Next
बाहेर राहूनही पाळा पौष्टिकतेचा मंत्र...
BOI
Wednesday, May 16 | 09:45 AM
15 0 0
Share this story


शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या मुलांची आज कमी नाही. बाहेर राहणे म्हणजे अर्थातच हॉस्टेल, मेस या गोष्टी आल्या. एकमेकांचे पाहून वागणे, बोलणे इथपर्यंत ठीक मात्र आजकाल इतरांच्या पाहून मुलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीही बदलताना दिसत आहेत. इथूनच सुरुवात होते आरोग्याची हेळसांड होण्याची.... ‘पोषणमंत्र’ या सदरात आज पाहू या बाहेर राहणाऱ्या मुलांच्या आहारविषयक सवयींबद्दल..
...................................
स्पर्धेच्या युगात, शिक्षणातील अनेक नवीन संधी, विविध प्रकारचे अभ्यासक्रम, शेकडो शैक्षणिक संस्थांचे देशभर पसरलेले जाळे अशा सर्व कारणांमुळे आजकाल मुलांना पदवीच्या शिक्षणासाठी किंवा कदाचित ११वी पासूनच दुसऱ्या शहरात पाठवावे लागते. मुले एकदा बाहेर राहणार म्हटल्यावर खरेतर दुसरा संसारच थाटण्याची वेळ येते. कारण वसतिगृहात जरी राहण्याची, जेवण्याची सोय असली, तरीही इतर अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींची गरज भासतेच. हा पसारा वाढतो तेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबांची मात्र ओढाताण होते. 

सर्वसाधारणपणे एकाच सामाजिक, आर्थिक परिस्थितीतील मुले एका वसतीगृहात असतील, तर फार त्रास होत नाही; पण जेव्हा वैद्यकीय, अभियांत्रिकी, किंवा तत्सम दर्जाच्या शिक्षणासाठी सगळ्या भागांमधून मुले येतात तेव्हा खरा गोंधळ उडतो. इथून मग सुरुवात होते अनुकरण करण्याची. एकमेकांचे बघून राहणीमान ठेवणे, खाण्यापिण्याच्या सवयी लावून घेणे, गाड्यांचा वापर अशा अनेक गोष्टींचा यात समावेश होतो. या सवयींमध्ये ‘चांगल्या’ व ‘वाईट’ असे वर्गीकरण केल्यास काळजी वाटावी असे चित्र उभे राहते. 

माझ्या आहारविषयक सल्लामसलतीमध्ये असे लक्षात आले आहे, की ९५ टक्के विद्यार्थी अत्यंत चुकीची जीवनपद्धती व आहार यांचे पालन करत असतात आणि यामागील कारण एकच आहे, ‘एकमेकांचे अनुकरण’. काही गोष्टी चांगल्या आहेत, जसे आजकाल व्यायामशाळेत कॉलेजच्या मुलांची खूप गर्दी झालेली दिसते. व्यायामाची आवड निर्माण होते आहे, ही चांगली गोष्ट आहे; पण ही आवड आहे की खूळ आहे, याचा शोधच घ्यायला हवा.  कारण व्यायामशाळेचे वार्षिक शुल्क किमान १० हजार रुपये वगैरे असते आणि दरमहा भरल्यास ती आणखी जास्त असते.  ही आई-वडिलांच्या खर्चात भर म्हणावी का.? कारण चालायला जाणे, सायकल चालविणे, टेकड्या चढणे, खुल्या मैदानावर खेळणे असे सगळे व्यायाम प्रकार उत्तम व मोफत आहेत; पण यापेक्षा व्यायामशाळाच बरी वाटते. तिथे व्यायाम करणे चुकीचे नाहीच; पण अनेक मुले तिथे नियमित जात नाहीत, गेली तरी नीट व्यायाम करत नाहीत. असे सर्रास होताना दिसते. यामुळे पालकांचे पैसे वायाच जात असतात.  

खाण्याच्या सवयींचेसुद्धा असेच आहे. बाहेरील तळलेले स्नॅक्स हा तर मुलांच्या अत्यंत आवडीचा विषय असतो. उच्च शिक्षणासाठी शहरांत येणाऱ्या या मुलांना आरोग्यासाठी काय चांगले व काय वाईट किंवा अपायकारक, हे कळू नये.? आज दर दोन दिवसांनी नवीन वडापाव, भजीची टपरी उघडलेली दिसते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक टपरीवर गर्दी असतेच. हे पदार्थ खाऊन मुलांमध्ये लठ्ठपणा,  हृदयरोग, उच्चरक्तदाब असे आजार होण्याचे प्रमाण अनेक पटींनी वाढते आहे. घरापासून दूर राहणाऱ्या मुलांना बाहेरचे खावे लागते हे जरी खरे असले, तरीही खाण्याच्या चांगल्या सवयी लावून घेणे, हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. 

सध्या ‘इंडक्शन’ ही विजेवर चालणारी शेगडी कमी किंमतीत सर्वत्र उपलब्ध आहे. ती घेतली, तर पोटाचे काम खूपच सोपे होऊ शकते. सकाळी बाहेर जाऊन चहा पिण्यापेक्षा घरीच दूध गरम करून पिता येते.  नंतरच्या नाश्त्यासाठी मुलांनी पोहे, उपमा, इडली, थालीपीठ, पराठा असे पदार्थ खावेत. वडे, सँडविचेस यांपेक्षा हे पदार्थ नक्कीच उत्तम आहेत; पण हे पैसे वाचवून घरच्या घरीसुद्धा आपण उत्तम नाश्ता बनवू शकतो. ते म्हणजे, वाफवलेली कडधान्ये, सातूचे पीठ, भूसली, उकडलेली अंडी, यांसारखे पौष्टिक आणि चवदार पदार्थ असताना ते का डावलले जातात, समजत नाही. हे पदार्थ बनविण्यास खरेतर १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. भूसली व सातूचे पीठ बनविण्यास तर काहीच वेळ लागत नाही. सोबत कधी कॉर्नफ्लेक्स, ओट्स हेदेखील खाता येईल.  या नाश्त्यामध्ये एखाद्या फळाची जोड दिल्यास उत्तम. त्या त्या हंगामातील फळे उत्तमच. कारण ती स्वस्तही असतात व आरोग्याला सुद्धा त्रास होत नाही. 

अनेकजण दुपारच्या जेवणाची हेळसांड करतात. कॉलेजच्या मधल्या सुट्टीत पुरेसा वेळ मिळत नाही म्हणून जंक फूड व वडा पाव, इडली-वडा-सांबार इत्यादी पदार्थ दुपारचे जेवण म्हणून घेतात. यामुळे निश्चितच भूक भागत नाही व परत कॉलेज संपेपर्यंत भूक लागलेलीच असते. मग शेवपुरी, भेळ, पाणीपुरी, इत्यादी पदार्थ खाऊन मुले हॉस्टेलवर येतात. रोज पाणीपुरी आणि भेळ खाणारे अनेक विद्यार्थी मी पाहिले आहेत. ऐकायला अतिशयोक्ती वाटेल, पण दुर्दैवाने हे सत्य आहे. याचा ठोस पुरावा म्हणजे पाणीपुरीच्या सगळ्या गाड्या अगदी उत्तम व्यवसाय करत आहेत. हे खाऊन विद्यार्थ्यांचे नुकसानच होत आहे.  हे सगळे करण्यापेक्षा आजकाल भरपूर सोयी आहेत. जरा शोधल्यास डबा रूमवर पोहोचता करणारी मेस सहज उपलब्ध होते. 

आजकाल सकाळी आठ वाजताच पोळी-भाजी देणारी केंद्रे उघडी असतात. जातानाच पोळी भाजी घेऊन जावी व स्वतःसोबत कांदा, काकडी, गाजर, मुळा असे सॅलड पदार्थ न्यावेत. उपहारगृहातून दही घ्यावे. असा जमेल तसा पौष्टिक आहार नक्कीच घेता येऊ शकतो. रविवारी रात्री मेस बंद असते म्हणून सगळे चिकन, मटण या पदार्थांकडे वळतात. मटण हे पचायला खूप जड व त्यामध्ये संपृक्त मेद पदार्थ असतात, ते शरीरासाठी अत्यंत वाईट आहेत. त्यामुळे चिकन, मासे, ठीक आहे; पण तंदुरी, ग्रील सूप या प्रकारात खावे व सोबत सॅलड मागवावे.

आजच्या मुलांचा अभ्यासक्रमसुद्धा खूप धकाधकीचा आहे. त्यामुळे तो ताण-तणाव घालवण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगले छंद जोपासणे गरजेचे आहे; पण एकमेकांच्या नादी लागून मुले वाईट सवयींच्या आहारी गेलेली दिसतात. सिगारेट, ड्रिंक्स, हुक्का पार्लर अशा गोष्टी सर्रास बघायला मिळतात. पुढे आलेली धक्कादायक बाब म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकलचे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींमध्येसुद्धा धुम्रपानाची सवय बोकाळली आहे आणि त्याचे कारण काय तर म्हणे वजन कमी होते. हे नुसते तोंडी ऐकलेले असले, तरी एक स्टेटस, फॅशनच्या नावाखाली केले जात असल्याचे बघायला मिळते. ह्याचे निष्कर्ष धोकादायकच आहेत. 

अशा परिस्थितीत व वातावरणात मुलांना हॉस्टेलवर ठेवताना पालकांनासुद्धा टेन्शन येते. ह्यासाठीच चांगल्या विचारांमध्ये व संस्कारांमध्ये मुलांना ठेवण्याची नितांत गरज आहे. एकाने वाईट सवयी अवलंबल्या तर इतर मित्र मैत्रिणींनी त्या हाणून पाडणे गरजेचे आहे.  पालक त्यांच्या कष्टाचे पैसे खर्च करून मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी आटापिटा करीत असतात, याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवली पाहिजे. 

वसतीगृहात किंवा खोलीवर शेअर करून चार-पाच जण राहत असतात.  त्यामुळे असे पौष्टिक व खिशाला परवडतील असे पदार्थ एकदम आणल्यास त्याचा खर्च वाटून घेऊन कमी करता येतो. ते स्वस्त पडते व आरोग्याचीसुद्धा उत्तम काळजी घेतली जाते. सुट्टीत घरी गेल्यावर पौष्टिक लाडू, चिवडा, खाकरे इत्यादी अनेक पदार्थ सोयीप्रमाणे आणावेत. खाणे उत्तम असल्यास अभ्यासही उत्तम होतो व यशाचा मार्ग सुकर होतो. 

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.) 

(‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link