Next
‘पब्लिक इश्यू’ म्हणजे काय?
BOI
Saturday, June 02, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

‘आयपीओ’ अथवा ‘एफपीओ’मार्फत शेअर बाजारात गुंतवणूक करणे बऱ्याचदा फायदेशीर ठरते. म्हणूनच पब्लिक इश्यू म्हणजे काय व त्याद्वारे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक कशी करावी, याची माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात... 
.............
टीव्ही, वृत्तपत्रे, तसेच होर्डिंगवर आपण कंपन्यांच्या पब्लिक इश्यूची जाहिरात अनेकदा पाहत असतो; मात्र बहुतेक जणांना पब्लिक इश्यू म्हणजे काय याबाबत माहिती नसते आणि असली तरी पुरेशी नसते. त्यामुळे या मार्गाने शेअर बाजारात सहज शक्य असणारी गुंतवणूक केली जात नाही. ‘बिझनेस टुडे’मध्ये नुकतीच एक बातमी आली होती, की नजीकच्या भविष्यात सुमारे ३५ कंपन्या ‘आयपीओ’च्या माध्यमातून जवळपास ३६ हजार कोटी इतक्या भांडवलाची उभारणी करणार आहेत. ‘आयपीओ’ अथवा ‘एफपीओ’मार्फत शेअर बाजारात गुंतवणूक करणे बऱ्याचदा फायदेशीर ठरते. म्हणूनच पब्लिक इश्यू म्हणजे काय व त्याद्वारे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक कशी करावी, याची माहिती आपण आज घेऊ.

जेव्हा एखाद्या लिमिटेड कंपनीला व्यवसायवाढीसाठी भांडवलाची आवश्यकता असते व ही गरज कंपनी स्वतः भागवू शकत नाही, अशा वेळी ही कंपनी सामान्य जनतेकडून शेअर रूपाने भांडवल गोळा करत असते. त्याला पब्लिक इश्यू असे म्हणतात. पब्लिक इश्यूचे प्रामुख्याने प्रारंभिक आणि त्यानंतरचा असे दोन भाग पडतात. प्रारंभिक म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर अर्थात ‘आयपीओ’ आणि त्यानंतरच्या इश्यूला फॉलोऑन पब्लिक ऑफर अर्थात ‘एफपीओ’ असे म्हणतात. जेव्हा एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पहिल्यांदाच अशा प्रकारे भांडवल उभारणी करते, त्याला ‘आयपीओ’ असे म्हणतात. अशा प्रकारे भांडवल उभारणी केल्यावर ही कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनीत रूपांतरित होते. भविष्यात अशा पब्लिक लिमिटेड कंपनीला व्यवसायवाढीसाठी भांडवलाची गरज लागल्यास ही कंपनी पुन्हा आपला शेअर इश्यू बाजारात आणते. त्याला ‘एफपीओ’ असे म्हणतात.

जेव्हा एखाद्या लहान कंपनीचा व्यवसाय वाढत असतो, नफ्याचे प्रमाणही समाधानकारक असते व नजीकच्या काळात व्यवसाय वाढीस चांगला वाव आहे असे दिसून येते; मात्र व्यवसायवाढीसाठी आवश्यक असणारे भांडवल प्रवर्तक (प्रमोटर) उभारू शकत नाहीत, अशा वेळी हे प्रवर्तक भांडवल गोळा करण्यासाठी आपल्या कंपनीचे शेअर्स प्रथमच सामान्य गुंतवणूकदारांना ‘आयपीओ’द्वारे देऊ करतात. अशा देऊ केलेल्या शेअरची ‘स्टॉक एक्स्चेंज’वर नोंदणी करणे आवश्यक असते. त्याला ‘लिस्टिंग’ असे म्हणतात. ‘स्टॉक एक्स्चेंज’वर लिस्ट झालेला शेअर गुंतवणूकदार हवा तेव्हा घेऊ अथवा विकू शकतो. यामुळे गुंतवणुकीला तरलता (लिक्विडिटी) प्राप्त होते.

अशी लिस्टिंग झालेली कंपनी काही काळाने व्यवसायवाढीसाठी पुन्हा एकदा आपल्या कंपनीचे शेअर्स सामान्य गुंतवणूकदाराला देऊ करते. त्याला ‘एफपीओ’ असे म्हणतात. जेव्हा कंपनी आपले शेअर्स फक्त आपल्या शेअर होल्डर्सना देऊ करते, त्याला ‘राइट इश्यू’ असे म्हणतात. अशा प्रकारे जेव्हा कंपनी आपले शेअर्स स्वत: गुंतवणूकदाराला देऊन आपली भांडवली गरज भागवत असते, त्याला ‘प्रायमरी मार्केट’ असे म्हणतात. सामान्यत: अशा पद्धतीने भागभांडवल गोळा करण्याचा कालावधी चार दिवसांचा असतो. त्याला ‘इश्यू पीरियड’ असे म्हणतात. या विशिष्ट कालावधीत जे गुंतवणूकदार कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, त्यांना ‘अॅलॉटमेंट बेसिस’वर (वाटपाच्या आधारे) शेअर्स देऊ केले जातात. या कालावधीत अर्ज करणाऱ्यांनाच बाजारात इश्यू घेऊन आलेल्या कंपनीमार्फत शेअर्स दिले जातात आणि कंपनीला भांडवल मिळते. अशा प्रकारे मिळणारे शेअर्स कमी किमतीत मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे अल्प अथवा दीर्घ काळात भांडवली नफा मिळू शकतो; मात्र असे होईलच याची खात्री देता येत नाही.

पब्लिक इश्यूमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराचे बँक खाते व डी-मॅट खाते असणे आवश्यक असते. तसेच पब्लिक इश्यूच्या प्राइस बँड (किंमत पट्टा), लॉट साइझ, इश्यू पीरियड, अॅस्बा, कट ऑफ प्राइस अशा काही ठळक बाबी माहिती असणे आवश्यक असते.

सध्या आपल्या अर्थव्यवस्थेत होत असलेली लक्षणीय प्रगती पाहता शेअर बाजार चांगलाच तेजीत आहे आणि ही तेजी पुढील काळातही चालू राहील, असा अंदाज अर्थतज्ज्ञ व्यक्त करत असल्याचे दिसून येते. यामुळे नजीकच्या भविष्यात मोठ्या प्रमाणावर आयपीओ/एफपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य गुंतवणूकदारांना याबाबतची प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने पुढील काही लेखांत आपण प्राइस बँड (किंमत पट्टा), लॉट साइझ, इश्यू पीरियड, अॅस्बा, कट ऑफ प्राइस या मुद्द्यांबाबतची सविस्तर माहिती घेऊ.

- सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link