Next
अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले संकल्प
BOI
Tuesday, August 27, 2019 | 04:07 PM
15 0 0
Share this article:

परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात संकल्पदिनी मार्गदर्शन करताना प्रतिभा प्रभुदेसाई. डावीकडून विशाखा भिडे, अॅड. सुमिता भावे व मुख्याध्यापक विनोद नारकर.

रत्नागिरी :
दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरातील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी २७ ऑगस्ट रोजी विविध संकल्प केले आणि ते पूर्ण करण्याचा निर्धार केला. फाटक हायस्कूलच्या निवृत्त शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा प्रभुदेसाई या वेळी आचार्य म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना छोट्या-छोट्या गोष्टी सांगून, संकल्प पूर्णत्वाला कसे न्यावेत, याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.

या शाळेतील संकल्प दिनाचे हे तिसरे वर्ष आहे. दीपप्रज्ज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गीतेचा अध्याय आणि स्तोत्रे म्हटली. ‘दररोज सूर्यमंत्राचे पठण करीन, सूर्यनमस्कार घालीन, चांगले तेच बोलीन, अभ्यास मन लावून करीन, पानात वाढलेले सर्व पदार्थ आवडीने खाईन, आरोग्याला हितकारक आहार घेईन, समाजातील दीनदुबळे, अपंग, गरजू यांना साह्य करीन आणि झाडांचे संरक्षण करीन,’ असे संकल्प तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर सौ. प्रभुदेसाई यांनी पालकांशी सुसंवाद साधला. ‘ज्याप्रमाणे मुले संकल्प मनी धरणार आहेत, त्यांचे पालन करणार आहेत, त्याप्रमाणे पालकांनीही काही संकल्प मनाशी ठरवले पाहिजेत. त्यासाठी नियमित वेळ काढून संकल्पपूर्ती करावी. संकल्पांचे काटेकोर पालन केल्यास आपल्या मुलांसमोर आपण चांगला आदर्श उभा करू शकतो,’ असे त्या म्हणाल्या. गतिमान युगात मोबाइल, टीव्हीवरील कार्टून्समध्ये मुले अडकल्यामुळे होणारे दुष्परिणाम त्यांनी सांगितले. त्यातून वेळीच बाहेर पडण्यासाठी मोबाइलचा फक्त आवश्यकतेनुसार वापर करावा, असे त्यांनी सांगितले. अधिक माहिती मिळवण्यासाठी मोबाइल, टीव्हीचा वापर कसा करता येईल, याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.

मुलांच्या अभ्यासातील प्रगतीबाबत सौ. प्रभुदेसाई म्हणाल्या, ‘दिवसभर मुले क्लास, शाळा यात गुंतलेली असतात. संध्याकाळी आल्यावर मुले मैदानावर भरपूर खेळली, तर भूकही चांगली लागते. त्यामुळे जेवणाच्या तक्रारी दूर होतात. तसेच झोपही शांतपणे लागते. त्यामुळे मुलांना अतिरिक्त क्लासपेक्षा मोकळा वेळ मिळू द्यावा. त्याचा वापर चांगल्या रीतीने करता येईल. नियमित व्यायाम, समतोल आहार, पुरेशी झोप यामुळे अभ्यासाला फायदाच होतो.’

‘घरातील सर्व कामे सर्व सदस्यांनी मिळून करावीत. मुलगा-मुलगी भेदभाव न करता सर्व कामे सगळ्यांनी एकत्रित करण्याचे अनेक फायदे आहेत. मुलांच्या विकासात आई-बाबा या दोघांची भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे,’ असेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे यांनी दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे संकल्प सांगितले. ‘विद्यार्थिभिमुख शिक्षण देणाऱ्या आणि सातत्याने सर्व क्षेत्रांत प्रगतीवर असणाऱ्या संस्थेच्या घटकसंस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे. अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होत असल्यामुळे पुढे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत व अन्य शालाबाह्य स्पर्धांमध्ये मुले चांगले यश मिळवत आहेत,’ असे त्या म्हणाल्या.

या वेळी कार्यकारिणी सदस्या विशाखा भिडे यांनी संकल्प का करावेत याचे विवेचन केले. संकल्प दिनामुळे विद्यार्थी सक्षम बनत असून हा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी संकल्प दिनाची माहिती दिली. सौ. शिवलकर यांनी सूत्रसंचालन केले, श्री. आरेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सौ. शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search