केंद्रात मुलांसह संजय पुजारी

विज्ञान केवळ पुस्तकात न ठेवता आपल्या आयुष्याचा भाग बनवणारे लोक दुर्मीळ असतात. या दुर्मीळ लोकांपैकी एक म्हणजे संजय पुजारी. आपल्या विज्ञानवेडातून त्यांनी कराडला डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र सुरू केलं असून, शाळांतली मुलं तिथे स्वतः प्रयोग करून विज्ञान शिकतात आणि त्यांना विज्ञानाची गोडी लागते. विज्ञानाचा ‘पुजारी’ असलेल्या या तरुणाची नि त्याने उभारलेल्या विज्ञान केंद्राच्या वाटचालीची प्रेरणादायी गोष्ट वाचू या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात...
................
डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र, कराडमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री अशी महत्त्वाची पदं भूषविलेले यशवंतराव चव्हाण यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं शहर म्हणजे कराड! या कराडमधला यशवंतराव चव्हाणांचा ‘विरंगुळा’ बंगला आज त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत उभा आहे. अशा कराड शहरात ‘विरंगुळा’ला भेट देण्यासाठी येणाऱ्यांची पावलं आता आपसूकच कल्पना चावला विज्ञान केंद्राकडेही वळतात. या केंद्रात केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विज्ञानवेडे संशोधक येतात आणि इथल्या वातावरणाचा एक भाग होऊन जातात. 

संजय पुजारीया कल्पना चावला विज्ञान केंद्राची उभारणी संजय पुजारी या तरुणाने केली आहे! जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी ज्याला केवळ विज्ञान आणि विज्ञानच दिसतं, असा तरुण म्हणजे संजय पुजारी! संजयला लहानपणापासूनच विज्ञानाचं वेड लागलं आणि ते वाढतच गेलं. हे विज्ञानवेड त्याच्या जगण्याचा हिस्सा बनलं. कसं? त्याचीच ही गोष्ट!

लेखक अच्युत गोडबोले आणि लेखिका दीपा देशमुख विज्ञान केंद्रातील मुलांसोबत...

साधारणतः वर्षभरापूर्वी ‘जीनिअस’ पुस्तक वाचून संजय पुजारीचा मला फोन आला. आम्ही वैज्ञानिकांवर लिहिलेलं ‘जीनिअस’ हे पुस्तक त्याला खूप आवडलं होतं आणि त्याने अच्युत गोडबोलेंसह मला त्याच्या कल्पना चावला विज्ञान केंद्राला भेट देण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्या भागात आमचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही जाणारच होतो. त्यामुळे आम्ही त्याच्या कल्पना चावला विज्ञान केंद्राला भेट दिली. आत पाऊल टाकताच आपण एखाद्या टुमदार प्रयोगशाळेत असल्याचा भास आम्हाला झाला. संपूर्ण प्रयोगशाळा वैविध्यपूर्ण साधनांनी, पुस्तकांनी आणि मुला-मुलींनी गजबजून गेली होती. आम्ही जाण्यापूर्वी संजयनं या मुलांना ‘जीनियस’चं वाचन करून यायला सांगितलं होतं. ‘जीनिअस’चे १००हून अधिक संच संजयने मुलांना मोफत वाटले होते. 

आम्ही ‘जीनिअस’वर बोलत होतो. गॅलिलिओपासून ते स्टीफन हॉकिंगपर्यंतच्या वैज्ञानिकांचं आयुष्य आणि काम उलगडत होतो. त्या वेळी मुलांनीही त्यात सहभाग घेतला होता. एका चिमुकल्या मुलाने तर आपल्याला रिचर्ड फाइनमन आवडला असल्याचं सांगून आपण ‘जीनियस’चं हे पुस्तक आपल्या आई-वडिलांना भेट देणार असल्याचं सांगितलं. याचं कारण रिचर्ड फाइनमनचे आई-वडील त्याच्याशी जसं वागले, त्याला जसं घडवलं आणि त्याला जसं समजून घेतलं, तशीच या मुलाची आपल्या आई-वडिलांकडून अपेक्षा होती. 

आम्ही मुलांबरोबर आणि संजयबरोबर झालेल्या संवादानं समाधान बरोबर घेऊन पुण्यात परतलो; मात्र संजयचा चेहरा आणि कल्पना चावला विज्ञान केंद्राची वास्तू मनात रेंगाळतच राहिली. कल्पना चावला विज्ञान केंद्राच्या भिंतीवर दिमाखात लटकणारे आइन्स्टाइन, जेन्नर, फ्लेमिंग, भाभा, एडिसन, हॉकिंग, न्यूटन, राइट बंधू या सगळ्यांचे भव्य, बोलके फोटो विसरताच आले नाहीत. आपल्या जगण्यात, बोलण्यात, वागण्यात विज्ञान भरलेल्या या तरुणाचं खूप कौतुक वाटलं. 

कल्पना चावला विज्ञान केंद्रात जाणं म्हणजे एका धमाल सहलीचा अनुभव घेणं! पहिलीपासून बारावीपर्यंत, पालकांपासून शिक्षकांपर्यंत अगदी कोणीही इथं येऊ शकतं. इथं शाळेत शिकवले न जाणारे, पाठ्यपुस्तकात नसलेले विज्ञानाचे मूलभूत प्रयोग करून बघता येतात. तारांगणाचा अनुभव प्रत्यक्ष डोळ्यांनी घेता येतो. इतकंच नाही, तर जादूचे प्रयोग पाहता येतात आणि प्रमोद नावाचा जादूगारही इथं भेटतो. बोलका बाहुला गोड आवाजात आपल्याशी संवाद साधतो. इथं गाता येतं, नाचता येतं आणि गिटार, बोंगोसारखी वाद्यंही वाजवता येतात. 

‘प्रयोग केवळ बघायचे नसतात, तर करायचे असतात,’ असं भिंतीवरून गॅलिलिओ सांगत असतो आणि मग इथलं साहित्य आपल्याला खुणावतं. आपण कधी एखादं रॉकेट बनवलं, विमान बनवलं हे आपल्यालाही कळत नाही. हे बनवलेलं रॉकेट, विमान, पूल असं सगळं काही घरी घेऊन जाता येतं. कोणीही वटारल्या डोळ्यांनी आपल्याकडे बघत नाही, हे विशेष! चंद्रावर वस्ती झाली तर ती कशी असेल, थ्री डायमेंशन्स म्हणजे काय, फोर्थ डायमेंशन म्हणजे काय, सापेक्षतावाद म्हणजे काय, गतीचे नियम कसे सिद्ध केले गेले असतील, उपग्रह म्हणजे काय आणि अंतराळवीर कसे काम करतात, आकाशातले ग्रह, तारे कसे दिसतात अशा अनेक गोष्टींचं कुतूहल इथंच शमवलं जातं. 

हे सगळं घडवून आणणाऱ्या संजयचं लहानपण कोल्हापूरजवळच्या गडहिंग्लज या ठिकाणी गेलं. संजयचे वडील मुख्याध्यापक होते, तर आई शाळेत शिक्षिका होती. त्यामुळे घरातलं वातावरण शिक्षणाला अनुकूल. वडिलांमुळे संजयला लहानपणीच वाचनाची गोडी लागली. इतकी, की आपलं वैयक्तिक वाचनालय असावं असा ध्यास त्यानं त्या बालवयातच घेतला आणि प्रत्यक्षात आकाराला आणला. गावात सानेगुरुजी संस्कार शिबिरं व्हायची. या शिबिरांसाठी ग. प्र. प्रधान, यदुनाथ थत्ते यांच्यासारखी दिग्गज मंडळी यायची. यदुनाथ थत्ते मुलांशी कसे बोलतात, कशा गप्पा मारतात हे संजय जवळून बघायचा. आपल्यालाही असं वागता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, असं त्याला मनातून वाटायचं.

गौरवसंजयचं शालेय शिक्षण गडहिंग्लज हायस्कूल आणि महाराष्ट्र हायस्कूल-अत्याळ अशा दोन शाळांमध्ये झालं. त्या वेळी विज्ञान प्रदर्शनं वगैरे होत नसत; मात्र तांगडे या शिक्षकांमुळे विज्ञान आणि गणित या विषयाची गोडी त्याला लागली. संजयला शाळेत जायला लागल्यापासूनच विज्ञान या विषयानं इतकं वेड लावलं होतं, की तो स्वतःच वेगवेगळे प्रकल्प हातात घेऊन मिळतील त्या वस्तूंच्या साह्यानं ते पूर्ण करू लागला. रॉकेट बनवणं, पृथ्वी कशी फिरते ते दाखवणं, गणपतीचे देखावे तयार करणं असे संजयचे नानाविध उद्योग चालायचे. एकदा तर संजयनं टीव्ही कसा असू शकतो याचं मॉडेलही तयार केलं होतं आणि त्या मॉडेलमधून राम, सीता, रावण दिसतील अशी व्यवस्था केली होती. संजयनं केलेले गणपतीचे देखावे असोत, वा त्याचं टीव्हीचं मॉडेल, ते बघायला गावातलेच नाही, तर जवळपासच्या इतर गावांतले लोकही येऊन त्याचं कौतुक करत असत. संजयच्या या उद्योगात त्याचे अनेक मित्र सहभागी व्हायचे. जी. जे. पाटील या शिक्षकांमुळे संजयला नाटक, गाणी, कथाकथन, वक्तृत्व अशा गोष्टींची आवड लागली. राज्य नाट्यस्पर्धेत भाग घे, ‘नटसम्राट’सारखी नाटकं कर, एकपात्री प्रयोग कर, गाणी गा अशा अनेक उपक्रमांत संजय सहभागी होऊ लागला आणि यशही मिळवू लागला. 

डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते सत्कारआपली कल्पकता आणि वाचनवेड जपत संजयचा प्रवास सुरू झाला. बारावीत असताना डॉक्टर व्हायचं की इंजिनीअर हा प्रश्न सगळ्यांप्रमाणेच त्याच्याही समोर येऊन उभा ठाकला. संजयच्या एका मित्रानं संजयचा कल ओळखला होता. तो त्याला म्हणाला, ‘अरे, इंजिनीअर, डॉक्टर तर कोणीही होऊ शकतं; मात्र देशाला घडवणारा, मुलांना घडवणारा चांगला शिक्षक होणं हे खूप कठीण काम आहे आणि तो शिक्षक तुझ्यात दडलेला आहे. त्याच्यावर अन्याय करू नकोस. त्याला समोर आण.’ संजयला आपल्या मित्राचं म्हणणं पटलं आणि त्यानं इंजिनीअर किंवा डॉक्टर न होता शिक्षक होऊन विज्ञानावर काम करायचं ठामपणे ठरवलं. याच काळात संजयनं मुंबईला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी या संस्थेत जाऊन फोटोग्राफीचा कोर्स पूर्ण केला. गौतम राजाध्यक्षांसारखे दिग्गज तज्ज्ञ त्याला शिकवायला होते. कालांतरानं संजयनं फिजिक्स विषयात एमएस्सी पूर्ण केलं. तसंच त्यानं एमएडदेखील पूर्ण केलं. १९९९ साली संजयनं कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करायला सुरुवात केली. संजयचं विज्ञानवेड कमी झालेलं नव्हतंच. यातूनच त्यानं एक प्रकल्प पूर्ण केला. नारळाच्या झाडावर कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठीचं एक यंत्र त्यानं तयार केलं होतं. या प्रकल्पासह त्याला दिल्लीत जाता आलं. त्या वेळी संजयनं ‘अग्निपंख’ वाचलं होतं. अब्दुल कलाम यांना प्रत्यक्ष समोर बघून त्याच्या डोळ्यांचं पारणं फिटलं होतं. ते समोर आले, तेव्हा संजय नकळत त्यांच्यासमोर झुकला. त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला. ‘तू कुठून आलास, काय करतोस’ असे प्रश्न  संजयला विचारले. संजयनं आपण यशवंतराव चव्हाण यांच्या गावाहून आलो असून, आपण शिक्षक म्हणून काम करत असल्याचं सांगितलं. अब्दुल कलाम यांनी संजयला त्यांच्या डायरीत ती गोष्ट लिहून द्यायला सांगितली. संजयनं लिहिलं, ‘मी शिक्षक म्हणून देशासाठी मूलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञान यात काम करणार आहे.’

२००३ साली टीव्हीवरच्या बातम्या बघत असताना संजयनं कल्पना चावला हिच्या अपघाताची बातमी बघितली. तोपर्यंत तिच्याबद्दल त्याला फारशी माहिती नव्हती. तिचं अंतराळ संशोधनातलं काम त्याला नीटसं ठाऊक नव्हतं. संजयनं कल्पना चावलाविषयी जाणून घ्यायला सुरुवात केली. भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर डॉ. कल्पना चावला कोलंबिया यानातून पृथ्वीवर परत घेऊन येत असताना अपघात होऊन एक फेब्रुवारी २००३ रोजी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. कल्पनाचा जन्म भारतातल्या हरियाणा राज्यातल्या कर्नालचा. १९८४ साली तिनं अमेरिकेतल्या टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स’ पदवी मिळवली. अंतराळवीर होण्याच्या स्वप्नानं तिला पछाडलं होतं. १९९६ साली पहिल्या अंतराळ प्रवासात तिनं १०.६७ दशलक्ष किमी प्रवास केला. हे अंतर २५२ वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याइतकं होतं. २००० साली दुसऱ्या उड्डाणासाठीही तिची निवड झाली होती. ‘नासा’सह अनेक मान्यवर संस्थांनी कल्पनाला मरणोत्तर पुरस्कार देऊन तिच्या कार्याचा गौरव केला. कल्पना चावलाच्या असामान्य कार्यानं संजय पुजारी प्रभावित झाला. 

याच वेळी संजयनं ‘वेध अवकाशाचा’ या शीर्षकाखाली एक व्याख्यान तयार केलं. लोकांना विज्ञानावरची व्याख्यानं आवडत नाहीत ही गोष्ट संजयच्या लक्षात आली होती. मग त्यानं त्यात रंजकतेनं काही गोष्टींची गुंफण केली. राइट बंधूंच्या विमानापासून ते आतापर्यंतच्या रॉकेट संशोधनातली प्रगती त्यानं स्लाइड शो आणि व्याख्यानातून मांडली. अग्निबाणातली भारताची प्रगती, स्पेस शटल म्हणजे काय अशा अनेक गोष्टी या व्याख्यानातून लोकांसमोर उलगडल्या जाऊ लागल्या. या काळात संजयनं डॉ. अब्दुल कलाम यांना आपल्या कामाविषयी खूप पत्रं लिहिली. त्यांनीही त्याच्या कामाची दखल घेऊन त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या संबंधातली काही पोस्टर्स पाठवली. संजयला अब्दुल कलामांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आणखीनच हुरूप आला. तो आपली साधनसामग्री घेऊन शाळा शाळा, कॉलेजेसमध्ये व्याख्यानं देत फिरू लागला. त्याची व्याख्यानं विद्यार्थ्यांना इतकी आवडायला लागली, की त्याला ठिकठिकाणांहून आमंत्रणं यायला लागली. 

कल्पना चावलाच्या कामामुळे आणि तिच्या बलिदानामुळे संजयला तिच्या नावाचं स्मरण करत काही तरी करायला हवं असं वाटायला लागलं आणि यातूनच कल्पना चावला विज्ञान केंद्राची कल्पना साकारली. स्वतःच्याच लहानशा घरातली समोरची खोली कल्पना चावला विज्ञान केंद्रासाठी त्यानं उपयोगात आणली; मात्र या नावानं नोंदणी करण्यासाठी तिच्या वडिलांची परवानगी घेणं आवश्यक होतं. संजय आपल्या कुटुंबासह दिल्लीपासून दोन-अडीच तास अंतरावर असलेल्या कर्नाल इथं कल्पना चावला हिच्या वडिलांना भेटायला गेला. त्यांनी त्याचं झपाटलेपण बघितलं आणि त्याला कल्पनाचं नाव वापरायला परवानगी दिली. आता या केंद्रात ‘लर्निंग बाय डूइंग’ या तत्त्वाखाली काम सुरू झालं. सुरुवातीला फक्त रविवार आणि नंतर सातही दिवस कल्पना चावला विज्ञान केंद्र गर्दीनं फुलून गेलं. घरातली जागा अपुरी पडायला लागल्यावर कधी बागेतल्या झाडाखाली, तर कधी एखाद्या मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये कार्यक्रम, कार्यशाळा, व्याख्यानं होऊ लागली. विमान उडतं कसं, मानवी शरीराची अंतर्गत रचना कशी असते आणि कशी काम करते इथपासून अनेक गोष्टींतलं विज्ञान उलगडण्यासाठी संजयच्या मदतीला अनेक तज्ज्ञ मंडळीही येऊ लागली. मुलं स्टेथोस्कोप तयार करू लागली, बीपी मोजू लागली. स्वतःचं शरीर जाणून घेऊ लागली. 

आपण बघतो, ऐकतो, पण त्याहीपेक्षा जेव्हा स्वतःच्या हातांनी एखादी गोष्ट करतो, तेव्हा ती कायमस्वरूपी लक्षात राहते हे मुलांनाही समजलं. संजयला आता मोठ्या जागेची गरज भासू लागली. त्याला त्याची पत्नी नेहा आणि सासरे यांनी खंबीरपणे साथ दिली आणि साह्य केलं. यातूनच कल्पना चावला विज्ञान केंद्राची स्वतंत्र वास्तू तयार झाली. कराड अर्बन बँकेनंही संजयला मदत केली. कल्पना चावलाचे वडील आपल्या मुलीच्या नावानं उभारलेलं हे विज्ञान केंद्र पाहण्यासाठी खास कराडला आले. 

विज्ञान केंद्राची व्हॅनयाच दरम्यान संजयनं आपले गुरू अरविंद गुप्ता यांच्याकडून अनेक गोष्टी शिकून घेतल्या. त्यानं कल्पना चावला विज्ञान केंद्राचं ग्रंथालय विकसित केलं. पुस्तकांबरोबरच सीडी, डीव्हीडी उपलब्ध केल्या. केंद्रातली इंच न् इंच जागा उपयोगात आणली गेली. आज दुर्गम भागातली मुलंही कल्पना चावला विज्ञान केंद्रात ओढीनं येतात. इथं रमतात, खेळातून विज्ञान शिकतात. शिक्षकांची आणि पालकांनाही इथं प्रशिक्षण दिलं जातं. नुकतीच संजयनं मोबाइल व्हॅन घेतली असून, जी मुलं केंद्रापर्यंत येऊ शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचायचं असं त्यानं ठरवलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टींनी ही व्हॅन भरलेली असून, ‘विज्ञान आपल्या घरी’ असा संदेश देत ती ठिकठिकाणी पोहोचते आहे. संजयला त्याच्या कामाला हातभार लावणारे चिन्मय जगधनी, भूषण नानावटी, प्रमोद, कबीर मुजावर, कुमार तरल यांच्यासारखे बुद्धिमान तरुणही मिळाले आहेत.

शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्यासह संजय पुजारीविख्यात शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू पंडित विद्यासागर, पर्यावरणतज्ज्ञ अरविंद देशमुख, सुरेश नाईक असे मान्यवर कल्पना चावला विज्ञान केंद्राला आवर्जून भेट देत असतात. संजयला प्रोत्साहित करत असतात. संजयचं कुठल्याही मदतीशिवाय सुरू झालेलं विज्ञानवृद्धीचं काम थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलं आणि सरकारची विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावर काम करणारी टीम कराडमध्ये येऊन दाखल झाली. त्यांनी संजयचं काम बघितलं आणि २०१७ साली विख्यात वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते संजय पुजारी या तरुणाला केंद्र सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाच्या वतीनं राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

विज्ञान केवळ पुस्तकात न ठेवता आपल्या आयुष्याचा भाग बनवणारे संजय पुजारीसारखे लोक खूप कमी आहेत. ‘स्वप्नाकडून सत्याकडे जाण्याचा मार्ग अस्तित्वात आहे. तो शोधण्याची जिद्द आणि धैर्य तुमच्यात असलं पाहिजे,’ हे कल्पना चावला विज्ञान केंद्राचं ब्रीदवाक्य आहे. संजयच्या स्वप्नापासून आणि त्याच्या प्रत्यक्षात साकारलेल्या कार्यापासून प्रेरणा घेऊ या आणि विज्ञानाला आपल्या जगण्याचा हिस्सा बनवू या.

संपर्क :
डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र, ओंकार अपार्टमेंट, श्री हॉस्पिटलजवळ, रुक्मिणीनगर, कराड – ४१५११०
मोबाइल : ९२२६१ ६३२६०  ९२२६४ ६८०८८
ई-मेल : kcsc.karad@yahoo.com
वेबसाइट : http://www.kcsckarad.com/

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील बातम्यांमध्ये घेण्यात आलेल्या संजय पुजारी यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sultan Ansari, karad About 254 Days ago
Sir i am from karad and plz have a look at my flying vidio https://youtu.be/wo92d329J_8
0
0
Ganesh Thorat About
Good..
0
0
Dr. Nitin D. Sali About
Very informative and creative.
0
0
Kailas shinde About
Aniket very nice & Infermetive article on sanjay pujari .very good
0
0

Select Language
Share Link
 
Search