Next
‘जातीय भेदभाव मोठे आव्हान’
डॉ. सुखदेव थोरात यांचे मत
प्रेस रिलीज
Friday, September 28, 2018 | 04:19 PM
15 0 0
Share this story

डॉ. सुखदेव थोरातपुणे : ‘आज आपल्या समाजात आरक्षणामुळे अनुसूचित जातींमधील नागरिकांना शिक्षण आणि नोकरी मिळाली असली, तरी अजूनही त्यांना समाजात भेदभावाला सामारे जावे लागत आहे. समाजात हा जातीय भेदभाव कायम असून, हेच आपल्या समोरील मोठे आव्हान आहे’, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे ‘भारतातील अनुसूचित जाती-जमाती- समान भवितव्याच्या शोधात’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. राजस परचुरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘पीआयसी’चे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, मानद संचालक प्रशांत गिरबने हे देखील या वेळी उपस्थित होते.

डॉ. थोरात पुढे म्हणाले, ‘शिक्षण आरोग्य, रोजगार यांसारख्या मूलभूत संसाधनांची कमतरता आणि त्यात दलित म्हणून पदोपदी येणारे अनुभवाचे वास्तव यामुळे दलित वर्गाचा विकास खुंटलेला आहे. याबरोबरच दरडोई उत्पन्न, गरिबी, कुपोषण, नागरी सुविधा, शिक्षण, नोकरी आदी सर्व घटकांचा विचार करता अनुसूचित जातींमधील नागरिक हे सर्वात मागे आहेत. पिढीजात गरिबी, शिक्षणाची अनुपलब्धता, शेतजमीन नसणे, असंघटित क्षेत्रात किंवा अनियमित रोजगार ही देखील त्यांच्या आजच्या परिस्थितीची व आर्थिक विषमतेची ठोस कारणे आहेत.’

‘आरक्षणामुळे या घटकांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या असल्या, तरी खासगी क्षेत्रात आरक्षण नसल्याने आणि सरकारी नोकऱ्या मर्यादित असल्याने त्याचा परिणाम या घटकांवर झाल्याचे दिसते. म्हणूनच आजही अनुसूचित घटकांमधील नागरिक असंघटित क्षेत्रात सर्वाधिक आढळतात. वरील सर्व बाबींमुळे या समूहातील नागरिकांचा विकासदर हा इतर उच्चवर्णीय व मागासवर्गीयांपेक्षा कमी असून, त्यांच्यासमोरचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक प्रश्नांचे आव्हान हे मोठे आहे’, असेही त्यांनी नमूद केले. 

‘महाराष्ट्रात नोकरी व शिक्षणासाठी लोकसंख्येच्या तुलनेत प्रत्येक जातीला आरक्षण दिले आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. आरक्षणाचा अनुसूचित जातीच्या व्यक्तींना फायदाच झाला आहे. त्यामुळे त्यांना शिकण्याची तसेच नोकरीची संधी मिळाली आहे. मात्र, आरक्षण सार्वजनिक क्षेत्रापुरते मर्यादित आहे. त्यामुळे आरक्षणाचे भवितव्य काय असेल, याविषयी संदिग्धता आहे. आज शिक्षणाचे खाजगीकरण वाढत असून, त्यासाठी मोजावी लागणारी किंमत ही देखील मोठी आहे जी अनुसूचित जातींमधील नागरिकांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे हे खाजगीकरण आणखी वाढल्यास त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतील. आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नसल्याने अनुसूचित जातींना देखील शिक्षणाच्या क्षेत्रात त्याचा फटका बसेल’, असेही डॉ. थोरात यांनी सांगितले.  
       
मानवी विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे घटक, जातीनिहाय भूधारकेतेचे प्रमाण, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, कामाच्या तुलनेत कामगारांना मिळणारी वेतनश्रेणी, खासगी क्षेत्रात दलितांच्या वाट्याला येणारी उपेक्षा, दलित व इतर वर्गांतील आर्थिक विषमता, जातीच्या नावावर होणारे हल्ले, अत्याचार यांसारख्या विषयांवर देखील डॉ थोरात यांनी आपली मते मांडली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link