Next
‘संगीत कलेचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी करावा’
प्रेस रिलीज
Wednesday, April 04, 2018 | 04:53 PM
15 0 0
Share this story

‘गायनीकळा’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करताना सरसंघचालक मोहन भागवत आणि मान्यवरपुणे : ‘संगीत ही कला निसर्गानेच मानवाच्या हृदयात ठेवली आहे. या कलेचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी होऊ शकतो आणि त्यासाठी कलावंतांनी आपल्या सूचना मांडाव्यात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचा निश्चितच उपयोग करेल,’ असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक एप्रिलला येथे  केले.

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक स्व. बापूराव दात्ये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने ‘स्वरांजली’ हा कार्यक्रम पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या वेळी संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, निवृत्त लष्करी अधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिक उपस्थित होते. यानिमित्त मार्गदर्शन करताना भागवत बोलत होते.

पश्चिम महाराष्ट्र प्रातांचे संघचालक नानासाहेब जाधव व सहसंघचालक प्रतापराव भोसले हे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. स्व. दात्ये यांनी लिहिलेल्या ‘गायनीकळा’ या पुस्तकाचे यावेळी राधा दामोदर प्रतिष्ठान आणि हरी विनायक दात्ये जन्मशताब्दी समिती यांच्याकडून सरसंघचालकांच्या हस्ते पुनर्प्रकाशन करण्यात आले

वृंद संगीत हे सामुहिक भावना निर्माण करण्यासाठी आहे, असे सांगून भागवत म्हणाले, ‘भारतात प्रत्येक कलेचे स्वतःचे असे प्रयोजन आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये संगीताचा उपयोग रोमांच (थ्रील) निर्माण करण्यासाठी होतो. आपल्याकडे संगीताचा उपयोग शांती व भक्ती निर्माण करण्यासाठी होतो. आपल्याकडे संगीताला नादब्रह्म म्हणतात. जे शब्द संगीतातून बुद्धीपर्यंत जातात ते हृदयापर्यंत उतरतात आणि हृदयातून कृतीमध्ये उतरतात.  इंग्रजांची शिस्तबद्धता प्रसिद्ध होती. त्यांच्यासारखे शिस्तबद्ध प्रदर्शन असावे, अशी स्वयंसेवकांची इच्छा होती. त्यातून घोष पथकांचा विकास झाला.’

या वेळी श्री. भागवत म्हणाले, ‘संघात कोणीही मोठा किंवा छोटा नाही. प्रत्येक जण स्वयंसेवकच असतो. स्वयंसेवकाने काय करावे, कसे करायला हवे याचे स्व. बापूराव दात्ये हे उदाहरण होते. संघजीवनाचे ते मूर्तिमंत उदाहरण होते.  बापूसाहेबांनी जो उद्यम केला तो स्वयंसेवकांसाठी केला. संघाचा घोष उभा राहिला पाहिजे, संघ कार्याचा विस्तार व्हायला हवा या उद्देशाने बापूसाहेबांनी हे काम केले.’

‘कलावंतांनी या संदर्भातील सूचना मांडाव्यात. तुम्ही दिलेल्या सूचना शास्त्राच्या कसोटीवर उतरलेल्या असतील, यात शंका नाही. या कलेचा उपयोग मनुष्याला चांगला मनुष्य करण्यासाठी व्हायला हवा. ते काम आम्ही करू,’ असे ते म्हणाले.

स्व. बापूराव दात्ये यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पश्चिम महाराष्ट्र प्रांतामधून निवडक घोष पथकांना निमंत्रित करण्यात आलेले होते. या पथकांनी शिस्तबद्ध पद्धतीने घोषांचे संचालन केले. एकंदर चार टप्प्यांत हे वादन झाले. प्रत्येक घोषावर संघाच्या अनेक प्रसिद्ध रचनांचे सुरेल सादरीकरण करण्यात आले. बापूराव दात्ये यांनी स्वतः अनेक राग आणि रागिणीमध्ये तयार केलेल्या रचना देखील याठिकाणी सादर करण्यात आल्या व यामार्फतच बापूरावांना संघाकडून आदरांजली वाहण्यात आली. ही सर्व प्रात्यक्षिके सादर करणारी वादक हे व्यावसायिक नसून मागील तीन महिने आपले नोकरी, व्यवसाय व शिक्षण सांभाळून एकत्रित ३६० तास सराव करत स्वयंसेवकांनीच सादर केली.

बापुराव दात्ये यांनी हिंदुस्थानी आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीतातल्या केदार, धानी, तिलंग, देश, भूप, मांड, देशकार, पिलू, हंसध्वनी, कल्याण, शंकरा, कलावती अशा हिंदुस्थानी आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीतातल्या अनेक रागांवर आधारित रचना निर्माण केल्या. त्यांनी प्रांगणीय (परेड) संगीतासाठी स्वतंत्र लिपी निर्माण केली; तसेच सूर्यनमस्कार लयबद्ध पद्धतीने घालण्यासाठी आरुणी ही रचना केली.

सुमारे दीड तास चाललेल्या घोष वादनाने उपस्थित कलाकार, अधिकारी आणि प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद देत घोष वादकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि लष्कर, पोलिस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. याशिवाय ढोल ताशा पथक, संगीत वाद्ये दुरूस्ती-देखभाल क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती होती.

ज्येष्ठ गायक पं. सतीश व्यास, ज्येष्ठ गायक रवींद्र साठे, धनंजय दैठणकर स्वाती दैठणकर, मिलिंद तुळणकर, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, ज्येष्ठ तालवादक तौफिक कुरेशी, बासरीवादक पं. केशव गिंडे, पं. सुहास व्यास, मंजिरी आलेगावकर, पं. हेमंत पेंडसे, गायिका सीमंतिनी ठकार, अनुराधा कुबेर, हार्मोनियम वादक सुयोग कुंडलकर, संतूर वादक दिलीप काळे, फय्याज हुसेन, बासरीवादक नागराजन, दरबार ब्रास बँडचे इकबाल दरबार यांच्यासह १२५ हून अधिक कलावंत व लष्करातील निवृत्त अधिकारी एअर चीफ मार्शल श्री. नाईक, जनरल दत्तात्रय शेकटकर, जनरल व्ही. एम. पाटील यांसह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Deshpande prakash About 349 Days ago
Thank u for press release of swaranja li,by dr mohanji bhagwat ,RSS sirsanghchalak
0
0

Select Language
Share Link