Next
पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन होणार
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापुरात ग्वाही
BOI
Wednesday, August 21, 2019 | 05:01 PM
15 0 0
Share this article:

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्त गावांना भेट देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

कोल्हापूर : ‘पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन केले जाणार आहे,’ अशी घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (२१ ऑगस्ट) कोल्हापूर येथे  केली. पाटील यांनी हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव या पूरग्रस्त गावांची पाहणी करून लोकांना दिलासा दिला. निलेवाडी येथे पूरग्रस्त गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना पीककर्जमाफी, गोठा बांधण्यासाठी मदत, घर बांधण्यासाठी अर्थसाह्य, स्वतःच्या घरात जाईपर्यंतच्या काळात घरभाडे, मोफत पुस्तके अशा प्रकारे पूरग्रस्तांना सर्व ती मदत टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटील यांच्यासमवेत आमदार सुजित मिणचेकर, गोकुळ उद्योगसमूहाचे संचालक बाबा देसाई, पी. डी. पाटील, अजितसिंह काटकर, तहसीलदार सुधाकर भोसले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवणे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. ‘निलेवाडी गाव शंभर टक्के पूरग्रस्त असून, संपूर्ण गाव पाण्याखाली गेले होते. निलेवाडी गावात महसूल विभागाची अथवा गायरान जागा शोधून त्या ठिकाणी गावाचे पुनर्वसन केले जाईल. सरकारी जागा उपलब्ध न झाल्यास खासगी जागा उपलब्ध करून घेण्याचेही प्रयत्न केले जातील,’ असे पाटील यांनी सांगितले. 


पूरग्रस्तांना तत्काळ मदत मिळाल्याबद्दल महिलांकडून समाधान

प्रशासनाने वेळेवर केलेल्या मदतीबाबत पूरग्रस्त निलेवाडी गावातील महिलांनी समाधान व्यक्त केले. लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याबरोबरच त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या; तसेच पूरग्रस्त कुटुंबांना रोख पाच हजार रुपयांचे अनुदान व वीस किलो धान्य तत्काळ दिल्याबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले. या परिसरातील पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर कालावधीत स्वखर्चाने चारा उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घेतली, त्याबद्दलही गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

‘पूरग्रस्त ग्रामीण भागातील घरांसाठी अडीच लाख रुपये, तर शहरातील घरांसाठी साडेतीन लाख रुपयांचे अर्थसाह्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पुराच्या पाण्याने पडलेली घरे बांधून देण्याबरोबरच सध्या संपूर्ण घर पडलेल्या कुटुंबांना एक वर्षाकरिता दर महिन्याला दोन हजार रुपये याप्रमाणे २४ हजार रुपये भाडे शासनामार्फत दिले जाईल,’ असेही पाटील यांनी सांगितले. 

बचत गटातील महिलांनी बॅंकेकडून कर्ज काढून उभ्या केलेल्या व्यवसायाचे नुकसान झाले असेल तर त्याचेही सर्वेक्षण करण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले.     
‘कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत २७ कोटी ४७ लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. शासन आणि प्रशासनाने पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे जिल्ह्यातील चार लाख १३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांना आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. टप्प्याटप्प्याने सर्व ती मदत उपलब्ध करून दिली जात असून, पाण्याखाली गेलेल्या शेतीसाठी एक हेक्टरची पीककर्ज माफी आणि ज्यांनी कर्ज घेतले नाही, त्यांना उत्पन्नाच्या तिप्पट मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गोठा बांधण्यासाठी तीन हजार रुपयांची मदतही शासनाने जाहीर केली आहे,’ असेही पाटील यांनी स्पष्ट केले. 


‘काळजी करू नका, शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पूरग्रस्तांसाठी जे-जे करावे लागेल ते निश्चितपणे केले जाईल. पुरामुळे पडलेली घरे बांधून देण्याबरोबरच बुडालेल्या शेतीसाठी पीककर्ज माफ, विद्यार्थांना मोफत पुस्तके देणे, मुलींना एसटी प्रवास मोफत अशा सर्व बाबींवर शासनाने लक्ष केंद्रित  केले आहे. निलेवाडी या गावासाठी वारणा नदीवर ऐतवडे-निलेवाडी असा पूल बांधण्यासाठी तत्काळ अंजदाजपत्रक तयार करण्याचे, तसेच पुरामुळे खराब झालेल्या पुलांच्या उभारणीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार असून, या प्रक्रियेसाठी तीन दिवसांचे टेंडर काढण्यास शासनाने मान्यता दिली आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली. 

भेंडवडे येथे पूरग्रस्तांना मदतीचे, तसेच जनावरांसाठी ओल्या चाऱ्याचे वाटपही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी खोची गावाला भेट देऊन पूरग्रस्तांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. पूरग्रस्तांसाठी शासन करत असलेल्या मदतीची आणि उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search