Next
पुण्याच्या टेनिसचा मानबिंदू : अर्जुन कढे
BOI
Friday, June 22, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

अर्जुन कढे

पुण्याच्या टेनिस क्षेत्रात सध्या एक नाव गाजत आहे, ते म्हणजे टेनिसपटू अर्जुन कढे याचे. अर्जुनने एक वर्षापूर्वी व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले आणि आज त्याच्या नावावर आयटीएफ स्पर्धेच्या एकेरीची दोन, तर दुहेरीची पाच विजेतेपदे जमा झाली आहेत... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या टेनिसपटू अर्जुन कढेबद्दल...
...........
गेल्या वर्षी महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेद्वारे अर्जुन कढेने खऱ्या अर्थाने व्यावसायिक टेनिस क्षेत्रात पदार्पण केले. अवघ्या एका वर्षात त्याने जाणकारांना आपल्या कामगिरीची दखल घ्यायला लावली. त्याने खरे तर अगदी लहान वयातच हा खेळ खेळायला सुरुवात केली होती. त्याचे वडील जयंत कढे हेदेखील नामांकित टेनिसपटू व प्रशिक्षक आहेत. त्यांच्याकडेच त्याने टेनिसचे धडे गिरवले. आजही तेच त्याचे प्रशिक्षक आहेत. मध्यंतरी तो शिकण्यासाठी परदेशात होता. त्यामुळे काही वर्षे या खेळापासून दूरही होता. अर्थात अमेरिकेत त्याने या खेळाच्या काही स्पर्धा खेळल्या, त्यात यशही मिळवले; मात्र भारतात परतून भारतासाठी खेळण्याचे त्याचे स्वप्न आहे. म्हणूनच तो मायदेशात परतला व व्यावसायिक टेनिसमध्ये खेळायला लागला. वडील जयंत कढे राष्ट्रीय स्तरावर बारा वर्षे टेनिस खेळलेले असल्याने त्यांचाच अनुभव आता अर्जुनला उपयोगी पडत आहे.

अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी अर्जुनने सिम्बायोसिस महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अमेरिकेतील ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतल्यावर तिथल्या स्थानिक क्लब पातळीवरील स्पर्धेतही त्याने देदीप्यमान कामगिरी केली. त्याने तिथे एकेरीच्या एकंदर सोळा स्पर्धा जिंकल्या. त्यातील तेरा स्पर्धांचे सलग विजेतेपद मिळवत एक जणू विक्रमच त्याने केला. ज्युनिअर गटात असताना त्याने चारही ग्रॅंडस्लॅम स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत तो दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला होता. आता तो पुण्यात परतला असून, आयटीएफ स्तरावर सातत्याने सरस कामगिरी करत आहे. असे असले तरी आता तो पुन्हा ग्रॅंडस्लॅम स्पर्धा खेळेल का, याबाबत इतक्यात सांगता येणार नाही. त्यासाठी त्याला केवळ आयटीएफ स्पर्धाच नव्हे, तर चॅलेंजर स्पर्धेसाठीही पात्र ठरावे लागेल.

आज जागतिक क्रमवारीत अर्जुन एकेरी आणि दुहेरीत पाचशेच्या आतल्या क्रमांकावर आहे. त्याला पहिल्या अडीचशे क्रमांकांपर्यंत प्रगती करावी लागेल, तरच तो चॅलेंजर स्पर्धेला पात्र ठरेल. तिथे तो कशी कामगिरी करतो, यावरच तो ग्रॅंडस्लॅम खेळेल की नाही, हे स्पष्ट होईल. त्याने ज्युनिअर डेव्हिस करंडक स्पर्धेत भारतीय संघाचे कर्णधारपदही भूषविले होते. तसे पाहायला गेले, तर त्याची कारकीर्द आता कुठे सुरू झाली आहे. त्यामुळे लगेचच त्याच्याकडून अवास्तव अपेक्षा करणे चुकीचे ठरेल.

भारताला टेनिसचा खूप मोठा आणि गौरवशाली इतिहास आहे  १८८०मध्ये ब्रिटिशांमुळे हा खेळ भारतात आला आणि क्रिकेटपाठोपाठ थोड्या संथ गतीने का होईना, पण लोकप्रिय बनला. १९६२मध्ये भारताच्या रामनाथन कृष्णन यांना विम्बल्डनमध्ये चौथे मानांकन मिळाले होते. त्यांचा मुलगा रमेश कृष्णन याने जागतिक क्रमवारीत ज्युनिअर गटात अग्रमानांकन पटकावले होते. त्याने ज्युनिअर गटातील विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यापाठोपाठ विजय अमृतराज, आनंद अमृतराज, शशी मेनन अशी एकाहून एक सरस खेळाडूंची फळीच आपल्याकडे तयार झाली होती; मात्र भारतीय टेनिसला गांभीर्याने घेतले जाऊ लागले ते १९९७ सालापासून. या वर्षी रिका हराकीच्या साथीत महेश भूपतीने फ्रेंच ओपन स्पर्धा मिश्र दुहेरीत जिंकली आणि इतिहास घडवला. त्यानंतर भूपतीने १९९८मध्ये मर्जिना लुसिसच्या साथीने विम्बल्डन स्पर्धेत विजेतेपद मिळवले. लिअँडर पेसने लिसा रेमंडच्या साथीने विम्बल्डनचे विजेतेपद मिळवले. या दोन्ही खेळाडूंनी विविध देशांच्या खेळाडूंच्या साथीने दुहेरीत, मिश्र दुहेरीत विजेतेपद मिळविण्याची परंपरा सुरू केली व कायमही राखली.  

त्याच वेळी भारतीय टेनिसच्या क्षितीजावर सानिया मिर्झा आणि आता रोहन बोपण्णाचा उदय झाला. या खेळाडूंनी भारतीय टेनिसला जगात एक मानाचे स्थान मिळवून दिले. युकी भांबरी, अंकिता रैना या खेळाडूंनीही हा वारसा जपला. आता आयटीएफ प्रकारामध्ये सातत्य दाखवत क्रमवारीत प्रगती करत चॅलेंजर स्पर्धांना पात्र ठरून हा वारसा जपण्याची जबाबदारी अर्जुनवर आहे.

वयाच्या सातव्या वर्षी टेनिसला सुरुवात केलेला अर्जुन व्यावसायिक टेनिस खेळताना आता जे यश मिळवत आहे, त्यासाठी त्याला त्याचे वडील जयंत कढे आणि पहिले प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. हार्ड कोर्टवर त्याचा खेळ जास्त बहरतो. बॅकहँड आणि बिनतोड सर्व्हिस यावरही तो हुकूमत गाजवत आहे. आता येत्या काळात देशात आणि परदेशात होणाऱ्या सगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणे, त्यात यश मिळवणे आणि क्रमवारीत आश्चर्यकारक प्रगती करणे हेच त्याचे ध्येय आहे.

एकदा का तो पहिल्या तीनशे खेळाडूंमध्ये आला, की त्याच्यासमोर चॅलेंजरसह मोठे व्यावसायिक टेनिसचे व्यासपीठ खुले होणार आहे. बघू या, टेनिसमधला हा अर्जुन हा चक्रव्यूह यशस्वीरीत्या भेदून पुढचा प्रवास कसा करतो ते...

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. 'क्रीडारत्ने' सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link