Next
उच्चशिक्षित जोडप्याचा डिजिटल ‘चाय व्हिला’
करुणा भांडारकर
Monday, April 30 | 12:00 PM
15 1 0
Share this story

‘चाय व्हिला’चे संस्थापक पूजा व नितीन बियानीनागपूर : उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पगाराची नोकरी मिळविणे, हे आजच्या युवकांचे स्वप्न असते; मात्र या प्रवाहाच्या बाहेर जाऊन स्वत:च्या आवडीचे काम करणारे तरुण तुलनेने कमीच असतात. त्याचेच एक उदाहरण म्हणजे नागपुरातील नितीन आणि पूजा बियानी हे सॉफ्टवेअर इंजिनीअर जोडपे. मोठ्या पॅकेजची नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस त्यांनी केले आहे. कोणताही ‘हाय-फाय’ व्यवसाय न करता चहाचे दुकान थाटून त्यांनी आपले स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे. चहाविक्रीच्या व्यवसायाला त्यांनी डिजिटल रूपाचीही जोड दिली आहे.

एसी, चारचाकी वाहन, परदेश दौरे अशा विविध सुखसोयी उपलब्ध असलेली नोकरी सोडून, नितीन व पूजा बियानी या जोडप्याने ‘चहाविक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली. हे एक प्रकारचे आश्चर्यच म्हणावे लागेल. या व्यवसायाचे ‘चाय व्हिला’ असे नामकरण करून त्यांनी आपल्या कल्पनेला नवी दिशा दिली. तसेच ‘स्टार्टअप-इंडिया’ ही संकल्पनाही प्रत्यक्षात आणली. या व्यवसायातून हे जोडपे काही लाख रुपयांची उलाढाल करीत आहे.

नागपूरच्या गांधीबाग परिसरातील, धारोडकर चौकात असलेल्या त्यांच्या दिमाखदार ‘चाय व्हिला’मध्ये चहाप्रेमींची कायम गर्दी दिसून येते. त्यात तरुण-वृद्ध, महिला, विद्यार्थी अशा सर्व वर्गातील ग्राहकांचा समावेश आहे.

नितीन बियानी यांनी २००६मध्ये नामवंत अभियांत्रिकी संस्थेतून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते पुणे, बेंगळुरू येथ नावाजलेल्या सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत होते. त्यांची पत्नी पूजाही सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत होती; पण नोकरी सोडून काही तरी वेगळे करण्याचे दोघांचेही स्वप्न होते. १५ लाख वार्षिक पॅकेजची नोकरी १० वर्षे केल्यानंतर ती नोकरी सोडून हे जोडपे नागपुरात दाखल झाले. कोणता व्यवसाय सुरू करायचा, यावर चिंतन-मनन झाले. त्याच वेळी चौका-चौकातील चहाटपऱ्यांकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. प्रसन्न वातावरण व गुणवत्तापूर्ण घटकांसह चहा उपलब्ध करून देण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्यानंतर ‘चायव्हिला’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. मागील पाच महिन्यांत बियानी जोडप्याने पावणेदोन लाख कप चहाची विक्री करून, १५ लाखांचा व्यवसाय केला.

उच्चशिक्षित तरुण पकोडे विकणार काय, अशा मुद्द्यावरून सध्या देशभरात टीका-टिप्पणी, जोक्स, सांकेतिक निदर्शने होत आहेत. या पार्श्वभूमीवर बियानी दाम्पत्याचा हा प्रयोग कौतुकास्पद व सकारात्मक दृष्टिकोन देणारा आहे. कुठलाही व्यवसाय लहान-मोठा नसतो. परिश्रम, चिकाटी व कल्पनाशक्तीतून तो यशस्वी करता येतो, हा आदर्श या दाम्पत्याकडून घेता येणार आहे.

‘चाय व्हिला’ची खासियत
येथे तब्बल २० ते २५ प्रकारच्या विविध चवींच्या चहाचा आस्वाद घेता येतो. सोबत सँडविचसारखे स्नॅक्सही उपलब्ध आहेत. आल्याचा चहा सर्वाधिक विकला जातो. त्याचप्रमाणे नागपूरच्या कडक उन्हात थंडावा देणारा आइस-टी, कोल्ड-कॉफीचाही आस्वाद तेथे घेता येतो. त्याशिवाय ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी असे विविध चवीचे चहाचे प्रकारही येथे उपलब्ध आहेत. सर्वसाधारण चहा पाच ते आठ रुपये, आइस-टी वीस रुपये व कोल्ड-कॉफी तीस रुपये असे माफक दर आहेत. कुल्हड स्पेशल चहाही येथे उपलब्ध असून, चहा ‘सर्व्ह’ करण्यासाठी इको-फ्रेंडली कप्सचा वापर केला जातो. चहा करण्यासाठी ‘फिल्टर्ड वॉटर’, गंधकरहित साखर (सल्फरलेस शुगर) आणि आले, वेलची, दालचिनी, लवंग अशा विविध घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे इथला चहा आरोग्यदायी असतो.

डिजिटल चहाविक्री
http://chaivilla.com ही चाय व्हिलाची वेबसाइट आहे. ई-मेल, व्हॉट्सअॅप किंवा फोन करून नोंदणी केल्यास दररोज सकाळी आणि संध्याकाळी ठरावीक वेळेत चहा विविध ऑफिसमध्ये किंवा आपल्याला जिथे हवा असेल तिथे पाठवला जातो. ‘ऑन टाइम डिलिव्हरी’ हीदेखील त्यांची खासियत आहे. संबंधित व्यावसायिकांबरोबर वार्षिक करारही करण्यात येतो. लवकरच अॅपवरही ही सेवा सुरू करणार असल्याची माहिती बियानी यांनी दिली. ‘एनी टाइम टी’ या प्रकारात भाजीविक्रेते, पानटपरी आदी छोट्या व्यावसायिकांशी नफा-टक्केवारीवर आधारित ‘टाय-अप’ करण्यात आले आहे.

‘स्टार्ट-अप’चा यशस्वी मंत्र
बियानी यांनी टप्प्याटप्प्याने कामाचे नियोजन केले. सुरुवातीला एकच आउटलेट काढून व ते नफ्यात आल्यानंतरच पुढील विस्तार करावा, असा स्टार्टअप मंत्रही त्यांनी दिला. यामुळे भविष्यात व्यवसायाचा विस्तार करणे शक्य होणार आहे. पुढील दीड वर्षात ‘चाय व्हिला’ची दहा आउटलेट सुरू करण्याची योजना आहे. 

अशिक्षित, अपंग, गरजू महिला अशांना रोजगार देण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. रेल्वे स्टेशन, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी ‘चाय व्हिला’ची आउटलेट्स सुरू करण्यासाठी शासनाची मदत मिळाल्यास, जवळपास १०० ते १५० अपंग व अनेक गरजू व्यक्तींना रोजगार देण्याचा बियानी यांचा मानस आहे. आधुनिक पद्धतीने व्यवसाय करताना त्यांची ही संवेदनशीलताही वाखाणण्याजोगी आहे. एकंदरीतच हा उपक्रम प्रेरणादायी आहे.

(अनोख्या ‘चाय व्हिला’ची कहाणी जाणून घ्या सोबतच्या व्हिडिओतून...)

 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link