Next
यंदाची निवडणूक दिव्यांग मतदारांना सुलभ
राज्यात दोन लाख २४ हजार दिव्यांग मतदार
प्रेस रिलीज
Monday, March 25, 2019 | 01:26 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : राज्यातील दिव्यांग मतदारांना यंदाची लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होणार आहे. दिव्यांगांना मतदानासाठी विविध सुविधा देण्याबरोबरच भारत निवडणूक आयोगाने यंदा त्यांच्यासाठी पीडब्ल्यूडी (PWD) हे नवीन मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले आहे. निवडणूक आयोगाने यंदा दिव्यांग मतदारांसाठी ‘सुलभ निवडणुका’ (Accessible Elections) हे घोषवाक्य निश्चित केले आहे.

राज्यात यंदा दिव्यांग मतदारांची संख्या दोन लाख २४ हजार १६२ इतकी आहे. यात अंधत्व किंवा कमी दृष्टी असलेले ३७ हजार ३२४, मूकबधिर २४ हजार ७७, शारीरिक अपंगत्व असलेले एक लाख आठ हजार २२ तर इतर अक्षमता असलेले ५४ हजार ३९ दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांगांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी, तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने यंदा मोठा पुढाकार घेतला आहे. राज्यात तीन डिसेंबर २०१८ रोजी दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तसेच अपंग कल्याण आयुक्तालय यांचीही या कामी मदत घेण्यात येत आहे. त्यांच्या सहाय्याने यंदा दिव्यांग मतदारांची विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात आली. अपंगांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश निवडणूक आयोगामार्फत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या सर्व सुविधांबाबत निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांना विविध प्रशिक्षणांमध्ये अवगत करण्यात आले आहे. दिव्यांगांना सुविधा देण्यासाठी जिल्हास्तर, तसेच राज्यस्तरावर सुकाणू समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हीलचेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग आदी सुविधा असणार आहेत. याशिवाय मागणीनुसार मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक व्यवस्था तसेच व्हीलचेअरची सुविधाही प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

दिव्यांगांची मतदारनोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी आदी सोयी उपलब्ध करून घेण्यासाठी पीडब्ल्यूडी (PWD) हे ॲप सुरू करण्यात आले आहे. हे मोबाईल ॲप डाउनलोडसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या ॲपवर जाऊन मागणी केल्यास दिव्यांग मतदारांना प्रशासनामार्फत व्हीलचेअर, तसेच मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search