Next
निसर्गरम्य चित्रकूट
BOI
Wednesday, March 07 | 06:45 AM
15 0 0
Share this story

चित्रकूट येथील रामघाट

‘करू या देशाटन’
सदराच्या गेल्या भागात आपण ‘पन्ना’ या मध्य प्रदेशातील ठिकाणी फेरफटका मारला. या वेळी सैर करू या चित्रकूट या अत्यंत सुंदर, रम्य अशा स्थळी...
.............
चित्रकूट हे भाविक आणि निसर्गप्रेमींसाठीही अतिशय सुंदर असे ठिकाण आहे. रामायण सर्वच देशवासीयांच्या हृदयस्थानी आहे. त्यामुळे रामायणाशी निगडित असलेल्या ठिकाणी भाविकांची पावले वळतातच. तसेच चित्रकूट या ठिकाणाचे आहे. हे ठिकाण मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात असून, ते उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. त्यातील काही ठिकाणे उत्तर प्रदेशातही येतात. उत्तर प्रदेशात या भागाला लागून असलेल्या भागाला चित्रकूट जिल्हा असे नाव देण्यात आले आहे. 

‘गदिमां’नी गीतरामायणात 

या इथे लक्ष्मणा, बांध कुटी
या मंदाकिनीच्या तटनिकटीं
चित्रकूट हा, हेच तपोवन
येथ नांदती साधक, मुनिजन

असे चित्रकुटाचे वर्णन केले आहे. चित्रकूट हे भारतातील सर्वांत प्राचीन तीर्थ क्षेत्रांपैकी एक असून, बुंदेलखंडातील एक निसर्गरम्य ठिकाण आहे. १९८९मध्ये खजुराहोहून नरैनीमार्गे अलाहाबादला जाताना थोडी वाकडी वाट करून गेल्यावर सतना जिल्ह्यातील हे ठिकाण पाहण्याचे भाग्य मला मिळाले. चित्रकूटाचे क्षेत्रफळ ३८.२ चौरस किलोमीटर आहे. पर्वतराजीच्या कुशीत वसलेल्या मंदाकिनी नदीवर अनेक सुंदर घाट व मंदिरे आहेत. येथे दर वर्षी सुमारे ३० लाख भाविक/पर्यटक येत असतात. श्रीराम वनवासात असताना १४ वर्षांतील १२ वर्षं इथे राहिले होते. अत्री ऋषी व सती अनुसया येथेच तपस्या करीत असत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी अनसूयेच्या घरी येथेच जन्म घेतला होता. 

कामदगिरी : येथील पाच किलोमीटरची परिक्रमा पूर्ण केल्यावर आपली मनोकामना पूर्ण होते, म्हणून भाविक कायम येथे येत असतात. जंगलातील पदभ्रमंतीचा आनंद लुटण्यासाठी निसर्गप्रेमींची पावलेही येथेच वळतात. येथे कटनाथाचे मंदिरही आहे.  

रामघाट : या घाटावर प्रभू रामचंद्र नित्य स्नानासाठी येत असत. श्रीराम-भरतभेटीचे ठिकाणही हेच समजले जाते. येथे गोस्वामी तुलसीदासांची मूर्तीही आहे. भगव्या वस्त्रातील साधू-संत येथे भजन-कीर्तनात तल्लीन झालेले दिसतात. सायंकाळी येथे होणारी आरती मनाला शांती देते. 

जानकीकुंड : रामघाटापासून दोन किलोमीटर अंतरावर जानकीकुंड आहे. जानकी अर्थात सीतामाई येथे स्नान करीत असे. म्हणून त्याला जानकीकुंड असे संबोधले जाते. येथे रंजनकी मंदिर व संकट विमोचन मंदिर आहे. 

स्फटिक शिला : जानकीकुंडाजवळच मंदाकिनी नदीकाठावर स्फटिक शिला आहे. अशी एक आख्यायिका आहे, की जेव्हा सीता या खडकावर उभी होती, तेव्हा जयंताने काक स्वरूपात असताना तिला चोच मारली होती. श्रीराम व सीता येथे बसून चित्रकूटाचे सौंदर्य पाहत असत. 

अनसूया आश्रम : स्फटिक शिलेपासून चार किलोमीटर अंतरावर जंगलामध्ये अनुसया आश्रम आहे. येथे अत्री मुनी, अनसूया, दत्तात्रेय आणि दुर्वास मुनी यांच्या प्रतिमा आहेत. 

हनुमानधारा
राघव प्रयाग : येथे श्रीरामांनी आपल्या पित्याचे म्हणजेच दशरथाचे मरणोत्तर क्रियाकर्म केले, असे मानले जाते. पर्णकुटी या ठिकाणी येथे श्रीरामाची कुटी होती. ब्रह्मकुंड या ठिकाणी अस्थी विसर्जित केल्या जातात, तर श्रीराम विश्रांती घेत असताना लक्ष्मण जेथून पहारा देत असे, त्या ठिकाणाला लक्ष्मणपहाडी असे म्हणतात. 

हनुमानधारा : लंकादहनानंतर हनुमानाचा दाह कमी होण्यासाठी श्रीरामाने हनुमानाला येथे राहण्यास सांगितले होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथून परिसराचे विहंगम दृश्य दिसते. 

भरतमिलाप : येथे राम आणि भरताची भेट झाली होती. तसेच श्रीरामाच्या सर्व माताही येथे भेटण्यासाठी आल्या होत्या. 

गुप्त गोदावरीगुप्त गोदावरी : हे ठिकाण १८ किलोमीटर दूर आहे. येथे दोन गुंफा आहेत. गुंफेच्या परिसरात एक छोटा तलावही आहे. दुसऱ्या गुहेत सतत पाणी वाहत असते. 

भरतकूप : असे म्हणतात, की भरत रामाला राज्याभिषेक करण्याच्या तयारीने येथे आला होता. त्यासाठी अनेक नद्यांचे पाणी एकत्रित करून ठेवले होते. अत्री ऋषींच्या सूचनेनुसार ते पाणी एका विहिरीत ठेवण्यात आले. तेव्हापासून या ठिकाणाला भरतकूप या नावाने ओळखले जाते. 

गणेशबाग : चित्रकूटपासून हे ठिकाण तीन किलोमीटर दूर असून पेशव्यांनी येथे बांधलेल्या महालात खजुराहो शैलीतील शिल्पे आणि चित्रे आहेत. राघोबाचा दत्तकपुत्र अमृतराव याला ब्रिटिशांनी आठ लाख रुपये पेन्शन देऊन काशी येथे ठेवले होते. त्याचा मुलगा विनायक याने चित्रकूटजवळील कर्वीजवळ गणेशबागेची निर्मिती केली. तसेच येथे एक सुंदर विहीरही आहे. 


रामवन
बाकेसिद्ध : येथे एक नैसर्गिक गुहा असून, ‘वाक्सिद्धी’ या शब्दापासून बाकेसिद्ध हे नाव रूढ झाले. येथे तपश्चर्या केल्याने वाणी शुद्ध होते असे म्हणतात. चातुर्मासात श्रीराम व सीता यांचे वास्तव्य येथे असे. 

रॉक पेंटिंग्स : येथे आदिमानवाने काढलेली अनेक चित्रे होती; मात्र ती नष्ट झाली आहेत.

देवांगना पंपापूर : हे ठिकाण कोटितीर्थापासून थोड्या अंतरावर असून, देव-देवता श्रीरामाच्या भेटीला आल्यावर येथे राहत असत, असे मानले जाते. इंद्रपत्नी शची येथे येऊन राहिली होती. मेनका या अप्सरेने येथे तपश्चर्या केली होती. सुरभी, चक्रतीर्थ, रामशय्या ही चित्रकूटजवळील इतर ठिकाणेही फिरण्यासारखी आहेत. 

सतना जिल्ह्यातील आणखी काही ठिकाणे :
रामवन : हा भाग दंडकारण्यात येतो. येथूनच श्रीराम अमरकंटक येथे गेले असे म्हणतात. येथे हनुमानाचे पुरातन मंदिर आहे व तुलसीदासांच्या हस्तलिखितांचे संग्रहालयही आहे. हे ठिकाण सतनापासून १४ किलोमीटर अंतरावर आहे.

भरहूत स्तूपभरहूत स्तूप : ही सांची येथील बौद्ध स्तूपाची प्रतिकृती होती. कनिंगहॅम याने १८७३मध्ये हा शोधून काढला. या स्तूपातील अवशेष कोलकाता येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. याचे बांधकाम इ. स. पू. ३००मध्ये सम्राट अशोकाच्या वेळी झाले असावे. यावर ग्रीक पद्धतीचा प्रभाव दिसून येतो. जातककथा दाखविणारी अत्यंत सुंदर शिल्पकला येथे होती. कनिंगहॅमने भारतातील अनेक पुरातन वास्तू शोधून काढल्या व त्यांचे जतन केले.

नानाजी देशमुख यांची चित्रकूट परियोजना : 
नानाजी देशमुख यांनी राजकारण संन्यास घेतल्यावर सामाजिक कार्यात उडी घेतली व भारतातील आदिवासी व दुर्गम भागात काम करायचे ठरविले. मध्य प्रदेशातील विंध्य पर्वतातील आदिवासी वस्ती असलेला चित्रकूट व उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्हा हे त्यांनी कार्यक्षेत्र निवडले. त्यासाठी येथील ८० गावांची त्यांनी निवड केली. कृषी विकास, गुरुकुल, सिंचनप्रकल्प, स्वयंरोजगारास चालना असे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे सुरू केले. इंदिरा गांधी यांनीही त्याचे कौतुक केले होते. 

चित्रकूट संग्रहालय : रामायणातील घटना डोळ्यांसमोर उभ्या करणाऱ्या प्रदर्शनासह येथे प्राणिसृष्टीही उभी करण्यात आली आहे. वास्तवातील जंगलात प्राण्यांचे हुबेहूब पुतळे बसवण्यात आले आहेत.

शबरी फॉल्ससतना जिल्हा सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. येथे चुन्याचे खाणींचे प्रमाणही मोठे आहे. चित्रकूट येथे भरपूर हॉटेल्स, धर्मशाळा असून, मध्य प्रदेश पर्यटन विभागातर्फेही राहण्याची उत्तम सोय आहे. उत्तर प्रदेश पर्यटन विभागाची यात्री निवासही खूप चांगली आहेत. नोव्हेंबर ते मार्च हा येथे जाण्यासाठी योग्य कालावधी आहे. 

कसे जायचे?
जवळचा विमानतळ अलाहाबाद (१२० किलोमीटर), तर जवळचे रेल्वे स्टेशन कर्वी (पाच किलोमीटर) आहे. जबलपूर, बांदा, दिल्ली, झाशी, हावडा, आग्रा, मथुरा, लखनौ, कानपूर, ग्वाल्हेर, रायपूर, कटनी, मुगलसराय, वाराणसी, बांदा येथून रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sugandha Deshpande About 225 Days ago
खुपच छान माहिती पुर्ण
0
0
Ramesh Atre About 238 Days ago
छान माहिती व फोटो !
0
0
Kamalsing Patil About 277 Days ago
उपयूक्त माहीती आपण दिलेली माहीती प्रवास सहज आणि सोपा करते. धन्यवाद सर
0
0
Avinash Ashirgade. About 280 Days ago
सुरेख नी विस्ञूत माहीती मिळाली.. नक्कीच बघण्याजोगी ठिकाणे. उत्सुकता वाढली.
1
0
Milind Lad About 281 Days ago
Madhavji... Outstanding efforts. I always enjoyed your articles. You tried hard. It is well written & contained sound practical information. You elaborated out several nearby places nicely which will be beneficial to tourists. Thanking you for your nice article...
1
0
Raju sonar About 281 Days ago
लय भारी
1
0
Tami sonar About 281 Days ago
सुंदर माहिती
1
0
अच्युत चिंतामणी फाटक About 281 Days ago
खुपच सविस्तर माहिती. एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर तुमचे लेख फार उपयोगी पडतील.
1
0
Shreyas Joshi About 281 Days ago
छान माहिती👌
1
0
सतीश चौगुले About 281 Days ago
खूप छान माहिती
1
0
Dattatray Phadke About 281 Days ago
माधवराव फार छान माहिती मिळाली जरूर तिथे जाऊन येऊ.
1
0
Manoj Joshi About 281 Days ago
खूप छान माहिती!
1
0
श्याम सावजी About 281 Days ago
खूप सुंदर
1
0
वसंत परब About 281 Days ago
अप्रतिम
1
0
Yardena sasonker chincholkar About 281 Days ago
Khup sundar mahiti vachnnyat aali Avadli mala
1
0
Madhav Risbud About 281 Days ago
खुपच सुंदर
1
0
जयश्री चारेकर About 281 Days ago
खूपच छान उपयुक्त माहिती मिळाली.
1
0
A V Kulkarni About 281 Days ago
अतिशय उपयुक्त माहिती ! सोबत नकाशा दिला असता तर आणखी छान झाले असते !!
1
0
Shashi Pimplaskar About 281 Days ago
Excellent historic information.
1
0
जयश्री चारेकर About 281 Days ago
खूप छान माहिती .चित्ररथ डोळ्यासमोर आले.
1
0
Sudhir Bokil About 281 Days ago
Nice place to visit. Nice presentation
1
0
Parashuram Babar About 281 Days ago
Pharch chhan
1
0

Select Language
Share Link