Next
‘पार्किन्सन्स’च्या रुग्णांच्या नृत्याविष्काराने दिली प्रेरणा
पुण्यातील पार्किन्सन्स मेळाव्यात सादरीकरण
अमोल आगवेकर
Monday, April 15, 2019 | 03:32 PM
15 0 0
Share this article:

पार्किन्सन्सच्या रुग्णांनी केलेला नृत्याविष्कार सर्वांनाच भावला.

पुणे :
पार्किन्सन्स अर्थात कंपवात हा असा विकार आहे, की ज्यामुळे शरीराला कंप येतो, हालचालींवर मर्यादा येतात आणि तोलही जातो. उपचारांनी याचा त्रास कमी होतो; मात्र तो पूर्णपणे बरा होत नाही. त्यामुळे पार्किन्सन्स झाल्यानंतर हे सत्य स्वीकारून जिद्दीने उभे राहणे महत्त्वाचे असते. पुण्यात नुकत्याच झालेल्या पार्किन्सन्स मेळाव्यात, पार्किन्सन्स झालेल्या काही रुग्णांनी सुंदर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांना थक्क केले. त्यातून अशा अनेक रुग्णांना त्यांनी प्रेरणा दिली. ‘बार बार देखो, हजार बार देखो,’ ‘इना मिना डिका’, ‘तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालं ना’ या गाण्यांच्या तालावर त्यांनी उत्तम नृत्य सादर केले. नृत्यदिग्दर्शक हृषीकेश पवार यांनी या रुग्णांच्या नृत्याचे दिग्दर्शन केले होते. नृत्योपचाराचा भाग म्हणून त्यांना नृत्य शिकविण्यात आले. (या नृत्याचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)पुण्यातील पार्किन्सन्स मित्रमंडळ स्वमदत गटाच्या वतीने आयोजित पार्किन्सन्स मेळाव्यात हे नृत्यसादरीकरण झाले. या वेळी मुंबईतील पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटलमधील मेंदूविकारतज्ज्ञ सल्लागार व संशोधिका डॉ. चारुलता संखला, स्वमदत गटाच्या उपाध्यक्षा शोभना तीर्थळी, संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन, चिटणीस रामचंद्र करमरकर, वृद्धकल्याणशास्त्रतज्ज्ञ डॉ. रोहिणी पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. स्वमदत गटाच्या स्मरणिकेचे या वेळी प्रकाशन करण्यात आले.

पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

पार्किन्सन्स हा विकार झालेल्यांसाठी पार्किन्सन्स मित्रमंडळ हा स्वमदत गट चालवला जातो. त्या गटाच्या माध्यमातून रुग्ण (शुभार्थी) व त्यांची काळजी घेणारी व्यक्ती (शुभंकर) हे मिळून पार्किन्सन्ससोबतचे जगणे सुसह्य व आनंदी करण्याचा प्रयत्न करतात. दर वर्षी ११ एप्रिल या जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त पार्किन्सन्स मेळावा घेतला जातो आणि त्यात शुभार्थी व शुभंकर सहभागी होतात. १३ एप्रिल रोजी पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शुभार्थींनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही सभागृहाबाहेर आयोजित करण्यात आले होते. संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. शुभार्थी नारायण कलबाग या ९६ वर्षांच्या आजोबांनी सादर केलेल्या ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. (ईशस्तवनाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

‘नृत्य शिकवताना आनंद...’
पार्किन्सन्स रुग्णांच्या नृत्याबाबत नृत्यदिग्दर्शक हृषीकेश पवार म्हणाले, ‘पार्किन्सन्सच्या रुग्णांना नृत्योपचार द्यायला आम्ही सुरुवात करून येत्या २७ एप्रिलला नऊ वर्षं पूर्ण होत आहेत. आजारात गुंतलेले मन दुसऱ्या गोष्टीत गुंतवणे आणि त्यांच्या शरीराच्या हालचाली घडवणे या दोन गोष्टी नृत्योपचारामुळे साध्य होतात. आजी-आजोबांना नृत्य शिकवताना मजा येते. तरुण-तरुणींना नृत्य शिकवताना जशा गमतीजमती घडतात, तशाच गमतीजमती ज्येष्ठांच्या क्लासमध्येही घडतात. या सगळ्यातून त्यांना आणि मला दोघांनाही खूप आनंद मिळतो.’

डॉ. चारुलता संखला यांनी मार्गदर्शन केले.

‘ॲपोमॉर्फिन पार्किन्सन्स बरा करत नाही’
मुंबईतील पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटलमधील मेंदूविकारतज्ज्ञ सल्लागार आणि पार्किन्सन्सवर अनेक वर्षे संशोधन करणाऱ्या डॉ. चारुलता संखला यांनी या वेळी ‘पार्किन्सन्सच्या औषधांचे दुष्परिणाम आणि औषधांचे नियोजन’ या विषयावर मार्गदर्शन केले. सोशल मीडियातील व्हिडिओ पाहून ॲपोमॉर्फिनबाबत गैरसमज करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

‘पार्किन्सन्सवर गेल्या अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे; पण पार्किन्सन्स का होतो याचे कारण अजून अज्ञातच आहे. त्यामुळे पार्किन्सन्सची औषधे घेणे आणि त्याच्यासोबतच जगणे हा पर्याय आहे. पार्किन्सन्सवरची शस्त्रक्रिया सर्व रुग्णांना उपयोगी ठरते असेही नाही. ती शस्त्रक्रिया महागडी असल्याने कमी वयातील व्यक्तींना आम्ही शस्त्रक्रियेचा सल्ला देतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच शस्त्रक्रियेबद्दलचा निर्णय घ्यायला हवा. ॲपोमॉर्फिन हे पार्किन्सन्स बरा करणारे इंजेक्शन नाही. त्यामुळे सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीची डॉक्टरांकडून शहानिशा करून घेणे गरजेचे आहे. ॲपोमॉर्फिनने पार्किन्सन्स बरा होतो असा गैरसमज करून घेऊ नका,’ असा सल्ला डॉ. चारुलता संखला यांनी दिला. 

त्या म्हणाल्या, ‘व्हॉट्सॲपवरील व्हिडिओ खूप जणांनी पाहिला असेल. त्यामध्ये दाखवलेल्या ॲपोमॉर्फिन या इंजेक्शनबद्दलच्या शंकांना मी उत्तर देऊ इच्छिते. ॲपोमॉर्फिन हे पार्किन्सन्स बरा करणारे इंजेक्शन नाही. ते घेतले की जादू होते आणि तुम्ही एकदम ठणठणीत बरे होता, असे शक्य नाही. त्याचा परिणाम एक तास राहतो. हे इंजेक्शन घेतल्यावर व इतर औषधे घेतल्यावर होणारे दुष्परिणाम (साइड इफेक्ट्स) सारखेच आहेत. त्यामुळे असे व्हिडिओ पाहिल्यानंतरही तुमच्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊनच पुढे जा.’

उपस्थितांच्या अनेक शंकांना डॉ. संखला यांनी या वेळी सविस्तर उत्तरे दिली. मृदुला कर्णी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shobhana Tirthali About 130 Days ago
फारच सुंदर वृत्त.नारायण कलबाग यांचे ९६ व्यावर्षी पार्किन्सन्स असतांना गायलेले ईशस्तवन मनाची ताकद दाखवणारे.नृत्यासाठी सहभागी आणि त्यांचे गुरू यांचे कौतुक.
0
0
Mrudula karni About 130 Days ago
खूप सुंदर कव्हरेज । व्हीडीओ पण छान येऊ न शकलेले अनेक शुभार्थी आणि शुभंकर याचा लाभ घेऊ शकतात । अमोल आगवेकर यांनी छान काम केले।
0
0
Vijayalaxmi Revankar About 131 Days ago
Excellent filming and write-up. Thanks a lot.
0
0

Select Language
Share Link
 
Search