Next
मूलमंत्र आई-वडिलांमधील एकवाक्यतेचा...
BOI
Saturday, August 25, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


निरामय पालकत्व ताकदीने आणि समर्थपणे पेलणं हे प्रत्येक पालकापुढचं एक आव्हान असतं. मुलांसाठी आदर्श आई-वडील असणं ही एक खूप आवश्यक गोष्ट असते. यातली सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे पालकांमध्ये एकवाक्यता असायला हवी. ही एकवाक्यता मुलांच्या मनातील असंख्य मानसिक तणाव, त्यांच्या मनातील असंख्य प्रश्न दूर करणारी असते.... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या पालकांमधील एकवाक्यतेबद्दल...
....................
आपल्या पाल्याला चांगल्या सवयी लागाव्यात, तो एक चांगला माणूस बनावा, म्हणून प्रत्येक पालक धडपड करत असतातच. या सवयी लावण्यासाठी पालक अनेकदा साम-दाम-दंडाचाही वापर करतात. कधी बक्षिसं, कधी शिक्षा तंत्र, तर कधी प्रसंगानुरूप आणखी काही. तुमच्या या साऱ्या प्रयत्नांना अधिक चांगलं यश हवं असेल, तर अनिवार्यपणे करावी लागणारी आणखी एक गोष्ट म्हणजे पालकांमधील एकवाक्यता आणि सुसूत्रता.

समुपदेशक म्हणून अनेक केसेस हाताळताना असं लक्षात येतं, की पालकांमध्ये या एकवाक्यतेचा बऱ्याचदा अभाव असतो. याची काही उदाहरणे पाहू, म्हणजे नेमका विषय समजून घेता येईल. आई मुलांना रागावून सांगते, ‘आधी अभ्यास संपवा, मग खेळायला जा.’ तेव्हा वडील म्हणतात, ‘जाऊ दे गं त्यांना खेळायला.. सारखं काय रागावतेस त्यांना.’ अशा प्रसंगांमधून मग मुलांना अर्थातच आईपेक्षा बाबा जास्त जवळचे वाटू लागतात. कधी अभ्यास न केल्यामुळे, कमी मार्क मिळाल्यामुळे बाबा रागावतात, तेव्हा मुलाचा एवढासा चेहरा पाहून आई म्हणते, ‘नका हो रागावू, पुढच्या वेळी करेल तो अभ्यास. खूप हुशार आहे तो. उगाच सारखं रागावू नका त्याला.’ मग अशा प्रसंगांत आई मुलांना अधिक जवळची वाटते. कारण तिच्यामुळे बाबांचा ओरडा वाचलेला असतो.

या सगळ्यामध्ये दडलेली मेख अशी, की तुमच्यातील मतभेद मुलांसाठी फायद्याचे ठरतात. कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या व्यक्तीकडे जायचं, आपला कोणता हट्ट कोणाकडून पुरवून घ्यायचा, हे मुलांना समजायला लागतं आणि ती तशीच वागतात; पण याचा सखोल विचार केला, तर असं लक्षात येईल, की एक पालक मुलाला दुसऱ्या पालकासमोर सतत पाठीशी घालत असेल, तर तो दुसरा पालक आपोआपच मुलांच्या दृष्टिकोनातून नकारात्मक भूमिकेत जातो. वडील पाठीशी घालणारे असतील, तर आई, किंवा आई पाठीशी घालत असेल, तर वडील आपोआपच मुलांचे नावडते होतात. हळूहळू मुलांना त्या नावडत्या व्यक्तीचा राग येऊ लागतो. त्यांचे सतत खटके उडायला लागतात. या महिन्यात मी हाताळलेल्या तिन्ही केसेसमध्ये नेमकं हेच घडलंय. एक पालक आवडता आणि एक नावडता.

जरा याचा उलट विचार करून पाहा. दोन्ही पालकांमध्ये किंवा सर्वच सदस्यांमध्ये शिस्तीबाबत, नियमांबाबत, निर्णयांबाबत एकवाक्यता असेल, तर पाठीशी घालणारं कोणीच नसल्यानं मुलांना चुकीच्या सवयी लागण्याची शक्यता कमी होते. आईला न आवडणारी गोष्ट घरात इतरही कोणाला आवडत नाही हे मुलाला कळलं, की मूल आपोआपच ती गोष्ट करणं सोडून देतं. उदाहरणार्थ, ‘तू आता आजीला उलट उत्तर दिलंस. हे घरात कोणालाही आवडलं नाही. तू तिला सॉरी म्हणेपर्यंत तुझ्याशी कोणीही बोलणार नाही,’ असं आई किंवा बाबांनी सांगितलं आणि सगळ्यांनी ते तंतोतंत पाळलं, तर तुमचं मूल नक्कीच आजीला सॉरी म्हणेल आणि त्याची उलट बोलण्याची सवयही आपोआपच सुटेल, याची खात्री बाळगा. कारण उलट बोलणं हे वर्तन सर्वांकडूनच आणि सततच नाकारलं गेल्यानं त्याची वारंवारिता आणि तीव्रता आपोआपच कमी होईल. यासाठी मूल जेव्हा जेव्हा उलट बोलेल, तेव्हा सातत्यानं आणि समान तीव्रतेचीच शिक्षा द्या आणि तीही एकमतानं.

मुलांचं वर्तन, सवयी, नियम यांबाबत पालकांमध्ये काही मतभेद असतील, तर कोणत्याही परिस्थितीत त्यावर मुलांसमोर वादविवाद किंवा चर्चा करू नका. त्यावर आधी एकमत करा आणि मग मुलाला सांगा. तुम्ही या एकवाक्यतेच्या सूत्राचं सातत्यपूर्वक पालन केलंत, तर तुमचं पालकत्व निरामय होण्यास याचा निश्चितच फायदा होईल.

- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search