Next
प्रभाग स्वच्छतेसाठी नागरिक, नगरसेवक आले एकत्र
नागरिक आणि नगरसेवकांच्या समन्वयातून घंटागाडीची व्यवस्था
शशिकांत घासकडबी
Tuesday, September 25, 2018 | 05:10 PM
15 0 0
Share this article:

तळोदा : कोणत्याही ठिकाणचा लोकप्रतिनिधी विधायक दृष्टिकोन ठेवणारा असेल, तर त्या भागातील नागरिक सुखी राहतात. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांना असाच काहीसा सुखद अनुभव घेता आला. पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही प्रभागाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव आल्याने या प्रभागातील नागरिक आणि नगरसेवकांनी एकत्र येऊन प्रभागासाठी स्वतंत्र घंटागाडी सुरू केली आहे.

तळोद्यातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये गेले अनेक दिवस कचरा उचलला जात नव्हता. त्यामुळे घाणीचे साम्राज्य झाले. दुर्गंधी पसरली. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. नागरिकांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व आरोग्याधिकारी या सर्व स्तरांवर तक्रारी केल्या. वेळोवेळी पाठपुरावादेखील केला; पण त्याची दखल घेतली गेली नाही. काही उपयोग होत नाही, असे लक्षात आल्यावर नागरिक आणि नगरसेवक यांच्या समन्वयातून प्रभागासाठी नवीन घंटागाडी तयार करण्याची संकल्पना समोर आली. सर्वांनी मिळून घंटागाडी तयार केली.

कचरा संकलनासाठी प्रभागातील एका गरजू महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभागातील प्रत्येक घरातून एक रुपया दररोज गोळा केला जाणार असून, त्यातून संबंधित महिलेचा पगार दिला जाणार आहे. वाहन, वाहतूक याचा सर्व खर्च प्रभागातील नगरसेवकांनी उचलला आहे. हितेंद्र क्षत्रिय आणि अनिता परदेशी हे या प्रभागाचे नगरसेवक आहेत. 

सत्ताधाऱ्यांच्या विरोधी गटातील नगरसेवक या प्रभागात असल्यामुळे तेथील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष न देण्याची पार्श्वभूमी या प्रकरणाला आहे; मात्र प्रभागातील नगरसेवकांचा विधायक दृष्टिकोन आणि नागरिकांनी केलेले सहकार्य यातून राजकारणी लोकांना सकारात्मक दृष्टी कशी मिळू शकते, याची एका छोट्या पालिकेतील ही कथा आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search