Next
उस्ताद आमीर खान, राखी गुलझार
BOI
Wednesday, August 15, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

इंदौर घराण्याचे अत्यंत थोर शास्त्रीय गायक उस्ताद आमीर खान आणि ७० आणि ८०च्या दशकातली हिंदी चित्रपटसृष्टीतली अत्यंत ताकदीची अभिनेत्री राखी गुलझार यांचा १५ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.......
उस्ताद आमीर खानउस्ताद आमीर खान 
१५ ऑगस्ट १९१२ रोजी इंदौरमध्ये जन्मलेले आमीर खान हे इंदौर घराण्याचे अत्यंत थोर शास्त्रीय गायक म्हणून प्रसिद्ध आहेत. सुरुवातीला सारंगी आणि वीणावादक म्हणून प्रसिद्ध असलेले आपले वडील शाहमीर खान यांच्याकडे त्यांनी सारंगीचं शिक्षण घेतलं; पण त्यांचा कल वादनापेक्षा गायनाकडे जास्त होता. हे पाहून वडिलांनी त्यांना गायनासाठी प्रोत्साहन दिलं. अब्दुल वाहीद खान, राजबअली खान आणि अमानअली खान यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आमीर खान यांनी आपली स्वतंत्र गायकी घडवली. धृपद आणि ख्याल गायकीचा एक अनोखा अंदाज त्यांच्या गायकीतून प्रकट होत असे. त्या काळच्या काही गायकांप्रमाणे राजेरजवाड्यांना खूश करण्यासारखं किंवा इतरांवर कुरघोडी करण्यासाठी म्हणून न गाता त्यांनी पूर्ण भक्तिपूर्ण ध्यान लावून विलंबित ख्याल, ताना आणि मेरुखंड प्रकारच्या मिलाफातून आपली स्वतंत्र गायनशैली विकसित केली. पुढे त्यांनी बैजू बावरा, शबाब, झनक झनक पायल बाजे, रागिणी आणि गुंज उठी शहनाई यांसारख्या काही निवडक सिनेमांसाठी गायन केलं होतं. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तसंच पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. १३ फेब्रुवारी १९७४ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
........      
राखी गुलझारराखी गुलझार
१५ ऑगस्ट १९४७ रोजी (भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी) राणाघाटमध्ये (बंगाल) जन्मलेली राखी मजुमदार ही ७० आणि ८०च्या दशकातली हिंदी चित्रपटसृष्टीतली अत्यंत ताकदीची देखणी अभिनेत्री. सुरुवातीला दोन बंगाली सिनेमांतून अभिनय केल्यानंतर राखीला मुंबईच्या हिंदी चित्रपटांची दारं खुली करून दिली ती राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘जीवनमृत्यू’ या धर्मेंद्रबरोबरच्या सिनेमाने. अलेक्झान्द्र ड्युमाच्या ‘कौन्ट ऑफ मॉन्टे क्रिस्टो’ या कादंबरीवर आधारित या सिनेमाने तुफान यश मिळवलं होतं आणि राखीला पहिल्याच फिल्म्सच्या यशामुळे अनेक उत्तम सिनेमे मिळत गेले. पाठोपाठ शशी कपूरबरोबर तिचा डबल रोल असलेला ‘शर्मिली’ तुफान चालला आणि टपोऱ्या, पिंगट डोळ्यांची राखी लोकांना आवडून गेली. शशी कपूरबरोबर तिची जोडी लोकांना ‘बेहद’ आवडली आणी त्यांनी पुढे जवळपास १० सिनेमे गाजवले. पुढे तिने कवी गुलझार यांच्याशी प्रेमविवाह केला आणि राखी गुलझार नावाने काम करत पुढची २० वर्षं चित्रपटसृष्टी गाजवली. रेश्मा और शेरा, लाल पत्थर, आँखों आँखों में, हीरा पन्ना, दाग, ब्लॅकमेल, तपस्या, कभी कभी, दूसरा आदमी, तृष्णा, त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर, जुर्माना, लावारिस, बसेरा, बेमिसाल, बंधन कच्चे धागो का, जामीन असमान, पिघलता आसमान, राम लखन, करण अर्जुन, असे तिचे अनेक सिनेमे गाजले आहेत. तिला १३ वेळा फिल्मफेअर नामांकन मिळालं होतं आणि तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार, तर दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.  

यांचाही आज जन्मदिन :
लोकप्रिय बहुप्रसवा लेखक अच्युत गोडबोले (जन्म : १५ ऑगस्ट १९५०) 
आदर्श मराठी ग्रंथसूची तयार करणारे शंकर दाते (जन्म : १५ ऑगस्ट १९०५, मृत्यू : दहा डिसेंबर १९६४) 
यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती (जन्म : १५ ऑगस्ट १९२९, मृत्यू : १२ डिसेंबर २००४) 
प्रसिद्ध दाक्षिणात्य नायिका सुहासिनी मणिरत्नम  (जन्म : १५ ऑगस्ट १९६१) 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search