Next
पालकांना मिळणार समृद्ध पालकत्वाचे धडे
महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते ‘माइंडफुल पॅरेंटिंग’ उपक्रमाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Thursday, January 10, 2019 | 11:24 AM
15 0 0
Share this article:

पुणे : मुलांच्या जडणघडणीत शाळा आणि पालक या दोहोंच्या असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जागृती घडवणे आणि पालकांना त्यांच्या स्वतःच्या वैचारिक विकासातून अधिक चांगले पालक बनण्यासाठी प्रेरित करण्याच्या हेतूने पुण्यातील कन्नड संघाच्या ‘कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’मध्ये ‘माइंडफुल पॅरेंटिंग प्रोग्रॅम’ हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे पालकांना मिळणार समृद्ध पालकत्वाचे धडे मिळणार असून, महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत या दोन वर्षे चालणाऱ्या या उपक्रमाची पाच जानेवारी २०१९ रोजी औपचारिक सुरुवात करण्यात आली.

कॅलिफोर्निया विद्यापीठ (बर्कली) येथे असलेल्या ‘ग्रेटर गुड सायन्स सेंटर’ने या उपक्रमासाठी जगभरातून १६ संस्थांची निवड केली होती. त्यात भारतातून केवळ ‘कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट्स’ला निवडण्यात आले असून, संस्थेचे प्रतिनिधी बर्कली येथे जाऊन खास प्रशिक्षण घेऊन आले आहेत.

उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध आध्यात्मिक प्रशिक्षक नित्य शांती, कन्नड संघाच्या सचिव मालती कलमाडी, अध्यक्ष कुशल हेगडे, मॅनेजमेंट फॅसिलिटेटर कामिनी सक्सेना, ‘माइंडफुल पॅरेंटिंग’ उपक्रमाच्या चमूतील प्रमुख सदस्य विजयम् कार्था, ज्योती कुमटा, सुंदर अय्यर, अश्विनी मुबारक, तसेच कन्नड संघाच्या सहखजिनदार राधिका शर्मा, विश्वस्त सुधाकर राव आदी या वेळी उपस्थित होते.

‘संस्थेच्या डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल (गणेशनगर व औंध) आणि लोहगावमधील कावेरी इंटरनॅशनल स्कूल या तीन शाळांमधील पालक व शिक्षकांना एका व्यासपीठावर आणून हा उपक्रम राबवला जात आहे. यात पालकांसाठी वैचारिक जडणघडण आणि पालकत्त्व याविषयी तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे,’ असे मालती कलमाडी यांनी सांगितले.

मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘शहरी जीवनाच्या धकाधकीत अनेकदा पालकांना मुलांसाठी ‘क्वालिटी टाइम’ देणे शक्य होत नाही. पालकांशी वाद झाला किंवा एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही म्हणून मुलांनी आत्महत्या केली, अशा घटनाही वाचायला मिळतात. तंत्रज्ञानाचा आपल्याला फायदा होत असला, तरी त्याचे काही दुष्परिणामदेखील आहेत. वाढत्या ताणतणावांच्या परिस्थितीत ‘माइंडफुल पॅरेंटिंग’ हा उपक्रम स्तुत्य आहे. संस्थेने पालिका शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यास मदत करावी, जेणेकरून दुर्बल घटकातील मुलांच्या पालकांना त्याचा लाभ घेता येईल.’

माणसाने माणूस म्हणून समृद्ध होणे आणि त्याचे पालकत्त्वात उमटणारे प्रतिबिंब याविषयी सांगताना आध्यात्मिक प्रशिक्षक नित्य शांती म्हणाले, ‘एखादी घटना आणि आपली त्यावरील प्रतिक्षिप्त क्रिया यांच्यामध्ये असलेले अंतर कसे वाढवता येईल, याचा आपण प्रयत्न करायला हवा. कारण या मधल्या जागेतच शहाणपण सामावलेले असते. पालक म्हणून आपल्याला जितकी चांगली कामगिरी करता येईल ती निश्चित करावी; परंतु त्यापलीकडच्या काही गोष्टी आपल्या हातात असतातच असे नाही. शिवाय मुलांच्या आयुष्यातील सर्व गोष्टी पालकांनीच ठरवणे प्रत्येक वेळी गरजेचे नसते. मुलांमधील नेमके गुण ओळखून त्याची जोपासना पालकांनी करायला हवी. वर्तमानकाळात जगणे फार महत्त्वाचे असते. तसेच, तुलना अर्थहीन असते या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. कृतज्ञता बाळगणे आणि चांगल्या गोष्टीचे कौतुक करणे ही देखील महत्त्वाची मूल्ये आहेत.’    

‘या उपक्रमातील पहिल्या सत्रात प्रभात रस्त्यावरील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलमध्ये १९ जानेवारी २०१९ रोजी नित्य शांती यांचे व्याख्यान होणार आहे. कोणत्याही शाळेस ‘पालक शिक्षण’ या विषयासंबंधी माहिती हवी असल्यास त्यांनी संस्थेशी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,’ असे मालती कलमाडी यांनी या वेळी सांगितले.

संपर्क क्रमांक : ९३७०८ ८३८७४
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search